जीवविज्ञानात जेव्हा मासे सामाजिक कारणाने समूहात राहतात त्याला शोलिंग (Shoaling) असे म्हणतात; तर मासे एकाच दिशेने सुसूत्रपणे पोहत असतात त्याला स्कूलिंग (Schooling) म्हणतात. या नोंदीमध्ये समूहन हा शब्द दोन्हीसाठी वापरला आहे. मराठीमध्ये यासाठी घोळक्याने पोहणे असा उल्लेख आहे. इंग्रजीमध्ये दोन्ही शब्द विस्कळितपणे वापरले जातात. माशांच्या एक चतुर्थांश प्रजाती जीवनभर समूहात राहतात आणि अर्ध्या प्रजाती जीवनात कधी ना कधी समूहात असतात.

माशांचे समूहन

माशांचे समूहन बंधनकारक किंवा वैकल्पिक अशा दोन्ही पद्धतीचे असते. बंधनकारक समूहनामध्ये कुपा (ट्युना), बांगडे, हेरिंग आणि अँचोव्ही (Anchovy) या माशांचा समावेश होतो. त्यांचा सर्व काळ ते समूहामध्ये घालवतात. त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची हालचाल अधिक वाढते. वैकल्पिक समूहन अटलांटिक कॉड, साइथ (Saithe) आणि कॅरॅन्जिड (Carangidae) या माशांमध्ये आढळते. बहुधा प्रजनन काळात ते एकत्र येतात.

समूहात सामील होण्यात माशांची काही स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. बहुतेक वेळा मासे मोठ्या समूहात सामील होतात. एका समूहातील मासे स्वत:चा सहचर त्याच समूहात शोधतात. सहचर सशक्त आणि बाह्य स्वरूप स्वत:सारखे व नात्यातील असावा याची काळजी ते घेतात. एका समूहामध्ये वेगळा सजीव त्वरित ओळखला जातो. भक्षक मासे मोठ्या घोळक्यात वेगळ्या आकाराच्या माशावर आधी झडप घालतात. त्यामुळे शक्यतो समान आकाराचे मासे एका घोळक्यात जमा होतात.

माशांचा घोळका एकाहून अधिक प्रजाती किंवा वेगवेगळ्या आकारमानाचे मासे एकत्र आल्याने किंवा विस्कळीतपणे तयार होतो. तसेच अन्नाचा स्रोत अचानक आढळल्याने किंवा घरट्याची जागा मिळाल्याने मासे एकत्र आल्याची शक्यता असते. मासे सामाजिक कारणाने एकत्र आल्याने या एकत्र येण्यास शोलिंग म्हणण्यात येते. या पद्धतीत मासे विस्कळीतपणे एकाच दिशेने पोहत असतात. प्रत्येक मासा अन्नावर धाड घालताना थोडा स्वतंत्र असतो. त्यावेळी त्याचे शेजारील माशाकडे फारसे लक्ष नसते. परंतु, पोहताना घोळक्यातील शेजारच्या माशाकडे लक्ष ठेवावे लागते. कारण कधीकधी घोळक्यात विविध आकाराचे किंवा दुसऱ्या प्रजातीचे मासे देखील समाविष्ट होतात. समूह जर घट्ट बांधणीचा असेल तर माशांचे पोहताना संकालन (Synchronization) होऊन मासे एकाच दिशेने व एका गतीने पोहतात. यास स्कूलिंग असे म्हणतात. यात शेजारील माशामध्ये ठराविक अंतर राखून पोहले जाते. त्यामुळे किचकट वळणे घेताना सर्व मासे संयुक्तपणे पोहतात असे वाटते.

माशांच्या समूहनाचे विविध प्रकार

समूहात राहण्याचे अनेक फायदे आहेत. जसे भक्षक माशापासून संरक्षण, एकट्याने भक्षक माशाला सामोरे जाण्यापासून बचाव, संकालित शिकार म्हणजेच एकत्र अन्न मिळवण्यातील यश आणि सहचर मिळण्यातील सहजपणा. तसेच समूहात राहील्यामुळे माशांची द्रायुगतिक कार्यक्षमता वाढते. यामध्ये माशांचे पाण्यातील घर्षण कमी होऊन त्यांची पोहण्याची गती सुधारते. समूहनाचे काही धोके देखील आहेत जसे सभोवती असलेल्या पाण्यात अधिक उत्सर्जके साठणे, ऑक्सिजन आणि अन्नाची कमतरता होणे इत्यादी.

माशांचे समूहन शिस्तीत होणे किंवा विस्कळितपणे होणे यामधील बदल क्षणार्धात घडून येतो. असे बदल अन्न मिळवणे, विश्रांती, पोहणे किंवा भक्षक समूहात घुसल्यावर होतात. अन्न मिळवताना समूहाचा वेग थोडा कमी होतो. त्यांची घनता विस्कळित होते. असे समूह असुरक्षित ठरतात. समूहाचा आकार मासे नेमके काय करतात व कोणत्या माशांचा समूह आहे यावर ठरतो. समूह प्रवास करत असता लांब ओळीप्रमाणे, साधारणपणे चौरसाकार, लंबवर्तुळाकार किंवा अमीबासारखा आकार बनतो. वेगाने पोहणारे समूह चितीच्या (Wedge shape) आकारात पोहतात. त्यामुळे त्यांना पाण्याचा प्रतिरोध कमी होतो. घोळक्यात अन्न मिळवणारे समूह भोवऱ्याच्या आकारात वर्तुळाकार पोहतात.

