प्रस्तावना : जैव-नीतिशास्त्र (Bioethics) या शाखेत वैद्यकशास्त्र आणि जीवविज्ञानामध्ये उद्भवणाऱ्या तात्त्विक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांचा अभ्यास केला जातो. ही शाखा प्रामुख्याने मानवी जीवनाशी संबंधित आहे. आरोग्य सेवा देत असताना याचा व्यवसाय आणि व्यावसायिकता या संदर्भात आभ्यास करणे क्रमप्राप्त असते. एखादा व्यवसाय समाजात, समाजासाठी करत असताना त्याचे ठराविक प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. ज्याद्वारे वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात करणे, मिळालेल्या संधीतून गुणात्मक आरोग्य सेवा देण्याचे कौशल्य मिळवणे आणि सकारात्मकता वाढवणे शक्य होते. व्यवसाय म्हणून वैद्यकीय किंवा परिचर्या क्षेत्राची निवड करताना त्या व्यवसायासाठी आवश्यक कामातील नैपुण्य, स्वयंशिस्त, बांधिलकी, वचन बद्धता आणि जबाबदारी घेण्याची तयारी असावी लागते. परिचर्या व्यवसायाचा मुख्य हेतू समाजाला कौशल्यपूर्ण आरोग्यसेवा देणे हा आहे.

व्यवसाय – व्याख्या : १)  व्यवसाय म्हणजे व्यक्तीने स्वत: निवडलेला, ठराविक मोबदला देणारा असा धंदा ज्यासाठी त्या व्यवसायाचे ठरलेल्या शैक्षणिक पात्रतेनूसार औपचारिक प्रशिक्षण सक्तीचे असते. … (ऑक्सफर्ड शब्दकोश)

२) व्यवसाय म्हणजे अशा प्रकारचे काम ज्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेऊन एक वैशिष्ट्यपूर्ण नैपुण्य आत्मसात करणे गरजेचे असते, कारण यामध्ये उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन सेवा देणे अपेक्षित असते….. (केम्ब्रिज शब्दकोश)

व्यवसाय संकल्पना : कोणत्याही प्रकारचा व्यवसाय स्वीकारताना त्या त्या क्षेत्रातील उच्च प्रतीचे ज्ञान आणि सराव  यांचा महत्त्वाचा वाटा असतो. सेवा देताना वर्तनातून नैतिक मूल्यांची जाणीवपूर्वक पाठराखण करण्याची हमी दिली जाते. व्यवसायातील औपचारिक प्रशिक्षण देणारी नियामक संस्था/प्राधिकरण हे मान्यताप्राप्त असावे. नीतिमूल्ये आणि नैतिकता यावर व्यवसायातील यश अवलंबून असते.

व्यावसायिक कर्मचारी (Professional Worker) : व्‍यावसायिक कर्मचारी ही अशी व्यक्ती असते, जी आपला व्यावसायिक सराव त्या व्यवसायातील तज्ञ व नीतिमूल्ये जपणाऱ्या  जाणकारांनी नेमून दिलेल्या मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घेऊन पूर्ण करते.

व्यवसायाची सर्वसाधारण गुणवैशिष्ट्ये :

  • व्यवसायातील सेवा देताना त्यातील मानके (Standards) लक्षात ठेवणे.
  • ठराविक सेवा देताना आवश्यक ती कौशल्ये वापरण्याची जबाबदारी घेणे व त्यासाठी वचनबद्धता सांभाळणे.
  • प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळे औपचारिक प्रशिक्षण उपलब्ध असून ते त्या प्राधिकरणामार्फत नियोजित केले जाते. तसेच ते प्रशिक्षण मान्यताप्राप्त असून त्यावर प्राधिकरणाचे नियंत्रण असते. त्यामुळे व्यावसायिकता जपण्यास मदत होते.
  • सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती स्वायत्तता पूर्वक निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या या कृतीसाठी त्यांनी त्याविषयीची जबाबदारी स्वीकारणे अपरिहार्य असते.

