एक प्रसिद्ध शिवरूप. लोककथेनुसार मूळची स्वर्गात असलेली गंगा नदी भगीरथाने अथक प्रयत्नांनी पृथ्वीवर आणली आणि तिचा भार शिवशंकरांनी आपल्या शिरावर घेतला. शिवाच्या या रूपास ‘गंगाधर’ म्हणतात. त्याबाबत प्रसिद्ध असलेली कथा अशी : सगर नावाच्या राजाने अश्वमेध यज्ञ आरंभला. त्यासाठी घोडा मोकळा सोडण्यात आला व सगर राजाचे पुत्र त्या घोड्याच्या रक्षणार्थ जात होते. हा अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला तर आपले इंद्रपद धोक्यात येईल असे वाटून इंद्राने तो घोडा पळवला आणि कपिलमुनींच्या आश्रमामागे बांधून ठेवला. सारे सगरपुत्र शोध घेत त्या आश्रमात पोहोचले; तेथे घोडा पाहून कपिलमुनींनीच तो चोरला असे त्यांना वाटले आणि त्यांनी हल्ल्याची तयारी केली. मात्र त्यांच्या गलका व गोंगाटामुळे ऋषींची समाधी भंग पावली आणि त्यांनी डोळे उघडताच त्यांच्या एका कटाक्षात त्या साऱ्या सगरपुत्रांची राख झाली.

गंगावतरण शिल्प, घारापुरी. चित्रसंदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Elephanta_Caves

सगर राजाला ही वार्ता समजली तेव्हा तो अतिशय दु:खी झाला. त्याने आपला नातू अंशुमन याला कपिलमुनींकडे पाठवले. अंशुमानाने त्यांची करुणा भाकली; ऋषींचे मन द्रवले आणि त्यांनी अंशुमनला दोन वर मागण्यास सांगितले. त्याने पहिल्या वराने यज्ञाचा घोडा आणि दुसऱ्या वराने भस्म झालेल्या सगरपुत्रांचे प्राण परत मागितले. कपिल मुनींनी घोडा परत दिला आणि सांगितले की, सगरपुत्रांच्या उद्धाराची वेळ अजून आलेली नाही. ती वेळ येईल तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमंडलूत बंदिस्त असलेल्या गंगेच्या स्पर्शाने ते जिवंत होतील. पुढे अंशुमनचा नातू भगीरथ याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. मात्र गंगा नदीचा रोरावत येणारा तो प्रवाह इतक्या भयंकर वेगाने खाली येऊ लागला की, त्यामुळे सारी जीवसृष्टी वाहून गेली असती. अशा वेळी भगवान शंकरांनी तो गंगाप्रवाह आपल्या शिरावर घेतला आणि आपल्या जटांमध्ये बांधून टाकला. गंगेला आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला होता, शिवाने तिला आपल्या जटांमध्ये गुंडाळून तिचे गर्वहरण केले. भगीरथाच्या विनंतीवरून शिवाने आपल्या जटेची एक बट मोकळी केली आणि गंगेला पृथ्वीवर उतरण्यासाठी एक सुरेख मार्ग तयार करून दिला. गंगा शिवाच्या मस्तकावर उतरते त्या मूर्तीला ‘गंगावतरण मूर्ती’ असे म्हटले जाते, तर शिवाने तिला आपल्या मस्तकी धारण केले म्हणून त्याला ‘गंगाधर शिव’ असे नामाभिधान प्राप्त झाले.

या कथेला जोडून आणखी एक उपकथा येते : भगीरथ गंगेला घेऊन पुढे निघाला तेव्हा जन्हू ऋषी त्याच्या अगदी वाटेत तपश्चर्येला बसले होते. घोंघावत येणाऱ्या गंगेने त्यांची सारी चीजवस्तू पार वाहून नेली. ऋषींना संताप आला आणि त्यांनी रागारागाने सारी गंगा पिऊन टाकली! पुनः भगीरथाने जन्हू ऋषींची प्रार्थना केली, त्यांना शांत केले, तेव्हा त्यांनी आपल्या कानातून गंगेला मुक्त केले. म्हणून गंगेला ‘जान्हवी’ असेही म्हणतात.  पुढे ही गंगा नदी त्या दुर्दैवी सगरपुत्रांच्या राखेवरूनही वाहत गेली आणि तिच्या स्पर्शाने त्यांना संजीवनी मिळाली.

गंगावतरणाची ही कथा ‘विष्णूपुराण’, ‘भागवतपुराण’आणि ‘रामायणा’त आढळते. गंगाधर शिवाच्या मूर्ती कशा असाव्यात याचे वर्णन ‘अंशुमद्भेदागम’, ‘कामिकागम’ आणि ‘कारणागम’ या ग्रंथांत दिले आहे. त्यानुसार शिव उजवा पाय पृथ्वीवर ठामपणे रोवून उभा असावा, त्याचा डावा पाय किंचित वाकलेला असावा. शेजारी उभ्या उमेला त्याने डाव्या हाताने आलिंगन दिलेले असावे आणि आपल्या पुढच्या उजव्या हाताने तिच्या हनुवटीला स्पर्श केलेला असावा. त्याच्या मागील डाव्या हातात मृग असून त्याने आपला मागील उजवा हात आपल्या जटाभारापर्यंत उंचावलेला असावा. त्याच्या जटांवर गंगेची प्रतिमा दाखवावी. शिवाच्या डाव्या बाजूस काहीशा अस्वस्थ मन:स्थितीत उभी उमा असावी. पतीने दुसऱ्या स्त्रीकडे लक्ष दिलेले पाहून वाटणारा स्त्रीसुलभ मत्सर तिच्या ठायी उमटलेला असावा. तिच्या डाव्या हातात फूल असून उजवा हात सैलसर खाली सोडलेला असावा. उमेच्या पलीकडे भगीरथ अंजलीमुद्रेत इतर ऋषीमुनींसह उभा असावा. अशा शिल्पांकनांत गंगा ही शिवाची पत्नी म्हणून (एकटी किंवा पार्वतीसह) दाखवली जाते.

