धुळप, आनंदराव : (कार. १७६४-१७९५). मराठेशाहीतील एक प्रसिद्ध आरमार सुभेदार आणि दर्यावर्दी. मराठ्यांच्या इतिहासात आरमार या राज्यांगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ हे धोरणात्मक सूत्र मांडून भारतीय उपखंडातील पहिल्या स्वदेशी आरमारी दलाची स्थापना केली. कान्होजी आंग्रे यांच्या काळात हे आरमार वैभवाच्या शिखरावर होते; मात्र १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, विशेषतः १७५६ मध्ये तुळाजी आंग्रे यांच्या पराभवानंतर मराठा आरमारी सत्तेला मोठी ओहोटी लागली होती. अशा पडत्या काळात मराठा आरमाराचे नेतृत्व धुळप घराण्याने केले.

आंग्रेंच्या आरमाराच्या पाडावानंतर पेशव्यांनी स्वतःचे स्वतंत्र ‘सुभा आरमार’ उभारले. या आरमाराच्या प्रमुखाला ‘सुभेदार निसवत सुभा आरमार’ असे संबोधले जाई. सुरुवातीला बाजीराव बेकसे, त्यांचा मुलगा त्रिंबकराव आणि नंतर नारो त्रिंबक यांनी ही धुरा सांभाळली. परंतु पेशव्यांच्या आरमाराला खऱ्या अर्थाने वैभव आणि दरारा मिळवून दिला तो आनंदराव धुळप यांनी. धुळप घराण्याचे मूळ आडनाव ‘मोरे’ होते आणि त्यांचा संबंध जावळीच्या प्रसिद्ध मोरे घराण्याशी होता. जावळीतून स्थलांतरित झाल्यानंतर हे कुटुंब विजापूरच्या आदिलशाही दरबारी रुजू झाले. पुढे हे घराणे स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले आणि कोकणातील पन्हाळे बंदरी (सध्याचे धवडे बंदर) स्थायिक झाले. १७५६ मध्ये आंग्रे आरमाराच्या पाडावानंतर रुद्रजी धुळप यांची आरमारी उपप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी आनंदराव धुळपांकडे आली. थोरले माधवराव पेशवे यांनी आनंदराव धुळप यांची नियुक्ती केली (२५ मे १७६३) आणि १७६४ मध्ये त्यांना अधिकृतपणे ‘सुभेदार निसबत सुभा आरमार’ हे पद दिले.

आनंदराव धुळप हे अत्यंत शूर आणि नाणावलेले दर्यावर्दी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धुळप कुटुंबातील हरबाजीराव, जानोजीराव, भगवंतराव, कृष्णाजी आणि अप्पाजी यांसारख्या वीरांनी मराठा साम्राज्याची अतुलनीय सेवा केली. या शौर्यामुळेच त्यांना पालखीचा मान, सरंजाम आणि मोठी बक्षिसे मिळत असत. धुळप यांनी विजयदुर्ग येथे ‘सुभा आरमारा’चे मुख्य केंद्र स्थापन करून अल्पावधीत ५० लढाऊ जहाजांचा बलाढ्य ताफा तयार केला. यामध्ये ‘नारायणपाल’, ‘महादेवपाल’, ‘दर्या दौलत’, ‘समशेरजंग’ आणि ‘फत्तेजंग’ यांसारख्या भव्य जहाजांचा समावेश होता. सु. ३०० तोफा आणि २ ते ३ हजार अनुभवी सैनिकांच्या बळावर धुळप, विचारे, सुर्वे, कुवेसकर आणि जावकर या आरमारी सरदारांनी अरबी समुद्रावर मराठ्यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

मराठा आरमाराच्या पुनरुत्थानाच्या काळात आनंदराव धुळप यांच्यासमोर पहिले मोठे आव्हान म्हैसूरच्या हैदर अलीचे होते. १७६१ नंतर हैदर अलीने दक्षिण भारतात प्रबळ होत असतानाच पश्चिमेकडील सोंधे आणि बीदनूर यांसारख्या किनारपट्टीच्या भागांवर कबजा मिळवला होता. त्यामुळे मराठ्यांच्या आरमारी वर्चस्वाला बाधा येत होती. आनंदराव धुळप यांनी हैदर अलीचे मुख्य आरमारी केंद्र असलेल्या होन्नावरवर समुद्रातून भीषण हल्ला चढवला. आपल्या युद्धकौशल्याने त्यांनी हैदर अलीच्या आरमाराचा पूर्णपणे पराभव करून त्याचा आरमारी कणा मोडीत काढला. या विजयामुळे अरबी समुद्रात हैदर अलीचे निर्माण होऊ पाहणारे वर्चस्व कायमचे संपुष्टात आले आणि पेशव्यांनी या कामगिरीबद्दल आनंदराव धुळप व त्यांच्या खलाशांना मोठ्या रकमेचे बक्षीस देऊन गौरविले.

