आंग्रे, मानाजी कान्होजी :  (मृत्यू : १२ सप्टेंबर १७९८). सरखेल आंग्रे घराण्यातील एक कर्तबगार पुरुष. मानाजी आंग्रे हे कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या द्वितीय पत्नी राधाबाई ऊर्फ लक्ष्मीबाई यांचे पुत्र होते. त्यांना तुळाजी हा सख्खा भाऊ होता, तर सेखोजी, संभाजी, येसजी आणि धोंडजी हे सावत्रभाऊ होते. कान्होजी आंग्रे यांच्या संस्कारात वाढलेल्या मानाजींना लहानपणापासूनच समुद्राच्या लाटांशी खेळण्याचे आणि युद्धकलेचे बाळकडू मिळाले होते. कान्होजी आंग्रे यांच्या हयातीत सर्व भाऊ जरी एकत्र असले, तरी वडिलांच्या निधनानंतर (१७२९) सत्तेच्या विभागणीवरून त्यांच्यात संघर्षाची बीजे पेरली गेली.

आंग्रे बंधूंमधील गृहकलह मराठा साम्राज्याच्या आरमारी सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनला होता. सेखोजी आंग्रेंच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी यांच्यातील सत्तासंघर्ष विकोपाला गेला. संभाजींच्या झंझावातापुढे मानाजींचा टिकाव लागत नव्हता, तेव्हा त्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडे मदतीची याचना केली. पेशव्यांनी या संधीचा धोरणात्मक उपयोग करण्याचे ठरवले. आंग्र्यांची एकसंध शक्ती पेशव्यांच्या अधिकाराला वेळोवेळी आव्हान देत असे, त्यामुळे ही शक्ती विभागली जाणे पेशव्यांना राजकीयदृष्ट्या सोयीचे वाटत होते. परिणामी, फेब्रुवारी १७३५ ते एप्रिल १७३५ या काळात बाजीराव पेशव्यांनी स्वतः कुलाब्यात मुक्काम ठोकून मानाजींना लष्करी व राजकीय पाठबळ दिले.

या संघर्षावर पडदा टाकण्यासाठी २ एप्रिल १७३५ रोजी अलिबाग जवळील ‘नवदरे’ येथे एक ऐतिहासिक तह झाला. या तहान्वये आंग्रे दौलतीची दोन भागात विभागणी करण्यात आली. मानाजी आंग्रे यांना ‘वजारत-म-आब’ हा नवा किताब देऊन कुलाबा आणि उत्तर कोकणचा प्रदेश सोपवण्यात आला. दुसरीकडे, संभाजी आंग्रे यांना वडिलोपार्जित ‘सरखेल’ पद देऊन सुवर्णदुर्ग आणि दक्षिण कोकणचा प्रदेश देण्यात आला. या विभागणीमुळे मराठा आरमारी शक्ती दुभंगली आणि मराठ्यांचा समुद्रावरील दबदबा कमी झाला. या अंतर्गत दुहीचा आणि कमकुवत झालेल्या आरमारी शक्तीचा फायदा पुढे इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांसारख्या परकीय सत्तांनी आपले पाय रोवण्यासाठी घेतला.

आंग्रे बंधूंमधील (संभाजी आणि मानाजी) अंतर्गत कलहाचा फायदा घेत जंजिऱ्याच्या सिद्दीने कोकण किनारपट्टीवर पुन्हा डोके वर काढले होते. सिद्दी सात याने मराठ्यांच्या मुलखात धुमाकूळ घालून रयतेला त्रस्त केले होते. ही परिस्थिती ओळखून छत्रपती शाहूंच्या आज्ञेनुसार पेशव्यांनी सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. मानाजी आंग्रे यांनी आपल्या भावाशी असलेले मतभेद बाजूला सारून या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या चिमाजी आप्पांना मोलाची साथ दिली.

