कानेटी, एलियास (२५ जुलै १९०५ – १४ ऑगस्ट १९९४). नोबेल पुरस्कार प्राप्त जर्मन लेखक. कादंबरी, निबंध, नाटक आणि आत्मचरित्र इ. प्रकारांत लेखन प्रसिद्ध. जन्म बल्गेरियात रूझ शहरात एका सेफर्डीक ज्युईश (स्पेन व पोर्तुगालमध्ये रहिवासी यहुदी) कुटुंबात. बालपण बल्गेरियात गेले. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर कानेटी यांनी आई आणि दोन भावांसह सुरुवातीला काही वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्य केले. त्यानंतर व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), झुरिक (स्वित्झर्लंड), फ्रँकफुर्ट (जर्मनी) मध्ये शालेय शिक्षण. व्हिएन्ना विद्यापीठातून रसायनशास्त्रामध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली (१९२९). असे असले तरी, साहित्यलेखन हेच त्यांचे महत्त्वाचे कार्यक्षेत्र राहिले. कानेटी यांची वैचारिक जडणघडण बहुभाषिक वातावरणात झाली. त्यांची मातृभाषा स्पॅनिश असून व्हिएन्नात राहत असताना वयाच्या आठव्या वर्षी जर्मन भाषेशी सर्वप्रथम परिचय झाला. त्यांच्या अभिव्यक्तीचे मुख्य माध्यम जर्मनच होते. त्याशिवाय इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. जर्मन भाषा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे, असे कानेटी यांना वाटत असे.

https://commons.wikimedia.org/wiki/Category:Elias_Canetti#/media/File:Elias_Canetti_2.jpg
व्हिएन्नात विद्यार्थी म्हणून राहत असताना कार्ल क्राऊस (१८७४-१९३६), हेरमान ब्रोख (१८८६-१९५१), फ्रांट्स वेरफेल (१८९०-१९४५), गुस्ताव मालर (१८६०-१९११) अशा नावाजलेल्या लेखक, कलाकार व बुद्धिवंतांशी त्यांचा संपर्क आला. कार्ल क्राऊस यांच्या विचारांचा तरुण कानेटींवर विशेष प्रभाव पडला. त्यांचा विवाह ऑस्ट्रियन कादंबरी व नाटककार वेनेत्सीयाना टाउबर-कॅलडेरॉन (Venetiana Taubner-Calderon) (टोपणनाव वेत्सा माग्ड) (१८९७-१९६३) यांच्याशी झाला (१९३४). साहित्यिक लिखाणात त्या कानेटींच्या सहायकही होत्या. कानेटी यांच्या पत्नीने लिहिलेली जर्मन कादंबरी दी गेल्बं श्ट्रासं (Die gelbe Straße) तिच्या मृत्यूपश्यात सुमारे तीन दशकांनंतर प्रकाशित झाली (१९९०). लग्नानंतरही प्रसिद्ध शिल्पकार गुस्ताव मालर ( १८६०-१९११) यांची मुलगी आना मालर (१९०४-१९८८ ) यांच्याशी कानेटींची असलेली जवळीक सर्वज्ञात आहे. ऑस्ट्रिया नाझी जर्मनीचा भाग बनल्यावर ते लंडनला स्थलांतरित झाले (१९३८). येथे चित्रकार मेरी-लुईझ फॉन मोतेसित्स्की (१९०६-१९९६), लेखिका फ्रिडा बेनेडिक्ट (१९१६-१९५३) व आयरिस मरडॉक (१९१९-१९९९) यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर हेरा बुशोर (१९३३-१९८८) यांच्याशी लग्न केले (१९६३). दुसऱ्या लग्नातून त्यांना एक आपत्य होते. दरम्यान कानेटी यांना ब्रिटनचे नागरिकत्व बहाल झाले (१९५२).
दी गेरेटेटं त्सुंगं (Die gerettete Zunge) (१९७७), दी फाकेल इम ओर. आयनं लेबेन्सगेशिष्ट (Die Fackel im Ohr. Eine Lebensgeschichte) (१९८०-८५) आणि दास औगेनश्पील आयनं लेबेन्सगेशिष्ट (Das Augenspiel. Eine Lebensgeschichte) (१९८०-८५) या तीन टप्प्यांत प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात्मक लेखनात कानेटी यांचे बालपण, विविध भाषांच्या सान्निध्यात झालेली त्यांची जडणघडण, शालेय आयुष्य, साहित्यिक म्हणून प्रवास अशा विविध विषयांचा उलगडा होतो.