सन १७७२ मध्ये कल्याणपूरच्या समुद्रात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या बलाढ्य ‘संताना’ (Santa Anna)  जहाजाचा पराभव केला. या संघर्षाची बीजे राजकीय तणावात होती. १७७१ मध्ये पेशव्यांची फौज हैदर अलीवर स्वारी करण्यासाठी निघाली असताना, पोर्तुगीजांनी त्यांना आपल्या प्रदेशातून वाट देण्यास नकार दिला. पोर्तुगीजांच्या या आडमुठ्या धोरणामुळे पेशवे संतप्त झाले होते. त्यांना धडा शिकवण्यासाठी पेशव्यांचे आरमार प्रमुख आनंदराव धुळप यांनी गोव्याहून मंगळूरकडे जाणाऱ्या पोर्तुगीज आरमारावर हल्ला करण्याची योजना आखली. १९ मार्च १७७२ रोजी कल्याणपूरजवळ दोन्ही आरमारे समोरासमोर आली. पोर्तुगीजांकडे ‘संताना’ नावाचे ४० तोफांनी सज्ज असलेले अजस्र जहाज (फ्रिगेट) होते. त्यांच्या सोबतीला दोन लढाऊ गलबते आणि एक व्यापारी जहाज होते. याउलट, जानोजी धुळप आणि सरदार कृष्णाजी नाईक जैतापूरकर यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरमारात ‘फतेजंग’ नावाच्या मुख्य पालासह लहान-मोठी गलबते होती. मराठा खलाशांनी अत्यंत चपळाईने ‘संताना’ला वेढा घातला. जहाजावर थेट उड्या टाकून अटीतटीची लढाई झाली. यादरम्यान जहाजाला आग लागली आणि पोर्तुगीज कप्तानने अखेर शरणागती पतकरली. मराठ्यांनी पोर्तुगीजांची सर्व जहाजे ताब्यात घेतली. मात्र, २६ मार्च रोजी पोर्तुगीजांनी ‘पेत्र्ज्य द फ्रान्स’ या जहाजासह प्रतिहल्ला करून ‘संताना’ सोडून इतर सर्व जहाजे सोडवून नेली. या विजयानंतर पेशव्यांनी पोर्तुगीज व्हॉइसरॉयला कडक पत्र लिहून त्यांच्या दुटप्पी धोरणाबद्दल इशारा दिला. पुढे १७७५ मध्ये नारायण शेणवी धुमे या वकिलाच्या मध्यस्थीने वाटाघाटी झाल्या. मराठ्यांनी ‘संताना’चा सांगाडा परत केला, परंतु त्यावरील तोफा आणि मौल्यवान सामान जानोजी धुळपांनी आधीच काढून घेतले होते. या युद्धाचे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नुकसानभरपाईचा करार. ११ जानेवारी १७८० रोजी झालेल्या करारानुसार, ‘संताना’ जहाजाच्या बदल्यात पोर्तुगीजांना पेशव्यांनी मोठी रक्कम आणि नगर हवेलीतील ७२ गावे द्यावी लागली. मराठा आरमाराच्या ऐतिहासिक विजयाचे प्रतीक म्हणून विजयदुर्गजवळील श्री देव रामेश्वर मंदिरात ‘संताना’ जहाजाची भव्य घंटा आणि मुख्य डोलकाठी जतन केलेली आहे.

