स्याचेन हिमनदी. काराकोरम पर्वतश्रेणीतील एक गिरिपाद हिमनदी. हिमालय पर्वताच्या पश्चिम भागात काराकोरम पर्वतश्रेणी आहे. काराकोरम पर्वताचा पश्चिमेकडील साल्तोरो कटक
या नावाने ओळखला जाणारा फाटा आणि पूर्वेकडील मुख्य काराकोरम पर्वतरांग यांदरम्यान सिआचेन हिमनदी विस्तारलेली आहे. भारत-पाकिस्तान या दोन देशांदरम्यानच्या नियंत्रण रेषेवर असलेल्या NJ 9842 या बिंदूजवळ भारत-पाकिस्तान दरम्यान असलेली नियंत्रण रेषा संपते. या बिंदूपासून ईशान्येस अगदी काही अंतरावरच ही हिमनदी आहे. सिआचेन हिमनदीचा प्रवाहमार्ग वायव्य-आग्नेय दिशेत विस्तारलेला आहे. सिआचेन ही समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातून वाहणारी हिमनदी आहे. यूरेशियन भूपट्ट व भारतीय उपखंडाचा भूपट्ट यांदरम्यान असलेल्या जलविभाजकाला लागूनच दक्षिणेकडे ही हिमनदी आहे. ब्रिटिश गिर्यारोहक व समन्वेषक टॉम लाँगस्टाफ यांनी स्थानिक बाल्टी भाषेवरून या हिमनदीला सिआचेन हे नाव दिले. सिआचेनमधील ‘सिआ’ म्हणजे ‘रानटी गुलाब’ आणि ‘चेन’ म्हणजे ‘एखादा घटक मुबलक प्रमाणात आढळणे’. या हिमनदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर रानटी गुलाब आढळत असल्यामुळे या हिमनदीला सिआचेन असे नाव देण्यात आले.
हिमालयातील प्रचंड प्रमाणात हिमाच्छादन असलेल्या प्रदेशात ही हिमनदी असल्यामुळे या प्रदेशाला पृथ्वीवरील ‘तिसरा ध्रुव प्रदेश’ असे संबोधले जाते; कारण या प्रदेशातील हिमनद्यांमधे सामावलेला गोड्या पाण्याचा साठा ध्रुव प्रदेशातील हिमाच्छादित प्रदेश वगळता जगात अन्य कोणत्याही भागात आढळत नाही. या हिमनदीची लांबी ७५ किमी. आहे. काराकोरममधील ही सर्वांत लांब हिमनदी असून ध्रुव प्रदेशाबाहेरील ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची लांब हिमनदी आहे. ताजिकिस्तानमधील फेडचेंको ही जगातील सर्वांत मोठी व लांब हिमनदी आहे. सिआचेन हिमनदीने सुमारे २,५०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. काराकोरमच्या सिआचेन मुझताघ या पर्वतश्रेणीतील इंदिरा कटकवर इंदिरा कोल वेस्ट ही खिंड आहे. भारत-चीन सरहद्दीवर असलेल्या या इंदिरा कोल वेस्ट खिंडीजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे ६,११५ मी. उंचीवर या हिमनदीचा उगम होतो. उगमापासून सुमारे ३,५७० मी. उंचीपर्यंत खाली सरकत आल्यानंतर तिच्या मुखाजवळ वितळलेल्या हिमनदीपासून अकस्मात पाण्याचे दोन प्रवाह निर्माण झालेले आढळतात. पुढे हे दोन्ही जलप्रवाह एकत्र येऊन त्यांपासून नुब्रा नदीचा उगम होतो. सुमारे ९० किमी. वाहत गेल्यानंतर नुब्रा नदी श्योक नदीला मिळते. श्योक ही सिंधू नदीची उपनदी आहे. सिंधू नदीला पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने या हिमनदीला विशेष महत्त्व आहे. सिआचेनला अनेक उप हिमनद्यांकडून हिमाचा पुरवठा होतो. तिच्या डाव्या तीरावर तेरम शेहर, नॉर्थ टेराँग व साउथ टेराँग या प्रमुख तीन उप हिमनद्या असून उजव्या तीरावर झिंगरुल्मा, ग्योंगला, लोलोफंड या तीन आणि नावे नसलेल्या दोन अशा पाच उप हिमनद्या येऊन मिळतात. सिआचेन व तिच्या उप हिमनद्यांकडून आपल्या मार्गातील भूप्रदेशाचे फार मोठ्या प्रमाणात अपक्षरण केले जाते. अपघर्षण व अपक्षरण क्रियेतून प्रचंड प्रमाणात वाहून आणलेला गाळ नुब्रा नदीपात्रातून वाहत असतो. सिआचेनच्या खोऱ्यात अनेक ठिकाणी हिमोढाचे ढीग आढळतात. वैश्विक तापमानवाढीमुळे सिआचेन हिमनदी प्रतिवर्षी ११० मीटरने मागे मागे सरकत असल्याचे आढळले आहे.