साहित्यिक म्हणून कानेटी दीर्घ काळ उपेक्षित राहिले. दी ब्लेंडुंग (Die Blendung) (१९३५) या कादंबरीच्या १९६३ सालात प्रकाशित झालेल्या नव्या आवृत्तीमुळे कानेटींना लोकप्रियता लाभली. जर्मन समीक्षकांप्रमाणे या कादंबरीमुळे थोडे उशिरा का होईना, परंतु कानेटींना सॅम्युएल बेकेट (१९०६- १९८९), फ्रांट्स काफ्का (१८८३-१९२४), जेम्स जॉइस (१८८२-१९४१) यांसारख्या विसाव्या शतकातील दिग्गज लेखकांच्या पंक्तीत स्थान प्राप्त झाले. एका बुद्धिवंताचे नैतिक अधःपतन आणि मानवी मूल्यांचा ऱ्हास हा या कादंबरीचा मूलभूत आशय आहे. यात चिनी भाषा आणि वाङ्मयाचा अभ्यासक पीटर कीनने आपल्या असंख्य ग्रंथांच्या सान्निध्यात स्वतःला हरवून लौकिक जगापासून, समाजापासून अलिप्त ठेवले आहे. त्याच्याकडे घरकाम करणाऱ्या स्त्रीशी लग्न हीच त्याच्या नैतिक पतनाची सुरुवात. तो अनेक व्यसनांना बळी पडतो, पॅरिसमध्ये राहणारा त्याचा मित्र या गर्तेतून त्याला बाहेर काढण्यास असफल ठरतो. कीन आपल्याच ग्रंथालयात सर्व पुस्तकांचा ढीग रचून त्याबरोबर स्वतःला पेटवून संपवतो. आधुनिक काळातील नातेसबंधांतील हरवलेपण, नैतिक मूल्यांची पडझड, संवादाचा अभाव असे या कादंबरीच्या कथानकाचे काही पैलू ठळकपणे समोर येतात. काही समीक्षकांच्या मते १९३०च्या दशकाच्या सुरुवातीला जर्मनीमध्ये चालू असलेल्या समाजातील गोंधळाचे चित्रण या कादंबरीत येते.
कानेटी यांना आधुनिक कादंबरी दी ब्लेंडुंग (Die Blendung) (१९३५), तसेच जमावाच्या वर्तनावर केलेले मानसशास्त्रीय संशोधन मासं उंड माख्ट (Masse und Macht) (१९६०), आत्मचरित्रात्मक लेखन दी गेरेटेटं त्सुंगं (Die gerettete Zunge) (१९७७) व इतर लेखनातील व्यापक दृष्टिकोन व वैचारिक संपदेमुळे १९८१ मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले. याशिवाय त्यांना गीयोर्ग ब्यूशनर प्राइज, नेली जाक्स प्राइज, गॉटफ्रीड केलर प्राइज, फ्रांट्स काफ्का प्राइज व ‘ग्रँड मेरिट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट’ ही पारितोषिके मिळाली. त्याशिवाय त्यांना मँचेस्टर व म्युनिच विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली गेली.
समूहामुळे प्रेरित होऊन घडणाऱ्या माणसांच्या हालचाली आणि कृत्य किंवा गर्दीचे मानसशास्त्र, मृत्यूची अपरिहार्यता, त्याचा मानवी आयुष्यावर परिणाम असे काही ठळक विषय कानेटी यांच्या लेखनात दिसतात. आधुनिकतावाद काळातील या महत्त्वाच्या लेखकाने आयुष्याच्या उत्तरार्धातील सुमारे वीस वर्षे स्वित्झर्लंडमध्ये व्यतीत केली.
झुरिक (स्वित्झर्लंड) येथे निधन झाले.
संदर्भ :
- Beutin, Wolfgang; Beilein, Matthias et al (Hrsg): Deutsche Literaturgeschichte: Von den Anfängen bis zur Gegenwart. Berlin: Metzler Verlag, 9. Überarbeitete Auflage. 2019.
- Elias Canetti – Facts. NobelPrize.org. Nobel Prize Outreach 2025. Sat. 29 Nov 2025. <https://www.nobelprize.org/prizes/literature/1981/canetti/facts/>
- Jens, Walter (Hrsg.): Kindlers Neues Literatur Lexikon. Bd. 3. München: Kindler Verlag, 1988.
- Killy, Walther (Hrsg): Deutsche Autoren. Vom Mittelalter bis zur Gegenwart. Band 1. München: Bertelsmann Verlag. 1994.
- Oßmann, Heidi; Pflüger, Christel et al (Hrsg): Metzler Autoren Lexikon. Deutschsprachige Dichter und Schriftsteller vom Mittelalter bis zur Gegenwart. Stuttgart: Metzger Verlag. 1986.
समीक्षक : श्रीकांत अरुण पाठक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.