दक्षिण दिग्विजय (डिसेंबर १६७६ – मे १६७८).
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरची त्यांची स्वराज्यविस्ताराची एकमेव दीर्घ मोहीम. धावपळीच्या राजकारणापेक्षा ही मोहीम वेगळी व प्रदीर्घ (सुमारे दीड वर्ष) काळ चालली. या मोहिमेची संकल्पना नक्की कोणाची याबद्दल अभ्यासकांमध्ये काही मतप्रवाह आहेत. काही अभ्यासक याचे श्रेय रघुनाथपंत हणमंते यांना देतात; मात्र सभासद स्पष्टपणे यांचे श्रेय राजांचेच होते, असे सांगतात. याशिवाय जानेवारी १६७६ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी सावत्र बंधू व्यंकोजी यांना लिहिलेले एक पत्र नक्कल स्वरूपात शा. वि. अवळस्कर यांनी १९६२ साली प्रकाशात आणले. यावरून असे स्पष्ट होते की, दक्षिण दिग्विजय मोहिमेचा राजांचा उद्देश व्यंकोजींकडे राज्याचा वाटा मागण्याचा नव्हता. ही मोहीम महाराजांनी १६७७ मध्ये काढली याची काही कारणे आहेत. त्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीतील राजकारण. विजापूरमध्ये आदिलशाहीत दक्षिणी विरुद्ध पठाण असा संघर्ष त्यावेळी शिगेला पोहोचला होता. छ. शिवाजी महाराजांच्या वाढत्या बळास आवर घालण्यासाठी खवासखानाने मोगल सुभेदार बहादुरखानाशी केलेले सख्य त्याच्यावरच उलटले. राजकारणात त्याचा बळी पडला व विजापूर बहलोलखान या पठाणाच्या ताब्यात गेले. या घटनेमुळे राजकारणाचा एकंदर नूरच पालटला. दक्षिणी विरुद्ध पठाण असा संघर्ष विजापुरात सुरू झाला. दक्षिणी पक्षाच्या लोकांना पठाणाच्या हातात विजापूरच्या सत्तेची चावी जाणे अगदी पचणारे नव्हते. त्यातच बहलोलखानाने खवासखानाची हत्या करविल्याने त्याचा व्याही मोगली सुभेदार बहादुरखान विजापूरचा नाश करण्याच्या तयारीला लागला आणि विजापूरच्या अस्तित्वासाठी झगडा सुरू झाला.
विजापुरातील बदलत्या राजकारणाबरोबरच दक्षिणेत नायक व पाळेगार यांच्यातील राजकारणही क्षणोक्षणी बदलत होते. मदुराईच्या नायकाने तंजावरच्या विजय राघवास ठार केले. त्याच्या नातवाने विजापुरास मदतीस बोलावले. विजापूरकरांतर्फे व्यंकोजीराजे तंजावरच्या मदतीस गेले. त्यांनी स्वतः तंजावर ताब्यात घेऊन स्वतःला तेथील राजा घोषित केले. इकडे जिंजीचा सुभेदार नासिर मुहम्मदखान (वजीर खवासखानाचा भाऊ) हा दक्षिणच ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहू लागला. त्याच अनुषंगाने छ. शिवाजी महाराजांनी व्यंकोजींना पत्र लिहून त्यांनी हिंदू नायकांना मदत करावी व नासिरखानकडून जिंजी घ्यावी असा सल्ला दिला; पण त्यांच्याकडून हे राजकारण तडीस गेले नाही. अखेरीस सर्व बाजूंनी विचार करता, या अस्थिरतेचा फायदा घेण्याचा विचार छ. शिवाजी महाराजांच्या मनात आला. हिंदवी स्वराज्याचा ध्वज दक्षिणेत फडकवावा आणि भविष्यात अटळपणे होणाऱ्या मोगली आक्रमणाप्रसंगी दक्षिणेत संरक्षक जागा व उत्पन्न देणारा भाग स्वराज्यात असावा, असे महाराजांना वाटणे स्वाभाविक होते. संघटित बळाच्या जोरावर दक्षिण पंथीयांची एकजूट साधून अवघ्या दक्षिणेतून मोगल निपटून काढावा, या हेतूने महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