इंग्रजांनी साष्टी आणि उरण बेटांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर, १ फेब्रुवारी १७७५ रोजी गोपाळगडच्या खाडीत मराठा आणि इंग्रज आरमार आमनेसामने आले. या युद्धात मराठ्यांचे ४६ तोफांचे ‘समशेरजंग’ हे प्रमुख जहाज शत्रूच्या वेढ्यात एकाकी पडले. जहाज इंग्रजांच्या हाती लागून स्वराज्याचा अपमान होऊ नये, या निग्रहाने सेनापती दामाजी नाईक कुवेसकर यांनी जहाजावरील दारूकोठाराला आग लावून ४०० खलाशांसह आत्मबलिदान दिले. या बलिदानाचा वचपा आनंदराव धुळपांनी ८ एप्रिल १७८३ रोजी काढला. मराठा आरमाराच्या इतिहासातील १७८३ ची ‘रेंजर’ जहाजावरील विजय मराठ्यांच्या आरमारी अस्मितेचा आणि तांत्रिक कौशल्याचा परमोच्च बिंदू होता. इंग्रजांची ‘रेंजर’ ही युद्धनौका म्हणजे तत्कालीन सागरी जगातील एक ‘चालते-फिरते शस्त्रागार’ मानले जात होते. या जहाजावर प्रचंड दारूगोळा आणि निष्णात यूरोपियन गोलंदाज आणि अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर शॉ आणि ब्रिगेडियर-जनरल नॉरमन मॅक्लिॉड हे होते. ते हैदर अलीविरुद्धच्या मोहिमेसाठी मलबारकडे निघाले होते. दि. ८ एप्रिल १७८३ रोजी रत्नागिरीच्या समुद्रात सरखेल आनंदराव धुळप यांनी आपल्या ‘नारायणपाल’, ‘महादेवपाल’ आणि ‘रामप्रसाद’ या प्रमुख जहाजांच्या साहाय्याने या महाकाय नौकेला रोखले. मराठा सैनिक वार्‍याच्या चपळाईने थेट रेंजरवर चढले. या लढाईत मेजर शॉ व कर्नल हंबरस्टन जागीच ठार झाले, तर जनरल मॅक्लिॉड गंभीर जखमी होऊन इंग्रजांना अखेर शरणागती पतकरावी लागली. या आरमारी युद्धासंबंधी शाळीग्राम शं. तु. यांनी संपादित केलेल्या ‘इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे’ या ग्रंथामध्ये अत्यंत महत्त्वाचा पोवाडा आहे.

आनंदराव धुळप यांनी हे अभेद्य जहाज आणि त्यावरील सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांना बंदी बनवून विजयदुर्गाच्या बंदरात आणले. या पराक्रमानंतर पेशवे सवाई माधवराव यांनी आनंदराव धुळप यांच्या शौर्याचा सन्मान केला. मराठा आरमाराला आधुनिकता आणि शिस्त मिळवून देणारे प्रशासक म्हणूनही आनंदराव धुळप यांची ख्याती होती. अरबी समुद्रावर मराठ्यांचे कायदेशीर सार्वभौमत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी ‘दस्तक’ अर्थात अधिकृत परवाना पद्धत अत्यंत कठोरपणे राबवली. या धोरणानुसार, मराठा सागरीक्षेत्रातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक परकीय किंवा व्यापारी जहाजाला दस्तक घेणे अनिवार्य होते, अन्यथा अशा जहाजांना ‘शत्रू’ मानून ती जप्त करण्याचा अधिकार धुळपांनी निर्धाराने जोपासला. त्यांच्या या दराऱ्यामुळे तत्कालीन बलाढ्य इंग्रज आणि पोर्तुगीज सत्तांनाही मराठ्यांच्या नियमांपुढे नमावे लागले. आनंदराव धुळप यांच्या कार्यकाळात इंग्रजी जहाजांवरील कारवायांचे अनेक उल्लेखनीय प्रसंग घडले. १७८५ मध्ये तेलीचेरी येथील ‘कँडेरी’ हे इंग्रज व्यापाऱ्याचे जहाज विनापरवाना प्रवेशामुळे जप्त करण्यात आले, तर त्याच वर्षी कापसाने भरलेले ‘लॉर्ड रॉडनी’ हे जहाज विजयदुर्ग येथे पकडून ठेवल्यामुळे इंग्रज रेसिडेंट आणि पेशवे दरबारात मोठा राजकीय पत्रव्यवहार झाला. पुढे १७९३ मध्ये ‘सादी’ जहाजाकडे बंगालचा पास असूनही त्यावरील मालाबाबतच्या संशयावरून त्यावर कारवाई करण्यात आली, तसेच १७९५ मध्ये इंग्रजी दस्तक असूनही ‘इब्राम साले’ या जहाजाच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याची सखोल चौकशी करण्यात आली. अशा प्रकारे, केवळ लष्करी सामर्थ्यच नव्हे, तर कडक नियमावलीच्या जोरावर आनंदराव धुळपांनी समुद्रावर मराठ्यांचा धाक निर्माण करून परकीय सत्तांना धास्ती घेण्यास भाग पाडले.