ब्रिटिश गिर्यारोहक व समन्वेषक हेन्री स्ट्रॅची यांनी ऑक्टोबर १८४८ मध्ये सिआचेन हिमनदीबाबतचा पहिला अहवाल लिहिला. ब्रिटिश गिर्यारोहक व समन्वेषक टॉम लाँगस्टाफ, आर्थर नेव्ह व ए. एम. स्लिंग्सबी यांनी इ. स. १९०९ मध्ये या हिमनदीची लांबी आणि या प्रदेशातील पर्वतीय खिंडींची अचूक स्थाने निश्चित करण्याचा प्रयत्न केला.
लडाख आणि पूर्व काराकोरम प्रदेश पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नसल्यामुळे या प्रदेशातील सिआचेन हिमनदी व तिच्या सभोवतालच्या प्रदेशातील बहुतांश वर्षण हे प्रामुख्याने पश्चिमी विक्षोभ (प्रक्षोभ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमीदाब प्रणालीपासून होत असते. कमी उंचीच्या प्रदेशात वार्षिक सरासरी ७५ ते १५० सेंमी., तर जास्त उंचीच्या प्रदेशात १,००० सेंमी. पेक्षाही अधिक हिमवृष्टी होते. जास्त उंचीच्या प्रदेशात वर्षातील ९०% पेक्षा अधिक कालावधीत ०° अंश से. पेक्षा कमी तापमान असते. हिवाळ्यातील किमान तापमान -२०° से. ते -४०° से. यांदरम्यान असते. कधीकधी ते -६०° से. पर्यंतही खाली गेलेले आढळते.
भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रदेशिक वाद : सिआचेन हिमनदी व तिच्या खोऱ्याच्या मालकीवरून भारत-पाकिस्तान या दोन देशांत वाद आहे. या दोन्ही देशांनी सिआचेन प्रदेशावर हक्क सांगितला आहे. प्रत्यक्षात संपूर्ण सिआचेन हिमनदी, तिच्या भोवतीचे कटक आणि प्रमुख खिंडी भारताच्या ताब्यात असून तो संपूर्ण प्रदेश भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. या भागात भारताच्या अनेक लष्करी छावण्या आहेत. सिआचेनच्या पश्चिमेस असलेल्या साल्तोरो कटकच्या पश्चिमेकडील भूप्रदेशावर पाकिस्तानने ताबा सांगितला असला, तरी तो पाकिस्तानचा अधिकृत भाग नसून पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे. वास्तविक इ. स. १९४७-४८ मधील भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यानच काश्मीर संस्थानचे महाराज हरिसिंग यांनी ऑक्टोबर १९४७ मध्येच आपल्या काश्मीर संस्थानचे भारतात विलीनीकरण केले होते. त्यामुळे सिआचेन हिमनदी प्रदेशासह संपूर्ण काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला होता. तरीही काश्मीरबाबत पाकिस्तानच्या कुरापती चालूच होत्या. भारताने मात्र पाकिस्तानच्या कुरापतींना न जुमानता अतिशय प्रतिकूल हवामान आणि भूपृष्ठरचना असतानाही संपूर्ण सिआचेन हिमनदी प्रदेशावर आपले नियंत्रण अबाधित ठेवले आहे. भारत, पाकिस्तान आणि चीनच्या त्रिकोणी सीमेवर हा प्रदेश वसलेला आहे. या हिमनदी प्रदेशामुळेच पाकिस्तान व चीन हे दोन देश एकमेकांपासून अलग झाले आहेत. त्यामुळे भारताला सामरिकदृष्ट्या (लष्करी डावपेचाच्या दृष्टीने) संपूर्ण सिआचेन हिमनदी प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याशिवाय भारताचाच अविभाज्य भाग असलेल्या पाकव्याप्त गिलगिट व बाल्टिस्तान प्रदेशावर भारत येथून बारकाईने लक्ष ठेऊ शकतो.