छ. शिवाजी महाराजांनी या मोहिमेसाठी आपल्यासोबत सुमारे वीस हजार घोडदळ व चाळीस हजार पायदळ घेतले. भरपूर खजिना, कर्नाटकचे माहितगार लोक, अनेक शूर लढवय्ये, सरदार असा सारा सेनासंभार दक्षिणेची वाट चालू लागला. महाराजांचा भागानगर पर्यंतचा मार्ग नक्की कोणता होता, हे आज उपलब्ध नाही. कर्नाटकात जाण्यापूर्वी महाराजांनी निराजी पंतांमार्फत बहादुरखानाशीही तह केला होता. त्यामुळे ते गोदावरीजवळून नांदेड, बोधन, सिकंदराबाद मार्गे भागानगरास पोहोचले असावेत, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. महाराजांनी जाताना कुठेही मोगली वा कुत्बशाही मुलूख लुटला नाही. महाराजांचे भागानगरात अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. सारे नगर गुढ्या, तोरणे व पताकांनी सजविण्यात आले. महाराजांवर सोने, रुप्यांची फुले उधळण्यात आली. राजांनी आपल्या वर्तनाने कुत्बशाह व समस्त गोवळकोंडा वासीयांची मने जिंकली. महाराजांना मोहिमेचा खर्च म्हणून रोज तीन हजार होन, तसेच सोबत एक हजार स्वार, चार हजार पायदळ व तोफखाना कुत्बशहाने दिला.
भागानगर सोडून राजे दक्षिणेची वाट चालू लागले. कृष्णा नदी ओलांडून महाराज आंध्र प्रदेशातील श्रीशैलम् येथील मल्लिकार्जुनाच्या दर्शनार्थ गेले (एप्रिल १६७७). तेथे एका गोपुराच्या निर्मितीस सुरुवात करून पुढे ते कर्नुल, नंद्याळ, कडप्पा मार्गे तिरुपती बालाजीस व्यंकटेशाच्या दर्शनास गेले. येथे त्यांनी भोजन व पूजा-अर्चा यांसाठी पुरुषोत्तमभट सोमनाथभट बुरडी यांना एक सनद करून दिली व एक वर्षाचे वर्षासन (४२० होन) तात्काळ त्यांच्या स्वाधीन केले.
तिरुपतीहून कालहस्ती मार्गे राजे मद्रास जवळील पेद्दापोलम येथे पोहोचले (मे १६७७). महाराजांनी इंग्रजांकडे दूत पाठवून काही पुष्टीकारक रत्ने व विषावरील उतारासाठी औषधे पाठवण्यास सांगितले व सोबत त्यांची किमतही विचारली. एवढ्या मोठ्या माणसाची मैत्री लक्षात घेऊन इंग्रजांनी वरील वस्तू, छोटासा नजराणा व फळफळावळ यांसह आपला वकील राजांच्या भेटीस पाठवला. या मुक्कामातच जिंजीचे राजकारण शिजले. खवासखानाच्या खुनाने त्याचा भाऊ व जिंजीचा किल्लेदार नासिर मुहम्मद हा किल्ला कुत्बशाहला देण्याच्या बेतात होता. मात्र छ. शिवाजी महाराज व कुत्बशहा यांच्यात सख्य असल्याने व महाराज सांप्रतकाळी तेथेच असल्याने त्याने महाराजांशीच बोलावे, अशी सूचना त्यास मादण्णाने केली. त्यानुसार महाराजांनी नासिर मुहम्मद यास पन्नास हजार होन रोख व एक लाख उत्पन्नाचा प्रदेश देऊन जिंजी ताब्यात घेतला (मे १६७७). महाराजांनी तेथे रायाजी नलगे यांस हवालदार, तिमाजी केशवास सबनीस तर रुद्राजी साळवी यास इमारतीच्या कामावर नेमले. जिंजीची सर्व व्यवस्था लावून राजे वेल्लोरला आले.
