स्पेनमधील एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ. विसाव्या शतकात यूरोपमधील आयबेरिअन द्वीपकल्पात (पोर्तुगाल आणि स्पेन) स्पेनमधील बर्गोस प्रांतामधील सिएरा दे अतापुएर्का पर्वतरांगामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रागैतिहासिक स्थळांचे उत्खनन सुरू झाले. या उत्खननातून मिळालेले पुरावे पश्चिम यूरोपमधील पहिला मानव कोण होता? आणि तो कसा विकसित झाला? यांविषयी माहिती दर्शवितात. यांमध्ये सीमा डेल एलिफान्टे या स्थळाचा समावेश होतो.

सीमा डेल एलिफान्टे (TE – टीई) या गुहेत २५ मी. जाडीचे आणि १५ मी. रुंदीचे साचलेल्या गाळांचे स्तर असून त्यांचे एकूण १५ स्तरांत (टीई ७ ते टीई २१) वर्गीकरण केले आहे. याशिवाय स्तरात्मक दृष्ट्या हा २५ मी. जाडीचा गाळ अवसादांचा पोत, रंग आणि रचना यांवर आधारित ३ मुख्य टप्प्यांमध्ये विभागला आहे :
१. खालचा टप्पा (Lower Phase) : (स्तर टीई ७ ते टीई १४). हा टप्पा खालच्या थरातील आहे. कालमापनानुसार हा टप्पा आद्य प्लाइस्टोसीनकालीन असून यामध्ये यूरोपातील सर्वांत प्राचीन /जुना मानवी जीवाश्म मिळाला आहे. हा स्तर पुराचुंबकीय (Palaeomagnetic method) आणि जीवस्तरिकी (Biostratigraphy) पद्धतीनुसार सुमारे १२ लाख वर्षांपूर्वीचा आहे.
२. मधला टप्पा (Middle Phase) : (स्तर टीई १५ ते टीई १९). या कालखंडात निअँडरथल मानवाच्या अस्तित्वाचे संभाव्य पुरावे मिळाले आहेत. हा टप्पा कालमापनानुसार मध्य प्लाइस्टोसीनच्या अंतिम काळातील असून येथे मुस्टेरीअन परंपरेतील दगडी हत्यारे (Mousterian tradition) मिळाली आहेत. येथील संशोधन अद्याप चालू आहे.
३. वरचा टप्पा (Upper Phase) : (स्तर टीई २० ते टीई २१). या टप्यात अनुक्रमांतील सर्वांत वरचे थर आहेत. यांविषयी अद्याप काही माहिती उपलब्ध नाही.
कालमापन : सीमा डेल एलिफान्टे या गुहेतील गाळाच्या १६ स्तरांचे कालमापन विविध कालमापन पद्धतीने केले आहे. वैश्विक किरणजन्य न्युक्लाइड बेरिलियम-१० (10Be) व ॲल्युमिनियम-२६ (26Al) बेरिलियम-ॲल्युमिनियम (10Be/26Al½) कालमापन पद्धती वापरून सर्वांत खालच्या टप्प्यातील थरातील लाल मातीचे कालमापन केले आहे. त्यानुसार टीई ७ थर ११.३ लक्ष वर्षेपूर्व आणि टीइ ९ थर १२.२ लक्ष वर्षेपूर्व इतका जुना आहे. या थरातून प्रामुख्याने मानवी चेहरा, जबडा, अनेक प्राण्यांचे जीवाश्म आणि ओल्डॊवान परंपरेची दगडी हत्यारे प्राप्त झाली आहेत.
मधल्या टप्प्यातील टीई १६ च्या वरच्या टोकाशी व टीई १७ च्या तळाशी असलेल्या गाळाचे पुराचुंबकीय पद्धतीने कालमापन ७,८०,००० वर्षपूर्व (म्हणजे शेवटच्या चुंबकीय परावर्तनाची सीमारेषा) केले गेले आहे. त्यामुळे वरच्या टीई १७ ते टीई २१ थरांचे वय मध्य प्लाइस्टोसीन कालखंडाशी निगडित आहे. या कालमापनाला पुष्टी देणारे आहे प्रकाशउद्दीपित प्रदीपन पद्धतीने केलेले कालमापन पुढीलप्रमाणे :
टीई १६ थर – ८,६४,००० ते ८,०४,००० वर्षपूर्व
टीई १७ थर – ७,८१,००० ते ७,२४,००० वर्षपूर्व
टीई १८ थर – ५,७६,००० ते ४,८१,००० वर्षपूर्व
टीई १९ थर – २,६६,००० ते २,३७,००० वर्षपूर्व
याशिवाय टीई १८ थराच्या वरील भागात आढळलेल्या ट्रॅव्हर्टाइनचे (गरम झऱ्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या वाफमिश्रित पाण्याद्वारे निक्षेपित झालेल्या (साचलेल्या) चुनखडकाच्या प्रकारास ट्रॅव्हर्टाइन म्हणतात) कालमापन युरेनियम शृंखला पद्धतीने २,५४,००० आणि ३,०७,००० वर्षपूर्व असे आहे. यावरून मधल्या टप्प्यातील गाळाचे संचयन सागरी समस्थानिक टप्पा १५ ते ७ (Marine Isotopic stages -MIS) या काळात झाले आहे असे समजते.
मानवी जीवाश्म : २००७ मध्ये टीई ९ सी या थरातून एक मानवी जबडा सापडला. याशिवाय खालच्या जबड्यापासून वेगळ्या झालेल्या डाव्या बाजूकडील एका उपदाढेचा (एल पी ४) जीवाश्म सापडला. २००८ मधील टीई ९ सी या थराच्या उत्खननातून एक दुर्मीळ असा तळहाताच्या जवळचा बोटाचा एक तुकडा (proximal hand phalanx) जीवाश्मरूपात (एटीई ९-२) मिळाला. टीई ९ सी हा थर पुराचुंबकीय कालमापन पद्धतीनुसार आद्य प्लाइस्टोसीनकालीन आहे. या जीवाश्मांच्या अभ्यासावरून हे हाड दणकट होते आणि तुलनात्मक विश्लेषणावरून हाताची संपूर्ण रचना मागील १२-१३ लाख वर्षांपासून स्थिर राहिली असावी, असे संशोधकांचे मत आहे.