अन्नसाखळीत सर्वाधिक मासे लहान आकाराचे असतात. बहुधा लहान आकाराचे मासे समुद्री शैवाल किंवा प्लवक खाणारे असल्याने अन्नसाखळीत ते ऊर्जा स्त्रोताच्या अधिक जवळ असतात. अशा माशांना ‘चारा’ (Forage) मासे म्हणतात. हे मासे प्राथमिक भक्षक असतात.  त्यांची संख्या सर्वाधिक असते. हेरिंग, अँचोव्ही आणि मेनहेडन (Menhaden) ही त्यांची काही उदाहरणे आहेत. संकालितपणे पोहताना हे मासे तोंड उघडे ठेवतात. या प्राथमिक भक्षक माशांचे मोठाले समूह किनाऱ्यापासून दूर किंवा किनाऱ्याजवळ फिरतात. हे मोठाले समूह म्हणजे संपृक्त अन्नसाठा असतो.

माशांचा समूह हे सागरातील अमाप अन्नाचा स्रोत आहे. बहुतेक चारा मासे जलपृष्ठीय अधिवास असलेले (Pelagic) आहेत. त्यांचे समूह किनाऱ्यापासून दूर खुल्या सागरात पोहत असतात. पाण्याच्या तळाशी त्यांचे समूह नसतात. त्यांचा जीवनकाल कमी असल्याने मासेमारी करणाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होते. परंतु, भक्षक मासे त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांची जागा आणि संख्या यांचा अंदाज भक्षक माशांना असतो. त्यामुळे इतर माशांच्या घोळक्याकडे जाताना चारा माशांचे समूह बनतात. चारा मासे समूहाकडे जाण्यासाठी किंवा त्यांच्या सोबतीने ते शेकडो किलोमीटर प्रवास करतात.

डोनटच्या आकारातील माशांचे समूहन

हेरिंग मासे समूहनासाठी सर्वांत प्रसिद्ध आहेत. त्यांचा समूह भला मोठा होत जातो. लहान लहान घोळके त्यांच्यामध्ये सामील होतात. कॅस्पियन समुद्रात म्युलेट माशांच्या (Mullet Fish) शंभर किलोमीटर लांबीच्या समूहाची नोंद झाली आहे. रॅडकॉव्ह या वैज्ञानिकांनी हेरिंग माशाच्या ४.६ घन मीटर आकाराच्या समूहाची नोंद केली आहे. या समूहात साधारण तीस लाख मासे होते. हा घोळका किनाऱ्यावरून मध्य समुद्राकडे सरकत होता. हेरिंग माशाचे समूह एकाच वेगाने दोन माशांच्यामध्ये समान अंतर ठेवून पोहतात. हेरिंग माशाचे श्रवण संवेदन उत्तम असते. किलर व्हेल पाण्यात असल्यास हेरिंग मासे त्यांच्या घोळक्यात डोनटच्या (मेदू वडा) आकाराची पोकळी ठेवतात. ही पोकळी पाण्यावरून उडणाऱ्या विमानातून सहज ओळखता येते. अनेक मोठ्या आकाराचे शार्क, ट्युना, डॉल्फिन, पोर्पोइज (Porpoises), व्हेल प्रजाती स्थलांतर करताना आपापला लहान ‘चमू’ बनवतात. याला इंग्रजीत पॉड (लहान गट) म्हणतात.

सागरी उष्ण पाण्याचे प्रवाह नेहमी किनाऱ्याकडे व शीत पाण्याचे प्रवाह जड असल्याने अधिक खोल जात असतात. या प्रवाहांना कॉरिओलिस परिणाम (Coriolis force) म्हणतात. हा परिणाम पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि वाऱ्यामुळे होतो. पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होणारे प्रवाह आणि पाण्याखालील जमिनीचे चढ उतार आणि खंडपृष्ठाच्या कडा यांमुळे जलीय घटक व प्लवक अन्नकणाकडे आकर्षित होतात. परिणाम प्लवक खाणारे चारा मासे एकत्र येतात. उष्ण पाण्याचे प्रवाह नेहमी मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. उष्ण सागरी पाण्याचे पृष्ठभागाजवळ येणारे प्रवाह पेरू, चिली, अरबी समुद्र, दक्षिण आफ्रिकेची पश्चिम किनारपट्टी, न्यूझीलंडची पूर्व किनारपट्टी आणि कॅलिफोर्निया ही मत्स्योत्पादन क्षेत्रे आहेत.

प्राणिप्लवकातील कोपेपॉड (छोटे संधिपाद) म्हणजे प्राथमिक भक्षक हे कोपेपॉड हा लहान कवचधारी प्राणी चारा माशांचे मुख्य अन्न आहे. कोपेपॉड सागरी आणि गोड्या पाण्यात असतात. त्यांचे आकारमान १-२ मिमी.पर्यंत असते. बहुतेक कोपेपॉडचे शरीर लहान थेंबाच्या आकाराप्रमाणे असते. समुद्रविज्ञानाप्रमाणे जगातील सर्वांत मोठे जैववस्तुमान (Biomass) हे कोपेपॉड प्राण्याचे आहे. पाण्यातील कोपेपॉडची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास हेरिंग मासे खाण्याची पद्धत बदलतात. ते तोंड उघडे ठेवून भक्षावर धडकणे ही पद्धत वापरतात जेणेकरून अधिक अन्न घशात जाते. तसेच कल्ला आवरण उघडे ठेवल्याने त्यांची अधिक ऑक्सिजनची गरज पूर्ण होते.

थोडक्यात समूहन वर्तन हा अनुकूलनाचा भाग आहे. उत्क्रांतीमध्ये टिकून राहण्यासाठी समूहन अधिक महत्त्वाचे असते.

पहा : हेरिंग मासा.

संदर्भ :

https://en.wikipedia.org/wiki/Shoaling_and_schooling

https://cnx.org/contents/ETfm5re9@3/Schooling-in-Fish

समीक्षक :  नंदिनी देशमुख


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.