फेअरबँक्स, डग्लस सिनियर (Fairbanks, Douglas Senior) : (२३ मे १८८३—१२ डिसेंबर १९३९). अमेरिकन मूक चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता व निर्माता आणि हॉलिवुड मूकपट सृष्टीतील आद्य महानायक.

फेअरबँक्स यांचा जन्म अमेरिकेतील डेनवर शहरात झाला. त्यांचे वडील हेझेकिया चार्ल्स उलमन हे उत्तरेकडील पेनसिल्वेनिया राज्यातील रहिवासी होते. ते पेशाने वकील होते तसेच ते अमेरिकन यादवी युद्धात संघराज्याच्या बाजूने कॅप्टन म्हणून लढले होते. तर आई एला ॲडलेड दक्षिणेकडील जॉर्जिया राज्यातील. व्यसनाधीन नवऱ्याच्या परित्यागामुळे, डग्लसच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून आईनेच त्याचे संगोपन केले. तिने त्याची ज्यू ओळख लपविण्यासाठी उलमन हे आडनाव बदलून आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीचे फेअरबँक्स हे आडनाव त्याला लावले.

फेअरबँक्स याने शालेय वयापासूनच रंगमंचावर लहानमोठी कामे करण्यास सुरुवात केली. १९०० साली त्याने न्यूयॉर्क शहरात स्थलांतर करून ब्रॉडवेवरील नाटकांत पदार्पण केले. ‘मॅन ऑफ द अवर’ या नाटकातील त्याची भूमिका गाजली, पण अवघ्या सात वर्षांत त्याने नाट्यक्षेत्राला रामराम ठोकून ॲना बेथ सॅली या एका उद्योगपतीच्या मुलीशी लग्न केले आणि तो तिच्या वडिलांनी चालू केलेल्या व्यवसायात रमला. त्यांचा मुलगा डग्लस फेअरबँक्स ज्युनिअर हा ही मोठेपणी नामवंत अभिनेता झाला.

सासऱ्याचा धंदा बुडीत गेल्यावर फेअरबँक्सने पुन्हा अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला; मात्र यावेळेस न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे रंगभूमी सोडून त्यांनी लॉस एंजेलिसमधील हॉलिवुडची दारे ठोठावली आणि १९१५ साली डेव्हिड वॉर्क ग्रिफिथ या नामवंत दिग्दर्शकाच्या ‘द लॅम्ब’ या मूकपटातून आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. ग्रिफिथला आपल्या या नवीन नायकाचा शारीरिक धसमुसळेपणा फारसा पसंद नव्हता; पण सामान्य प्रेक्षकांना हा नवीन नायक आपल्यातला वाटला. १९१६ ते १९१९ या ऐन पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांचे तब्बल ३१ मूकपट प्रदर्शित झाले आणि व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाले. त्या काळात हॉलिवुडमधील सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या पहिल्या तीन कलाकारांमध्ये फेअरबँक्स यांची गणती होती.

१९१९ मध्ये फेअरबँक्स यांनी चार्ली चॅप्लिन, मेरी पिकफर्ड आणि डेव्हिड वॉर्क ग्रिफिथ यांच्या सोबतीने ‘युनायटेड आर्टिस्ट’ ही स्वतंत्र निर्मिती आणि वितरण संस्था स्थापन केली. ज्यायोगे तेथील चित्रपट निर्मितीमधील नामवंत संस्था आणि वितरक यांची मक्तेदारी कमी झाली आणि कलाकारांना चित्रपटाच्या आर्थिक यशात सिंहाचा वाटा मिळू लागला. हॉलिवुडचा आर्थिक व्यवहार डोलारा त्यामुळे कायमचा बदलला.

