वासना या संकल्पनेचा सर्वसामान्य अर्थ इच्छा किंवा कामना असा होतो. परंतु महर्षी पतंजलींनी ‘पातंजल योगसूत्र’ ग्रंथातील कैवल्यपाद या चौथ्या प्रकरणात ७ ते ११ या सूत्रांत ‘वासना’ ही भारतीय मानसशास्त्राशी निगडीत महत्त्वाची संकल्पना मांडली आहे. जीवाने केलेल्या प्रत्येक कर्माद्वारे उत्पन्न झालेल्या संस्कारातून बनलेल्या त्याच्या स्वभावाचा एक विशिष्ट आकृतिबंध म्हणजे वासना होय. ही वासना जीवाच्या वर्तनातून प्रकट होते. उदा., मनुष्य स्वभाव हा त्याच्या चित्तातील वासनांचीच अभिव्यक्ती असते. वासना या चित्तामध्ये सूक्ष्म रूपाने अवस्थित असतात आणि त्यांची अभिव्यक्ती विविध प्रसंगांमध्ये आणि घटनांमध्ये जीवाच्या वर्तनातून व्यक्त होत असते. पुढील नोंद महर्षी पतंजली यांनी पातंजल योगसूत्रात मांडलेल्या वासना या संकल्पनेविषयी आहे.
योगदर्शनानुसार मन, अहंकार व बुद्धी यांना एकत्रितपणे चित्त ही संज्ञा वापरतात. सांख्यदर्शनानुसार केवळ पुरुष (आत्मा) हाच चैतन्यमय असून इतर २४ तत्त्वे अचेतन आहेत. अर्थातच ‘चित्त’देखील अचेतन आहे. जीवाद्वारे होणाऱ्या प्रत्येक कर्माची नोंद संस्कार रूपाने चित्तात होते. कर्म जरी शरीराद्वारे होत असले, तरी मुळात कर्म मानसिक पातळीवर होत असते आणि प्रत्येक कर्मातून एक संस्कार उत्पन्न होतो. सत्कृत्यांपासून पुण्यरूप संस्कार तर दुष्कृत्यांपासून पापरूप संस्कार तयार होतात. दोन्ही प्रकारांच्या कर्मांचे संस्कार चित्तात संचित होत असतात. प्रत्यक्ष कृतीतून घडलेले शारीरिक कर्म असते आणि मनात निर्माण झालेल्या विचारांचे मानसिक कर्म असते. कर्मांपासून उत्पन्न झालेल्या संस्कारांना कर्मजन्य संस्कार म्हणतात.
कर्मसिद्धांतानुसार प्रत्येक कर्माचे फळ मिळत असते. या कर्मफलाला ‘विपाक’ म्हणतात. चित्तातील सर्व कर्मसंस्कारांच्या विपाक प्राप्त करून घेण्यासाठी जीव जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांत अडकून पडतो.
चित्त प्रत्येक घटनेची नोंद ठेवत असते आणि जेव्हा कधी त्याचप्रकारचा प्रसंग उद्भवतो तेव्हा चित्त पूर्वी केलेल्या कर्माप्रमाणेच पुन्हा नवीन कर्म करण्यास उद्युक्त होते आणि जीवदेखील नकळत प्रत्येकवेळी पूर्व संस्कारानुसार कर्म करत राहतो. अशाप्रकारे विशिष्ट घटना आणि विशिष्ट प्रकारचे संस्कार किंवा आशय चित्तात साठवले जातात. या विविध प्रकारच्या आशयांचे विशिष्ट आकृतिबंध तयार होतात. त्यांनाच ‘वासना’ अशी संज्ञा महर्षी पतंजलींनी दिली आहे.
चित्त अचेतन असल्यामुळे ते स्वत: सजगपणे कोणताही निर्णय घेण्यास असमर्थ असते आणि केवळ यांत्रिकरित्या पूर्व-कृतीप्रमाणे उद्युक्त होत असते. चित्तात असंख्य प्रकारच्या वासना असतात. त्यामुळे वासनांचे अनेक आकृतिबंध संग्रहित असून वेगवेगळ्या प्रसंगी मनुष्य विभिन्न पद्धतीने वर्तणूक करतो.
वासना चित्तात अत्यंत प्रबळ असतात. विशिष्ट प्रकारची कृती करताना जीव वारंवार नकळतपणे चित्तातील विशिष्ट आकृतिबंधाप्रमाणे म्हणजेच वासनांबरहुकूम व्यक्त होत असतो. यालाच व्यक्ती स्वभाव किंवा व्यक्तिमत्त्व म्हणतात. अर्थात व्यक्तिमत्त्व निर्मितीसही वासनाच जबाबदार असतात.
चित्तात अनेक वासना असल्या तरी त्यांचे प्रकटीकरण एकाचवेळी होऊ शकत नाही आणि वासना प्रकट होण्याकरिता विशिष्ट आलंबनाची म्हणजेच उद्बोधकाची आवश्यकता असते. अन्यथा ती वासना चित्तात सूक्ष्म रूपात वास करून राहते. अर्थात विशिष्ट प्रकारच्या वासना विशिष्ट कर्मविपाकांपासून प्रकट होत असल्या तरी चित्तातील इतर वासना मात्र नष्ट होत नाही.
वासना केवळ एका जन्मापासून नसून त्या पूर्व जन्मापासून आलेल्या असतात, असे प्रतिपादन महर्षी पतंजली करतात. अर्थातच त्या प्रवाही असतात. एका जन्मातून दुसऱ्या जन्मात संक्रमण करतात. कर्मसिद्धांतानुसार जीवाला जी योनी प्राप्त होते त्या योनीनुसार त्याने केलेल्या कर्माप्रमाणे कर्मविपाकानुसार चित्तातील वासना प्रकट होत असतात. पूर्व योनीतील इतर वासना नष्ट होत नाहीत आणि सुयोग्य योनी प्राप्त होईपर्यंत चित्तात वास करून राहतात.
