रणदिवे, कमल जयसिंग : (८ नोव्हेंबर १९१७ – ११ एप्रिल २००१). भारतीय जैव-वैद्यक संशोधिका. कर्करोग आणि विषाणू यांच्यासंबंधांवरील संशोधनासाठी त्या सुविख्यात होत्या. वैद्यक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (१९८२). इंडियन विमेन सायंटिस्ट्स ॲसोसिएशनच्या (आयडब्ल्यूएसए; IWSA) त्या संस्थापक-सदस्या होत्या.
रणदिवे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण हुजूरपागा (प्रत्यक्ष नाव हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल) या प्रशालेत झाले. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी त्यांच्या वडलांची इच्छा होती, परंतु त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात वनस्पती व प्राणीविज्ञान हे मुख्य विषय घेऊन पदवी संपादन केली (१९३४). पुढे त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी मिळवली (१९४३). पदव्युत्तर पदवीत त्यांचा अॅनोनेसी (सीताफळ कुल) कुलातील पेशीजननशास्त्र हा मुख्य विषय होता. त्यानंतर त्या मुंबईमध्ये टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्यात. त्यांनी विकृतिविज्ञानातील (पॅथॉलॉजी) तज्ञ आणि ईंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक वसंत रामजी खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली (१९४९). पुढे त्यांच्याच सल्ल्याने त्यांनी जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, बाल्टिमोर येथील जॉर्ज गे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊती-संवर्धन तंत्रज्ञानावर संशोधन केले.
रणदिवे यांनी भारतात परतल्यानंतर पुन्हा इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करू लागल्या. तेथे त्यांनी प्रायोगिक ऊती-संवर्धन प्रयोगशाळा आणि प्रायोगिक जीवविज्ञान विभाग सुरू केले. त्यांनी काही काळ इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरच्या संचालकपदाची जबाबदारीसुद्धा सांभाळली (१९६६—१९७०). तेथे कार्यरत असतांना त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ऊती-संवर्धनासाठी आवश्यक वृद्धी मिश्रणे आणि रसायनांची निर्मिती करण्यात यश मिळवले. तसेच तेथे लार्कारोग पेशी, प्रतिक्षमता आणि पेशीविज्ञान संशोधन विभाग नव्याने चालू करण्यात महत्त्वाचा सहभाग घेतला. कर्करोग पेशींचे विकृतिक्रियाविज्ञान (पॅथॉलॉजी-सायालॉजी) प्राण्यांवरील प्रयोगातून करताना त्यांनी केलेल्या स्तन कर्करोग, रक्ताचा कर्करोग आणि ग्रसनी कर्करोगावर केलेले काम महत्त्वपूर्ण होते.
रणदिवे यांचे महत्त्वाचे संशोधन कर्करोग, संप्रेरके आणि विषाणुजन्य कर्करोग यांच्यातील परस्पर संबंध हे होते. कुष्ठरोग जीवाणू (मायकोबॅक्टेरियम लेप्री) यामुळे झालेल्या कुष्ठरोगावरील लसीमुळे संबंधित कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले. स्त्रियांच्या सहभागामुळे स्त्रिया आणि बालकामधील कर्करोगावर संशोधन करण्याची प्रेरणा त्यांनी इतर संशोधकांना दिली. आदिवासी समूहातील रक्ताच्या, प्रतिक्षमता रक्ततपासण्या (इम्युनोहिमॅटोलॉजी) हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य भाग होता.
रणदिवे यांनी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये विकृतिविज्ञान विभागात उंदराच्या बाह्य स्तन लक्षणावरून स्तन कर्करोग ओळखण्यावर केलेला तुलनात्मक अभ्यास यावर संशोधन केले होते. स्तन कर्करोगावर अधिक भर दिला पाहिजे असे त्यांनी सूचवले होते. स्तन कर्करोग, स्त्रीला झालेल्या मुलांची संख्या, स्तन ऊती रचना यांचा सहसंबंध त्यांनी शोधून काढला.
रणदिवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ‘सत्य निकेतन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात आदिवासी बालकांच्या पोषणावर पथदर्शी कार्य केले. इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आरोग्य आणि वैद्यकीय सेवा प्रकल्प त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण राजापूर आणि परिसरातील खेड्यामध्ये राबवला.
रणदिवे यांना पद्मभूषण पुरस्काराशिवाय पुढील मानसन्मान प्रदान करण्यात आले : मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडून सिल्वर ज्युबिली रिसर्च ॲवार्ड (१९६४), जी जे वाटुमल फाउन्डेशन प्राइझ (१९६४), इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा गुणश्री वैद्यकीय संशोधक म्हणून सन्मान. त्यांचे कर्करोग आणि कुष्ठरोग यांवर दोनशे शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून काही महत्त्वाचे शोधनिबंध पुढीलप्रमाणे : पान आणि मुख कर्करोग यांच्यावरील हॅमस्टर प्राण्यावरील संशोधन, युरेथेन हा कवकरोधी आणि कीटकरोधी रसायनाचा न्यूक्लिक आम्लावरील परिणाम, नर उंदरावरील प्लीहा काढल्याने होणारा रक्त कर्करोग आणि आयसीआरसी उंदरामधील स्तन कर्करोग विषाणू.
कमल रणदिवे यांचे पुणे येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #कर्करोग #कुष्ठरोग #पेशी #प्रतिक्षमता #पेशीविज्ञान
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Kamal_Ranadive
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.