‘युनायटेड आर्टिस्ट’ची पहिलीच निर्मिती ‘द मार्क ऑफ झोरो’ (१९२०) या विनोदी देमार शैलीतील मूकपटाने फेअरबँक्स यांना अभिनेता म्हणून प्रचंड व्यावसायिक यश मिळाले. त्यानंतर आलेले ‘द थ्री मस्केटिअर्स’ (१९२१), ‘रॉबीनहूड’ (१९२२), ‘द थिफ ऑफ बगदाद’ (१९२४), ‘द ब्लॅक पायरेट’ (१९२६), ‘द गोउचो’ (१९२७), ‘द आयरन मास्क’ (१९२९), ‘द टेमिंग ऑफ द श्रू’ (१९२९) या चित्रपटांनी त्याच्यावर “हॉलिवुडचा राजा” ही मोहोर उठवली. पुढील काळातील पोशाखी आणि देमार चित्रपट नंतर याच साच्यात बनू लागले. त्यांनी एकंदर ५१ चित्रपटांत भूमिका केल्या. देमार कथानकावर आधारित त्यांचे मूकपट तिकिटबारीवर प्रचंड यशस्वी झाले. मारामारी, घोडेस्वारी, तलवारबाजी इत्यादी वेगवेगळे धाडसी प्रकार ते स्वतः करत. घोडेस्वारी आणि तलवारबाजीत निपुण असल्यामुळे त्यांची शास्त्रशुद्ध व देखणी तलवारबाजी पाहण्यासाठी लोक त्यांचे मूकपट पाहायला गर्दी करत. त्यांचे पडद्यावरील मर्दानी धाडसी व्यक्तिमत्त्व, स्त्रीदाक्षिण्य, निरागसता आणि नैसर्गिक प्रामाणिकपणा यामुळे ते हॉलिवुड मूकपट सृष्टीतील पहिले आणि सर्वश्रेष्ठ महानायक मानले गेले.

फेअरबँक्स यांनी १९२० साली आपल्या प्रथम पत्नीस घटस्फोट देऊन तत्कालीन आघाडीची अभिनेत्री मेरी पिकफर्ड यांच्याशी लग्न केले. या दोन लोकप्रिय ताऱ्यांचा विवाह लोकांना खूप पसंद पडला. अनभिषिक्त शाही दांपत्य अशी त्यांची ओळख झाली.

१९२७ साली ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्स’ या जगप्रसिद्ध संस्थेची स्थापना करण्यात या दोघांचा मोलाचा वाटा होता. १९२९ सालच्या पहिल्यावाहिल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे फेअरबँक्स यांनी सूत्रसंचालन केले आणि १४ पुरस्कार स्वहस्ते प्रदान केले. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत त्यांना एकही ऑस्कर पुरस्कार मिळाला नाही. १९२९ साली त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात चित्रपट अभ्यास विषयाला वाहिलेले ‘स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स’ सुरू करून  चित्रपट रसग्रहण (photoplay appreciation) या विषयावर शुभारंभाचे व्याख्यान दिले.

१९१७ मध्ये ‘लाफ अँड लिव्ह – सेल्फ हेल्प गाईड टू ए जॉयफूल लाईफ’ नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले. त्यांनी लिहिलेले विविध लेखन ‘डग्लस फेअरबँक्स – इन हिज ओन वर्ड्स’ या नावाने संकलित केलेले आहे.

बोलपटाच्या उदयानंतर फेअरबँक्स यांची अभिनेता म्हणून कारकीर्द उतरणीस लागली. १९३६ साली त्यांनी चित्रपट अभिनयातून संन्यास घेतला; पण निर्माता म्हणून ते शेवटपर्यंत काम करत राहिले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी खूप लोकप्रिय चित्रपटांत कामे केली आणि अमेरिकन चित्रपटसृष्टीवर अविस्मरणीय अशी छाप सोडली. दुर्दैवाने तत्कालीन चित्रपट अभ्यासकांनी त्यांच्या कारकीर्दीची विशेष नोंद घेतली नाही, त्याचे कारण कदाचित हे असावे की कथाकथन, स्टंट्स, निर्मिती आदी गोष्टी त्यांनी खूपच हसतमुखपणे सहज रीत्या केल्या आणि तशा प्रकारच्या चित्रपटांना निव्वळ लोकप्रिय गणले जात असे.

डग्लस फेअरबँक्स यांचे वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी अमेरिकेतील सांता मोनिका, कॅलिफोर्निया या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. १२व्या ऑस्कर पुरस्कार समारंभात त्यांना पहिल्या मरणोत्तर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ :

  • Goessel, Tracey, The First King of Hollywood: The Life of Douglas Fairbanks, Chicago, 2015.

समीक्षण : अनिल झणकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.