परिचर्या व्यवसायाचे निकष (बिक्सलर व बिक्सलर अनुसार) : 

  • विशेष ज्ञान (Specialized knowledge) : परिचर्येत रुग्णांची काळजी घेण्याकरिता संशोधनातून विकसित झालेल्या ज्ञानाचा आपल्या कार्यक्षेत्रात उपयोग करणारी अद्वितीय अशी विषयतज्ञांची समिती स्थापन केली जाते.
  • उच्च शिक्षण (Higher education) : परिचर्या व्यवसायासाठी व्यावसायिक महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून विशेष शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच, उच्चशिक्षित व्यावसायिकांना सक्षम करणे देखील गरजेचे आहे.
  • अत्यावश्यक सेवा (Vital services) : परिचर्येत प्रामुख्याने निरोगी आरोग्याचा प्रचार आणि रुग्णांची शुश्रुषा यांसारख्या अत्याआवश्यक सेवा प्रदान केल्या जातात.
  • स्वायत्तता (Autonomy) : परिचारिका तसेच परिचर्या व्यवसाय यांच्या स्वायत्ततेला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. यामुळे त्यांची स्वत:ची धोरणे ठरविणे आणि सरावावर नियंत्रण ठेवणे सुलभ होईल.
  • दायित्व (Accountability) : परिचारिका रुग्णाच्या आजाराचा इतिहास जाणून घेऊन त्याला सेवा प्रदान करणे आणि योग्य निर्णय घेणे यासाठी जबाबदार असतात.
  • सेवा अभिमुखता (Service orientation) : इतरांची सेवा करण्याच्या प्रेरणेतूनच प्रामुख्याने परिचर्या व्यवसायाची निर्मिती झाली आहे.
  • नीतिसंहिता (Code of ethics) : परिचर्येत सराव अणि निर्णय घेणे यांचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रभावी नैतिक संहिता आहे. उदा., परिचारिका आंतरराष्ट्रीय परिषद (International Council of Nurses; ICN).
  • व्यावसायिक संस्था (Professional organizations) : परिचर्या मानके प्रस्थापित करण्यासाठी, संशोधनास चालना देण्यासाठी, तसेच व्यावसायिक विकासास समर्थन देण्यासाठी ICN सारख्या संस्था कार्यरत आहेत.

व्यावसायिकता (Professionalism) : व्यावसायिकता म्हणजे एखाद्या व्यावसायिकाने त्या त्या वेळेला अनुसरून गरजेप्रमाणे  केलेली कामे, ज्यामुळे आरोग्य सेवा संदर्भात प्रत्येक व्यक्तीचा जसे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी व परिचर्या आरोग्य संघ यांना फायदा मिळतो.

व्याख्या : व्यावसायिकता ह्या संकल्पनेच्या दृष्टीकोनातून विचार करताना प्रत्येक व्यावसायिक हा  व्यक्ती आणि समाज यांना सेवा देताना त्याचे दायित्व, त्याकरिता असलेली बंधने आणि परस्पर संबंध  या सोबतच सकारात्मकता इत्यादी गुणवैशिष्ट्ये आत्मसात करून ती आपल्या वर्तणुकीतून  दाखविली जातात.  —  (रिचर्ड, एल. सी.)

व्यावसायिकतेची गुणवैशिष्ट्ये (Characteristics of Professionalism) :

  • स्व-नियमन (Self – regulation) : व्यावसायिक कार्य आणि त्यासाठीचा सराव याबाबत मान्यताप्राप्त संस्थेचे अथवा परिषदेचे अनुज्ञापत्र (licence, accreditation) आवश्यक असते.
  • स्व-संकल्पना किंवा आत्मनिर्णय (Self concept or Self-determination) : जो व्यवसाय व्यक्तीने स्वत: निवडलेला असतो त्या व्यवसायातील कर्तव्ये व भूमिका ह्या यशस्वी रीत्या पार पाडण्यात प्रयत्नशील असणे आवश्यक असते.
  • जबाबदारी आणि दायित्व (Responsibility & Accountability) : सेवा देताना केलेल्या कृतीची जबाबदारी घेऊन लोकांच्या सुरक्षिततेसाठी उत्तरदायित्व स्वीकारावे लागते.
  • सेवा देण्यास स्वायत्तता (Increasing Autonomy) : गरजेनुसार सेवा देण्याची मुभा अथवा स्वातंत्र्य असते.
  • आर्थिकदृष्ट्या संरक्षण (Economic security) : अर्थार्जनासाठी व्यवसायात संधी असते. ही बाब सामाजिकदृष्ट्या व्यावसायिकतेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे.