आनंदराव धुळप यांच्या काळात विजयदुर्गची वाघोटन खाडी ही त्या काळातील एक प्रगत आरमारी गोदी म्हणून विकसित झाली होती. येथे ५०० टनांपर्यंतची अजस्र लढाऊ जहाजे बांधली आणि दुरुस्त केली जात असत. आनंदराव धुळप यांनी पाश्चात्य तंत्रज्ञानाचा सूक्ष्म अभ्यास करून आरमारात आधुनिक बदल केले. १७८६ मध्ये त्यांनी जहाजांवरील जड तोफा आणि माल चढवण्यासाठी इंग्रजांच्या धर्तीवर ‘कळासीचा रहाट’ तयार केला. यासाठी ४,००० रुपये खर्च करण्यात आले होते. यामुळे श्रमाची बचत झाली आणि जहाजांच्या लाकडी फळ्यांचे नुकसान होणे थांबले. सैनिकांच्या त्यागाचे मोल ओळखून त्यांनी ‘अदली’ ही निवृत्तीवेतन पद्धत अत्यंत संवेदनशीलतेने राबवली. युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींना आणि अनाथ मुलांना उदरनिर्वाहाची कायमस्वरूपी सोय सरकारी तिजोरीतून केली जाई. तसेच, युद्धात जखमी होऊन कायमचे अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी ‘अपंगत्व निवृत्तीवेतन’ सुरू केले होते. आरमारी युद्धात तोफांच्या माऱ्यामुळे आणि आगीमुळे सैनिक मोठ्या प्रमाणावर जखमी होत असत. त्यांच्या तात्काळ उपचारांसाठी धुळप यांनी ५००  रुपयांचा एक स्वतंत्र वैद्यकीय राखीव निधी निर्माण केला होता. त्या काळातील चलनाचा विचार करता ही रक्कम मोठी होती. जप्त केलेल्या परकीय जहाजांवरील औषधांचा वापरही ते आपल्या सैनिकांच्या उपचारांसाठी करत असत. त्यामुळे युद्धभूमीवर वैद्यकीय रसद कमी पडत नसे. मराठा आरमारात मुस्लीम खलाशी आणि कारागिरांचाही मोठा वाटा होता. धुळप यांनी विजयदुर्ग किल्ल्यातील ‘पीर हुसेन दर्ग्या’साठी वार्षिक २५ रुपयांचे अनुदान सुरू केले होते. हा केवळ धार्मिक विधी नसून, अठराव्या शतकातील राजकीय अस्थिरतेत सर्व धर्मीय सैनिकांना एका छत्राखाली बांधून ठेवण्याचे ते एक प्रभावी सामाजिक धोरण होते. यामुळेच मराठा आरमारात एकतेची भावना निर्माण होऊन परकीय सत्तांविरुद्ध लढा देणे सोपे झाले.

विजयदुर्ग येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • आपटे, बी. के., ‘ए हिस्ट्री ऑफ मराठा नेव्ही अँड मर्चंटशिप्स’, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९७३.
  • दळवी, गोपाळ दाजीबा, ‘मराठी कुळांचा इतिहास’, भाग १ ला, इंदुप्रकाश, मुंबई, १९१२.
  • पिसुर्लेकर, पांडुरंग, ‘पोर्तुगीज मराठा संबंध’, पुणे विद्यापीठ, पुणे, १९६७.
  • पेंडसे, सचिन, ‘मराठा आरमार- एक अनोखे पर्व’, मर्वेन टेक्नॉलॉजीज, मुंबई, २०१७.
  • शिखरे, सुरेश वसंत, ‘मराठ्यांच्या आरमारचा इतिहास’, अप्रकाशित पीएच. डी. शोधप्रबंध, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २०१७.
  • सेन, सुरेंद्रनाथ. ‘द मिलिटरी सिस्टिम ऑफ द मराठास’, ओरिएंट लाँगमन, १९५८.

समीक्षक : संदीप परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.