सिआचेन हिमनदी प्रदेशात १९७० च्या दशकापर्यंत अजिबात वस्ती नव्हती; परंतु १९७० च्या दशकाच्या अखेरीस भारतीय लष्करातील गिर्यारोहक कर्नल नरेंद्र कुमार यांच्या निदर्शनास आले की, संयुक्त संस्थानांनी तयार केलेल्या उत्तर काश्मीरच्या नकाशात सिआचेन हिमनदीचा प्रदेश पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानने हा भाग आपलाच आहे, असा समज तयार करण्याच्या हेतुने १९७० च्या संपूर्ण दशकात विदेशी गिर्यारोहकांना सिआचेन हिमनदीच्या सभोवतालच्या शिखरांवर चढाईसाठी परवानगी दिली. कुमार यांनी १९७८ मध्ये पाकिस्तानच्या अशा कारवायांच्या विरोधात या भागात प्रति-मोहिम काढण्याची परवानगी मिळविली. १९८१ मध्ये त्यांनी चीनच्या सरहद्दीपर्यंतच्या संपूर्ण सिआचेन हिमनदीचा नकाशा तयार केला. १९८४ मध्ये पाकिस्तानचे या भागात गुप्तपणे पाकिस्तानी सैन्यतुकड्या पाठविण्याचे कारस्थान चालू असल्याची खबर गुप्तहेरांकडून मिळाली, तेव्हा भारताने गुप्तपणे ‘ऑपरेशन मेघदूत’ (‘क्लाऊड मेसेंजर’) ही योजना आखली. मेघदूत या कालिदासलिखित संस्कृत खंडकाव्यावरून या योजनेला ऑपरेशन मेघदूत हे नाव देण्यात आले. ऑपरेशन मेघदूत यशस्वीरित्या राबवून पाकिस्तानी फौजा येथेपर्यंत पोहोचण्याच्या काही दिवस आधीच भारतीय फौजा येथे दाखल झाल्या आणि त्यांनी उप हिमनद्यांसह संपूर्ण सिआचेन हिमनदी प्रदेशावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. अन्यथा पाकने त्या प्रदेशाचा ताबा घेतला असता. तेव्हापासून आजअखेर भारत-पाकिस्तान यांच्यातील किरकोळ चकमकी वगळता भारताने संपूर्ण सिआचेन हिमनदी, तिच्या उपनद्या, लगतची साल्तोरो कटक आणि तिच्यातील सर्व प्रमुख खिंडी या प्रदेशांवर आपला ताबा कायम ठेवला आहे. साल्तोरो कटकच्या पश्चिमेकडील हिमनद्यांच्या दऱ्यांचा प्रदेश पाकच्या ताब्यात आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील ही युद्धभूमी आहे.