व्यावसायिकतेचे गुणविशेष (Attribute  of Professionalism) :

  • व्यावसायिक ज्ञान : सेवा देताना व सराव करताना असलेल्या ज्ञानावर अधारित  कारणमीमांसा करणे सोपे जाते.
  • जिज्ञासू वृत्ती (Spirit of inquiry) : व्यावसायिकतेचा एक भाग म्हणून नवीन ज्ञान आत्मसात करताना विश्लेषणात्मक विचार, प्रोत्साहनात्मक विचार आणि त्याचे समन्वेषण (exploring) करणे.
  • सल्लागार किंवा समर्थन (Advocacy) : गरजेनुसार आवश्यक ती माहिती उपलब्ध करून कामाचे ठिकाणी साकारात्मक / यशस्वी वातावरण निर्मिती करणे.
  • नवोपक्रम आणि दूरदृष्टी (Innovation & Foresight) : व्यावसायिक कार्यात नवीन व कल्पकतापूर्व संकल्पनेचा समावेश केल्याने सरावादरम्यान जिज्ञासू वृत्तीला चालना मिळेल त्याचा परिणाम म्हणून सेवेतील गुणात्मकता वाढते.
  • सहयोग आणि सामुदायिकता (Collaboration & Communality) : परस्परसंबंध, सहकार्य आणि सहयोग यामुळे कामाच्या ठिकाणी नेमून दिलेले काम हे यशस्वी रीत्या, अपेक्षित गुणवत्तेनुसार आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण करणे शक्य होते.
  • नीतिनियम व मूल्ये (Ethics and Values) : व्यावसायिक कर्मचाऱ्याला याचा समाजात स्वसंरक्षणासाठी देखील उपयोग होतो.

व्यावसायिकतेची निर्देशके (Indicators of Professionalism) :

  • आरोग्य सेवा देताना नैतिक मूल्यांचे पालन करावे.
  • व्यावसायिक ज्ञान वृद्धींगत करून त्या ज्ञानाचा सेवा देण्यासाठी वापर करावा.
  • व्यावसायिकता ही लोकांना सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असते.
  • व्यवसायातील प्राविण्य वाढविण्यासाठी त्या संदर्भातील अद्ययावत शिक्षण घ्यावे.
  • व्यवसायाशी निगडीत संशोधनातील प्रगती हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
  • स्वयं शिस्तीने स्वायत्तता प्राप्त करणे.
  • व्यावसायिक संस्था आणि प्राधिकरणातील कार्यक्रमातून सहभाग नोंदविणे.
  • लोकांशी संवाद साधण्यासाठी व्यवसायाशी संबधित साहित्य प्रकाशित करणे.

नैतिकता जपणे हा व्यवसायाचा मूळ गाभा असून तो प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात लागू पडतो. याद्वारे व्यक्तीची जीवनमूल्ये, त्यांचे अधिकार व परस्पर संबंध दर्शविले जातात. आरोग्य सेवा देताना याचा व्यवसाय आणि व्यावसायिकता या संदर्भात अभ्यास करणे क्रमप्राप्त असते. म्हणूनच परिचर्या अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश केलेला आहे.

संदर्भ :

  • Sharma, Suresh K.; Shetty, Asha P. Professionalism, Professional Values and Ethics in Nursing, 2023.
  • Varinder Kaur, Essentials of Professionalism, Professional Values and Ethics in Nursing, 2023.

समीक्षक : मराठी विश्वकोश संपादक


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.