मराठ्यांची शक्ती क्षीण व्हावी म्हणून इंग्रजांनी छुप्या पद्धतीने सिद्दीला सिद्दीला आरमारी व युद्धसाहित्याची मदत पुरवली होती. मात्र, मानाजींच्या आरमाराने समुद्रावरून सिद्दीची रसद तोडली. मोहिमेचा परमोच्च बिंदू १९ एप्रिल १७३६ रोजी गाठला गेला. तेव्हा चिमाजीआप्पांच्या नेतृत्वाखालील मराठा फौजेने ‘चरई-कामारले’ येथे सिद्दीसातला गाठले. या भीषण लढाईत मानाजींच्या आरमारी हालचालींमुळे सिद्दीला पळून जाण्यास जागा उरली नाही. या लढाईत मानाजी आंग्रे यांना गोळी लागून ते जखमी झाले. अखेर चिमाजीआप्पांनी सिद्दीसातला ठार केले. या विजयामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीचा दरारा कायमचा संपला आणि कोकणात मराठ्यांची सत्ता पुन्हा एकदा भक्कमपणे प्रस्थापित झाली. या मोहिमेत मानाजींनी दाखवलेल्या लष्करी निष्ठेमुळे पेशव्यांशी त्यांचे संबंध अधिक दृढ झाले.

मराठा आरमाराच्या इतिहासात १७३७ ते १७३९ दरम्यान झालेली वसईची मोहीम ही पोर्तुगीजांच्या उत्तर कोकणातील सत्तेला दिलेला मोठा धक्का होता. या मोहिमेत चिमाजीआप्पांच्या भूदलाला मानाजी आंग्रे यांच्या आरमारी सामर्थ्याने मोलाची साथ दिली. पोर्तुगीजांच्या किल्ल्यांना समुद्राकडून मिळणारी रसद आणि कुमक तोडण्याचे कठीण काम मानाजींनी यशस्वीपणे पार पाडले. त्यांनी केवळ नाकेबंदीच केली नाही, तर पोर्तुगीजांच्या ताब्यातील मोक्याची ठिकाणे जिंकून घेण्याचा सपाटा लावला.

या मोहिमेतील सर्वांत लक्षणीय घटना म्हणजे मुंबईजवळील करंजा आणि घारापुरी बेटांचा विजय. बाजीराव पेशव्यांना दिलेल्या शब्दाखातर, मानाजींनी २४ फेब्रुवारी १७३९ रोजी आपल्या ५०० निष्ठावान शिपायांसह (ज्यांना ‘आसामी’ असेही संबोधले जाई) करंजा बेटावर धाडसी हल्ला चढवला आणि ते काबीज केले. या विजयामुळे मुंबईतील इंग्रजांचे धाबे दणाणले, कारण करंजासारखे मोक्याचे बेट मराठ्यांच्या हाती गेल्याने इंग्रजांच्या सागरी व्यापारावर आणि मुंबईच्या सुरक्षेवर थेट टांगती तलवार निर्माण झाली. पोर्तुगीजांच्या वसई, रेवदंडा आणि चौल येथील सत्तेचे उच्चाटन करण्यात मानाजींच्या या आरमारी हालचाली निर्णायक ठरल्या. त्यामुळे उत्तर कोकणात मराठा आरमाराचा दरारा पुन्हा एकदा प्रस्थापित झाला.

मराठा आरमाराची वाढती शक्ती रोखण्यासाठी इंग्रजांनी ६ डिसेंबर १७३३ रोजी इंग्रजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीशी एक गुप्त तह केला. या बदल्यात इंग्रजांना धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला खांदेरी किल्ला आपल्या ताब्यात हवा होता. मात्र, मानाजी आंग्रे यांनी इंग्रजांचे हे डावपेच ओळखून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

मानाजींनी पेण नदीवरील ‘रेवारी’ या ठिकाणावर ताबा मिळवला. या एकाच हालचालीमुळे मुंबई बेटाला होणारा अन्नधान्य आणि इतर रसदपुरवठा खंडित झाला. तेव्हा इंग्रजांनी कॅप्टन इंचबर्ड याला वकील म्हणून मानाजींकडे तहासाठी पाठवले. परंतु, मानाजींनी इंग्रजांच्या अटी धुडकावून लावल्या. एप्रिल १७४० मध्ये थोरले बाजीराव पेशवे माळव्यातील मोहिमेत व्यस्त होते आणि चिमाजीआप्पा खानदेशात होते, तेव्हा ही संधी साधून संभाजी आंग्रे यांनी कुलाब्यावर भीषण हल्ला चढवला. संभाजींनी अलिबाग येथे उतरून हीराकोट, सागरगड आणि पाली ताब्यात घेऊन कुलाबा किल्ल्याचा पाणीपुरवठा खंडित करून मानाजींची कोंडी केली. या आणीबाणीच्या प्रसंगी मानाजींनी नानासाहेब पेशव्यांकडे तातडीने मदतीची धाव घेतली.