गंगावतरण रेखाटन, कैलास लेणे, वेरूळ. चित्रसंदर्भ : Burgess, James., ‘Report on the Elura Cave Temples and The Brahmanical and Jain Caves in Western India’, Trubner & Co., London, 1883.

‘कामिकागम’ आणि ‘कारणागम’ या ग्रंथांत आणखी काही बारकावे नोंदलेले आढळतात. त्यानुसार शिव त्रिनेत्र असून त्याचा पुढील उजवा हात अभयमुद्रेत आणि डावा हात कटकमुद्रेत असावा. मागील दोन हातांत परशु व मृग असावेत. परशु धरलेल्या हाताने शिव आपल्या जटेला स्पर्श करत असावा. भगीरथाची उंची शिवाच्या बेंबीपर्यंत असावी. पुरातत्त्वज्ञ  गो. बं. देगलूरकर यांच्या मते, शिवाची ही प्रतिमा जर गंगावतरणाची असेल तर त्याचा मागचा उजवा हात डोक्यापर्यंत उचलून जटेला स्पर्श करत असतो आणि गंगेला आपल्या जटाभारातून पृथ्वीवर उतरण्यास मदत करतो; पण जर प्रतिमा गंगाधराची असेल तर त्याच हातात परशु, सर्प, डमरू किंवा त्रिशूळ यांपैकी एखादे आयुध असते व मागच्या डाव्या हातात मृग असते. गंगेचे ‘त्रिपथगा’ असेही नाव आहे. ऐहोळे, घारापुरी येथील शिल्पांत गंगेचे अंकन तीन मस्तके किंवा तीन रूपे असलेली असे केले आहे.

गंगावतरण– राजा रवि वर्माकृत चित्रांकन. चित्रसंदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Raja_Ravi_Varma#/media/File:Ravi_Varma-Descent_of_Ganga.jpg

घारापुरी येथील लेणीत सदाशिवमूर्तीच्या डावीकडे गंगावतरणाचे सुरेख शिल्प आहे. मध्यभागी चतुर्भुज शिव असून त्याच्या डावीकडे काहीशी रुष्ट झालेली पार्वती आहे. शिवाने आपल्या वरच्या उजव्या हाताने आपल्या केसांची एक जटा धरली आहे. या जटाभारात एक त्रिमुखी स्त्रीप्रतिमा अर्थात गंगा दिसते. शिवाच्या खालचा उजवा हात अभयमुद्रेत आहे. त्याचा वरचा डावा हात उमेच्या हनुवटीजवळ आहे, तर खालचा डावा हात भग्न झाला आहे. त्याच्या डावीकडे उभी उमा द्विभुज आहे. या दैवी जोडप्याजवळ उजवीकडे कमळावर आसनसस्थ ब्रह्मा तर डावीकडे गरुडारूढ विष्णू आहे. भगीरथ अंजलीमुद्रेत गुडघे टेकून जमिनीवर बसलेला दिसतो; आजूबाजूला सर्वत्र शिवगण, देव, यांची गर्दी आहे. वेरूळ येथील कैलास लेणीत गंगावतरणाचे एक वेगळ्या प्रकारचे शिल्प आहे. मध्यभागी चतुर्भुज शिव असून त्याच्या डावीकडे द्विभुज उमा आहे. शिवाचा खालचा डावा हात उमेच्या हनुवटीजवळ असून वरच्या डाव्या हातात परशु किंवा मृग असावे. पुढच्या उजव्या हाताने तो आपली जटा मोकळी करून गंगेला बाहेर येण्यास मदत करतो आहे असे दिसते, तर मागचा उजवा हात कट्यावलंबित आहे. त्याच्या पायाशी नतमस्तक झालेला भगीरथ आहे. वर अंजलीमुद्रेत गंगा दिसते; तिचा प्रवाह सरळ खाली येऊन योगमुद्रेत बसलेल्या जन्हू ऋषींच्या मुखापर्यंत पोहोचलेला दिसतो. खालच्या बाजूस एक हत्ती व घोडा आहेत, त्यांपैकी घोडा हा बहुधा अश्वमेधाचे प्रतीक असावा. सर्वांत खाली सगरपुत्र एका रांगेत अंजलीमुद्रेत दिसतात.

गंगाधर शिवाच्या आणखी काही वेगळ्या प्रतिमा ऐहोळे (रावणफडी लेणे), श्रीकाकुलम् (मुखलिंगेश्वर मंदिर), तंजावर (साक्षीश्वर मंदिर) येथेही आढळतात. काही ठिकाणी गंगा शिवाची पत्नी म्हणून दर्शविली जाते, त्यांपैकी एक प्रतिमा खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावर आहे.

 

संदर्भ :

  • Kramrisch, Stella, Manifestations of Shiva, Philadelphia Museum of Art, Philadelphia, 1981.
  • Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे,  १९३९; २०१२.
  • जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
  • देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१४.

समीक्षक : श्रीकांत गणवीर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.