जून १९५८ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेची पहिली सफर सिआचेन हिमनदी भागात गेली होती. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या या पहिल्या सफरीत सिआचेनसह पाच
हिमनद्यांच्या अभ्यासाचे नियोजन होते. सिआचेन हिमनदीपासून सर्वांत जवळची वस्ती म्हणजे भारतीय बेस कँपपासून खालच्या बाजूस १६ किमी. वर असलेले वार्शी नावाचे खेडे. भारतीय लष्कराने सिआचेन परिसरात पोहचण्याच्या दृष्टीने वेगेवेगळ्या मार्गांची निर्मिती केली आहे. प्रामुख्याने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सैनिकांना आवश्यक वस्तूंचा, सेवासुविधांचा पुरवठा केला जातो. प्रतिकूल हवामान, अतिशय वेगाने वाहणारे वारे, हवेतील ऑक्सिजनचे कमी प्रमाण (विरळ हवा), हिमवादळे, कडाक्याची थंडी, हिमलोट (हिमस्खलन), बर्फात अचानक पडणाऱ्या भेगा, दुर्गम प्रदेश, खडकाळ उंच डोंगरी कडे, विस्कळीत दगडांची भूमी अशी अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असताना आणि दैनंदिन जीवन अतिशय कठिण असतानाही भारतीय जवान जीवाची पर्वा न करता निर्धाराने या भागात तैनात राहून भारतीय भूमीचे रक्षण करीत आहेत.
सिआचेनला भेट देणारे पहिले पंतप्रधान मनमोहन सिंग, तर पहिले राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिआचेन प्रदेशाला भेट दिली आहे. भारताने २००७ पासून या भागात मर्यादित प्रमाणात गिर्यारोहण व ट्रेकिंग मोहिमा सुरू केल्या आहेत. पहिल्याच वर्षात भारतातील विविध सैनिकी शिक्षण व प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थी आणि सशस्त्र बलातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. अशा विविध उपक्रमांमधून भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवून दिले आहे की, साल्तोरो कटक व संपूर्ण सिआचेन हिमनदी परिसर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्यावर नियंत्रणही भारताचेच आहे. या परिसराच्या जवळपास कोठेही पाकिस्तानच्या लष्कराचे अस्तित्व नाही.
पर्यावरण आणि मानव : भारत-पाकिस्तान यांच्यातील येथील प्रत्यक्ष संघर्षात जेवढे मृत्यु झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक मृत्यु येथील अतिशय प्रतिकूल हवामान आणि भूप्रदेश यांमुळे झाले आहेत. लष्कराकडून हिमनदीचा ठराविक उंचीपेक्षा अधिक उंचीचा प्रदेश प्रतिबंधित केला आहे. मेघदूत योजना राबविल्यापासून हिमनदी प्रदेशात डोंगरावरून घसरणारे बर्फाचे कडे, हिमनदीत पडणाऱ्या भेगा आणि प्रतिकूल हवामान यांमुळे भारत व पाकिस्तानच्या लष्करातील सुमारे २,७०० जवानांचा मृत्यु झालेला आहे. हवामान बदलामुळे वेगाने वितळणारे बर्फ यांमुळे या बर्फाळ प्रदेशात राहणे अधिकच कष्टप्रद बनले आहे. त्याशिवाय येथे दोन्ही देशांच्या फौजा उभ्या ठाकल्या असल्यामुळे हिमनदी व तिच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर असेंद्रीय अपशिष्टांचे प्रमाण खूप वाढलेले आहे. ती सर्व अपशिष्टे नुब्रा, श्योक व सिंधू या नद्यांमध्ये वाहून येत असल्यामुळे त्या नद्यांमधील पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. तसेच लष्करी छावण्यांमुळे येथील वन्य प्राणिजीवनावरही परिणाम झालेला आहे. पर्यावरणवाद्यांच्या मते, लष्कराच्या उपस्थितीमुळे या परिसरातील परिसंस्थांची हानी होत आहे. त्यामुळे परिसंस्थांच्या संरक्षण आणि संवर्धानासाठी हा संपूर्ण परिसर शांतता उद्यान (पीस पार्क) म्हणून घोषित करावा अशी मागणी होत आहे. या भागात तपकिरी अस्वल, सायबीरियन किंवा आशियाई आयबेक्स बकऱ्या व हिमचित्ता हे प्राणी आढळतात.
संदर्भ :
- गोखले, नितीन (अनु. चाटी, विनय), सियाचिन : धगधगते हिमकुंड, नवी दिल्ली, २०१५.
- Khanna, D. K., Gorichen to Siachen : The Untold Saga of Hoisting the Tricolour on Saltoro, New Delhi, 2017.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.