वेल्लोरचा बलदंड स्थलदुर्ग तडकाफडकी जिंकता येणार नाही हे महाराजांच्या लक्षात आले. त्यांनी किल्ल्यावर मारा करण्यासाठी लगतच्या दोन टेकड्यांवर तटबंदी करण्याचा हुकूम सोडला. वेढ्याची सर्व व्यवस्था नरहरी रूद्रावर सोपवून महाराज शेरखान लोदीच्या बंदोबस्तास वळले. शेरखानाजवळ तीन-चार हजार पायदळ व तीन हजार घोडदळ होते. शेरखान हा चांगला प्रशासक होता. मात्र रणांगणात तो अगदीच कच्चा होता. छ. शिवाजी महाराजांनी सहा हजार घोडदळासह तिरुवाडीवर (त्रिवाडी) हल्ला चढवला. महाराजांनी शेरखानाचा पुरता मोड केला. खासा शेरखान अंधाराचा फायदा घेऊन भुवनगिरीस कसातरी पोहोचला. भुवनगिरीच्या किल्ल्याला मराठ्यांनी जुलै १६७७ मध्ये वेढा घातला. तेव्हा शेरखानाने शरणागती पत्करून किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला व तह करून इतर अटीही मान्य केल्या. महाराजांनी त्याच्यावर वीस हजार होन खंडणी घातली व ती मिळेपर्यंत त्याचा मोठा मुलगा इब्राहिमखान यास ओलीस ठेवले. पुढे सहा महिन्यांनी ती मिळाल्यावर त्यास सोडले.
शेरखानाचा बंदोबस्त करून छ. शिवाजी महाराज व्यंकोजींच्या भेटीसाठी तिरुमलवाडीस पोहोचले. महाराजांनी व्यंकोजींची परोपरीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला व आपली वडिलोपार्जित मालमत्ता, प्रदेश यांमध्ये अर्धा वाटा मागितला. सुमारे आठवडाभर वाटाघाटी सुरू असताना अचानकपणे व्यंकोजीराजे तंजावरास निघून गेले. तरीही महाराजांनी त्यांना समजावण्याचा शेवटचा प्रयत्न केला. ते मानीत नाहीत असे दिसल्यावर त्यांचा कावेरीच्या उत्तरेकडील मुलूख ताब्यात घेतला. त्यावेळी व्यंकोजींनी सबुरीचे धोरण पत्करून समझोता केला.
ऑगस्टमध्ये महाराजांनी श्रीरंगपटणही लुटले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत महाराजांनी नव्याने जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावली. जिंजीचा सुभा रघुनाथ हनुमंते यांच्याकडे सोपवला. म्हैसूरहून परत येताना कोप्पळ, गदग, लक्ष्मेश्वर इत्यादी स्थळांवरून त्यांनी प्रवास केला. परतीच्या प्रवासात बेलवडी येथील देसाईन सावित्रीबाई हिने महाराजांच्या लष्करास सु. सत्तावीस दिवस कडवा प्रतिकार केला. अखेर मराठ्यांनी तिची गढी घेतली. तिला उपजीविकेसाठी काही प्रदेश देण्यात आला. मोगल व कुत्बशहा यांच्यात युद्ध होणार याचा अंदाज आल्यावर संताजी भोसले, हंबीरराव मोहिते व रघुनाथपंत यांना मागे ठेऊन महाराज एप्रिल १६७८ मध्ये रायगडाच्या दिशेने निघाले.
छ. शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत महाराजांची मुत्सद्देगिरी, युद्धकौशल्य, राज्यव्यवस्था, उदारदृष्टी, सावधानता इत्यादी गुणवैशिष्टे प्रामुख्याने दिसतात. त्यामुळेच त्यांच्या चरित्रात या मोहिमेचे स्थान अत्यंत मोलाचे ठरते.
संदर्भ :
- कुलकर्णी, अ. रा. संपा., जेधे शकावली, पुणे, २००७.
- जोशी, मु. ना. दक्षिण दिग्विजय, पुणे, २००७.
- देशमुख, विजयराव, शककर्ते शिवराय, नागपूर, २०१०.
- साने, का. ना. संपा., सभासद बखर, पुणे, १९२४.
- हरदास, बाळशास्त्री, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज,नागपूर, २०१८.
समीक्षक : विद्याचरण पुरंदरे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.