सीमा डेल एलिफान्टे येथील सर्वांत खालच्या टप्प्यातील टीई-७ या स्तरातून मानवाच्या चेहऱ्याचा डावीकडील काही भाग जीवाश्मरूपात (एटीई ७-१) मिळाला (२०२२). या विलक्षण आश्चर्यकारक शोधामुळे यूरोपमधील मानवी उत्क्रांतीसंबंधी एक नवीन दालन उघडले गेले. टीई-७ स्तराचे कालमापन १४ लाख ते ११ लाख वर्षापूर्व आहे. त्यामुळे हे जीवाश्म म्हणजे पश्चिम यूरोपमधील सर्वांत प्राचीन/जुना मानवी चेहरा आहे. या जीवाश्माला पिंक (Pink) असे नाव दिले आहे. हा चेहरा इरेक्टस मानव या मानवी जातीशी मिळताजुळता आहे आणि इरेक्टस मानवापेक्षा काही अंशी वेगळा आहे. त्यामुळे त्याची नोंद अफिनीस इरेक्टस मानव (Homo affinis erectus) अशी केली आहे. याशिवाय येथे मिळालेल्या एका अश्मीभूत मानवी दातात साठलेल्या कीटणाच्या (dental calculus) अभ्यासातून असे दिसते की, अन्नामध्ये दोन वनस्पतींपासून (Triticeae/Bromideae ट्रिटीसी/ब्रोमाइडी गटातील गवत) मिळणारे स्टार्चयुक्त कर्बोदकांसहित मांस आणि वनस्पतींचे तंतू होते. हे सर्व अन्न कच्च्या स्वरूपात खाल्ले गेले होते.

गुहेतील गाळाचे थर आणि त्यात मिळालेल्या विविध अवशेषांचा सर्वसमावेशक शास्त्रीय पद्धतीने केलेल्या अभ्यासावरून असे अनुमान काढले आहे की, सर्वांत प्राचीन मानव समूह भूमध्यसागरी हवामानात जीवन जगत होता. त्या वेळी खुले पर्यावरण (open environment) अस्तित्वात होते, ज्यामध्ये जंगले आणि जलस्रोत अत्यल्प प्रमाणात होते. परंतु हे हवामान हळूहळू खालावत गेले, ज्याचे प्रतिबिंब जीवाश्मांच्या अभ्यासातून मध्य प्लाइस्टोसीनकालीन पक्षी समुदायांच्या बदलांमध्ये दिसून येते.
सीमा डेल एलिफान्टे येथील उत्खननातून आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांमुळे मानवाचा यूरोपमधील प्रारंभिक प्रसार, उत्क्रांती आणि त्या वेळेचे पर्यावरणीय बदल यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
संदर्भ :
- ‘Atapuerca rewrites the history of Europe’s first inhabitants’, Wednesday, 12 March 2025. https://www.cenieh.es/en/press/news/atapuerca-rewrites-history-europes-first-inhabitants
- Demuro Martina; Lee J. Arnold; Josep-María Parés; Arantza Aranburu; Rosa Huguet; Josep Vallverdú; Juan-Luis Arsuaga; José-María Bermúdez de Castro; Eudald Carbonell, ‘Extended-range luminescence chronologies for the Middle Pleistocene units at the Sima del Elefante archaeological site (Sierra de Atapuerca, Burgos, Spain)’, Quaternary Geochronology (71), 2022. https://doi.org/10.1016/j.quageo.2022.101318
- José María Bermúdez de Castro; María Martinón-Torres; Aida Gómez-Robles; Leyre Prado-Simón; Laura Martín-Francés; María Lapresa; Anthony Olejniczak; Eudald Carbonell, ‘Early Pleistocene human mandible from Sima del Elefante (TE), cave site in Sierra de Atapuerca (Spain) : A comparative morphological study’, Journal of Human Evolution, 61:12-25, 2011. https://doi.org/10.1016/j.jhevol.2011.03.005
- Rosa Huguet; Xosé Pedro Rodríguez-Álvarez; María Martinón-Torres; Josep Vallverdú; Juan Manuel López-García; Marina Lozano; Marcos Terradillos-Bernal; Isabel Expósito; Andreu Ollé; Elena Santos; Palmira Saladié; Arturo de Lombera-Hermida; Elena Moreno-Ribas; Laura Martín-Francés; Ethel Allué; Carmen Núñez-Lahuerta; Jan van der Made; Julia Galán; Hugues-Alexandre Blain; Isabel Cáceres; Antonio Rodríguez-Hidalgo; Amèlia Bargalló; Marina Mosquera; Josep Maria Parés; Juan Marín; Antonio Pineda; David Lordkipanidze; Ann Margveslashvili; Juan Luis Arsuaga; Eudald Carbonell & José María Bermúdez de Castro, ‘The earliest human face of Western Europe’, Nature 640:707–713, 2025. https://doi.org/10.1038/s41586-025-08681-0
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.