सांख्यदर्शन आणि योगदर्शनांमध्ये स्वीकारलेल्या सत्कार्यवादाच्या सिद्धांतानुसार कुठल्याही प्रकारे वासना नष्ट होत नाही. जाती, स्थल व काल किंवा वेळ यांचाही परिणाम वासनांवर होत नाही.
योगदर्शनानुसार कर्माचे कृष्ण कर्म, शुक्ल कर्म, मिश्र कर्म व अशुक्ल-अकृष्ण असे चार प्रकार आहेत. त्यापैकी पहिल्या तीन कर्मातून संस्कार निर्माण होतात. आणि ते चित्तात जमा होतात. त्यांना कर्माशय वा कर्मसंचय म्हणतात. या कर्मांच्या विपाकापासून चित्तात आधीच असलेल्या अनुरूप वासना प्रकट होतात. योग्यांद्वारे केलेले कर्म अशुक्ल-अकृष्ण प्रकाराचे असते. विवेकख्यातीच्या प्राप्तीनंतर योग्याच्या चित्तात क्लेश नसल्यामुळे चित्तवृत्ती अक्लिष्ट (क्लेशरहित) असतात तसेच वासनारहित असतात.
कर्मविपाक जाती (जन्म), आयु व भोग या तीन प्रकारांचे असतात. प्रत्येक योनीतील वासना भिन्न भिन्न असतात. जीव ज्या जातीत शरीर धारण करेल, त्यानुसार कर्मविपाक प्राप्त होऊन चित्तातील अनुकूल वासनांचा उद्भव होतो. प्रत्येक योनीमध्ये जीवाला योनीप्रमाणे भिन्न आयुष्य मिळते. उदा., मनुष्य योनीमध्ये जीवाला कीटक योनीपेक्षा प्रदीर्घ आयुष्य मिळते. त्यामुळे मनुष्य योनीत अनेक वासनांचा उद्भव होतो आणि कीटक योनीत प्रमाणाने कमी वासनांचे प्रकटीकरण होते. जीवनातील अनुभव म्हणजेच भोग घेत जीव प्रसंगांना सामोरा जातो, त्याला अनुसरून चित्तातील वासनांचे प्रकटीकरण होते. सुख-दु:ख यांच्या अनुभवावरून चित्तात भिन्न भिन्न वासना अभिव्यक्त होतात.
वासना अनादी आहेत परंतु त्या अनंत नाहीत. अन्यथा वासनांपासून मुक्ती मिळू न शकल्याने जीव कायम बंधनातच राहील आणि जीवाला कधीही मोक्ष प्राप्त होणार नाही. चित्तातील वासनांवर नियंत्रण मिळवून बंधनातून मुक्त होण्यासाठी महर्षी पतंजलींनी हेतु, फल, आश्रय व आलंबन या चार तत्त्वांचा अभाव होणे आवश्यक आहे, असे सांगितले आहे. अभाव येथे ‘अनभिव्यक्ती’ या अर्थाने वापरला आहे. कारण योगदर्शन सत्कार्यवादाचा स्वीकार करीत असून कोणतीही गोष्ट नव्याने उत्पन्न होत नाही अथवा नष्ट होत नाही.
हेतु : वासनांच्या निर्मितीला अविद्या हा क्लेश कारणीभूत आहे. क्लेशयुक्त कर्मांमुळे संस्कार निर्माण होतात. संस्कारांचेच विपाक बनून चित्तातील अनुकूल वासना प्रकट होतात. म्हणूनच वासनांचा हेतु (कारण) अविद्या आहे. विवेकख्याती प्राप्त झाल्यानंतर अविद्या दूर होते आणि वासना देखील निर्माण होत नाही.
फल : वासनांचे फल विपाक आहेत. वासनांचे अनुकरण करण्याच्या स्वभावाला अनुसरून जे कर्म केले जाते त्या कर्मांतूनच धर्म-अधर्म वा पुण्य-पाप हे संस्कार चित्तात निर्माण होतात आणि या संस्कारातून जाती, आयु व भोग या तीन प्रकारचे विपाक प्राप्त होतात आणि हेच वासनांचे फल आहे.
आश्रय : ज्या चित्ताचे पुरुषाला (आत्म्याला) भोग प्रदान करण्याचे कार्य संपन्न झालेले नाही असे चित्त वासनांचे आश्रयस्थान असते. विवेकख्याती प्राप्त झाल्यावर पुरुषाला अपवर्ग (मोक्ष) मिळतो. म्हणजेच पुरुष व चित्त वेगळे होतात. ज्या चित्ताचे भोग व अपवर्गाचे कार्य पूर्ण झाले आहे अशा चित्तातील वासना निष्क्रिय होऊन राहतात.
आलंबन : चित्तातील सूक्ष्म वासना प्रकटीकरणासाठी जी वस्तू, विषय किंवा व्यक्ती कारणीभूत ठरते, त्या उद्बोधक तत्त्वाला आलंबन म्हणतात. जर उद्बोधक तत्त्वच नसेल, तर वासनांचे प्रकटीकरण असंभव आहे.
संदर्भ :
- दशोरा, नन्दलाल,‘पातंजल योगसूत्र, योगदर्शन’, रणधीर प्रकाशन, हरिद्वार, १९९७.
- ब्रह्मलीन मुनि, स्वामी, ‘पातञ्जलयोगदर्शनम्: व्यासभाष्य सहित शोधपूर्ण संस्करण’, चौखम्भा प्रकाशन, वाराणसी, २०१०.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.