चिमाजीआप्पांच्या सूचनेनुसार, मुंबईकर इंग्रजांनी कॅप्टन इंचबर्डच्या आधिपत्याखाली ‘हलीफॅक्स’ व ‘फत्ते दौलत’ ही लढाऊ जहाजे मानाजींच्या मदतीस पाठवली. इंग्रजांनी किल्ल्यावर तोफची, उखळी तोफ (mortar) आणि दारूगोळा पुरवला. त्यांच्या माऱ्यामुळे संभाजी आंग्रे यांच्या तोफखान्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, नानासाहेब पेशव्यांनी फौजेसह कुलाब्यावर चाल केली आणि हीराकोटासमोरील संभाजींच्या चौकीवर हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत तुळाजी आंग्रे जखमी झाले आणि त्यांना कैद करून पुण्यास पाठवण्यात आले. नानासाहेबांचे लष्करी कसब आणि इंग्रजांची आरमारी मदत यामुळे संभाजी आंग्रे यांचा हा प्रयत्न फसला आणि त्यांना माघार घ्यावी लागली. या घटनेने मानाजींचे कुलाब्यावरील स्थान अधिक भक्कम झाले.

‘आंग्रे यांची हकिकत’ या बखरीनुसार, निजामाने नानासाहेब आणि सदाशिवराव भाऊ यांना भेटीसाठी बोलावून त्यांचा घात करण्याचा कट रचला होता. या कठीण प्रसंगी मानाजी आंग्रे पेशव्यांसोबत होते. निजामाच्या डेऱ्यात पठाणांची गर्दी पाहून संकटाची चाहूल लागताच, मानाजींनी कंबरेस दोन पिस्तुले आणि दोन्ही हातात पट्टे घेऊन नवाबाच्या सैन्याची फळी फोडत आत मुसंडी मारली. ते थेट नानासाहेब आणि भाऊंच्या मध्ये जाऊन बसले आणि त्यांनी ‘काळजी करू नका, काही दगाफटका झालाच तर सर्वांची चटणी करीन’ असा धीर दिला. मानाजींचे हे रौद्र रूप पाहून निजामाचे धाडस झाले नाही. जेव्हा नवाबाने त्यांच्याबद्दल विचारले, तेव्हा नानासाहेबांनी त्यांची ओळख ‘हे दर्यातील राजे आहेत’ अशी करून दिली. मानाजींच्या या समयसूचकतेमुळे पेशव्यांचे प्राण वाचले. त्यामुळे नानासाहेबांची त्यांच्यावर मोठी मर्जी बसली.

मानाजी आंग्रे एक कार्यक्षम प्रशासक होते. त्यांनी अलिबाग जवळील ‘कुलाबा’ किल्ला हा आपल्या आरमाराचा मुख्य लष्करी तळ बनवला. तेथे त्यांनी जहाजांची दुरुस्ती आणि बांधणी करण्यासाठी एक भव्य गोदी विकसित केली. त्यांच्या आरमारात स्थानिक कोळी आणि भंडारी समाजातील दर्यावर्दी सैनिकांचा मोठा भरणा होता. समुद्रावर मराठ्यांचा एकछत्री अंमल कायम राखण्यासाठी त्यांनी ‘दस्तक’ (सागरी परवाना) पद्धत अत्यंत कठोरपणे लागू केली. त्यांनी स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी कधी इंग्रजांची तर कधी पेशव्यांची मदत घेतली, तरी त्यांनी समुद्रावरील मराठ्यांचे सार्वभौमत्व कधीही कमी होऊ दिले नाही.

कुलाबा येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • ढबू. दा. गो., ‘कुलाबकर आंग्रे सरखेल’, अलिबाग, १९३९.
  • पिसुर्लेकर, पांडुरंग, ‘पोर्तुगीज मराठा संबंध’, पुणे विद्यापीठ, पुणे, १९६७.
  • पुराणिक, श. श्री., ‘तुळाजी एक विजयदुर्ग’, पार्श्व पब्लिकेशन, कोल्हापूर, २०२०.
  • पेंडसे, सचिन, ‘मराठा आरमार’, मर्वेन टेक्नॉलॉजीज, पुणे, २०१७.
  • शिखरे, सु. व., ‘मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास’, अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २०१७.

समीक्षक : संदीप परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.