
संधिपाद संघातील क्रस्टेशिया वर्गातील (Crustacea; कवचधारी प्राण्यांचा वर्ग) मॅलॅकोस्ट्रॅका उपवर्गातील (Malacostraca; मऊ कवच असणाऱ्या कवचधारी प्राण्यांचा उपवर्ग) डेकॅपोडा गणातील (Decapoda; दशपाद असलेल्या प्राण्यांचा गण) पिनिडी (Penaeidae) कुलात या कोळंबीचा समावेश होतो. हीचे शास्त्रीय नाव पिनिअस मोनोडॉन (Penaeus monodon) असून तिच्या उदर भागावर आणि पृष्ठवर्त्मावर (Carapace; पाठीच्या पृष्ठभागाचा काही भाग किंवा संपूर्ण पृष्ठभाग झाकणारे बाह्यकंकालाचे कवच) आडवे काळे आणि पिवळसर रंगाचे पट्टे असतात. त्यामुळे या कोळंबीला टायगर कोळंबी म्हणतात. जायंट टायगर कोळंबी (Giant tiger prawn), एशियन टायगर कोळंबी (Asian tiger shrimp) आणि ब्लॅक टायगर कोळंबी (Black tiger shrimp) या नावांनीही ती ओळखली जाते.
टायगर कोळंबी ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया आणि पूर्व आफ्रिका येथील किनारी प्रदेशांत सापडते. इतर सर्व पिनीडी कोळंब्यांप्रमाणे यांना देखील ठळक तुंड (Rostrum) असतो. या तुंडाच्या पृष्ठ आणि अधर बाजूला काटेरी किनार असते. पृष्ठवर्त्म कोणत्याही शिवणी दाखवत नाही. तलस्थ जीवन जगणाऱ्या या कोळंब्या हिरवट, तपकिरी आणि निळसर रंगांच्या छटा दर्शवतात. पाण्याच्या गढूळपणाप्रमाणे कोळंबीचा रंग बदलतो. तसेच खाद्यानुसार यांचा रंग बदलत राहतो. पूर्ण वाढ झालेली कोळंबी सु. ३३ सेंमी. लांब असते. मादी नरापेक्षा लांबीने अधिक असते. पूर्ण वाढलेल्या कोळंबीचे प्रजनन सागरी पाण्यात होते. त्यांच्या डिंभक, डिंभकोत्तर आणि अपरिपक्व पिलांच्या अवस्था खाडीच्या निमखाऱ्या पाण्यात, कांदळवनांत आणि समुद्रानजीकच्या खाजणात वाढतात. नैसर्गिकरित्या राहणाऱ्या कोळंब्या निशाचर असतात. तळाच्या गाळात दिवसभर त्या स्वत:चे शरीर खुपसून बसतात. रात्री त्या अन्नग्रहणासाठी बाहेर पडतात. परिसंस्थेमध्ये टायगर कोळंबी भक्षकाची भूमिका करते. इतर पिनीडी कोळंब्या मात्र सर्वाहारी असतात. वाढ होताना कात टाकलेल्या मऊसर कोळंब्या स्वत:च्याच प्रजातींचे भक्ष्य बनतात.

कोळंबीचे पूर्ण वाढ झालेले नर आणि मादी २०–३० मी. खोलीपर्यंतच्या चिखलात किंवा वालुकामय तळात आढळून येतात. ३५ ग्रॅ. वजनाचे नर शुक्राणू तयार करण्यास सक्षम होतात. साधारण ७० ग्रॅ. वजनाच्या माद्या अंडी घालू लागतात. मादी एकावेळी दोन लाख ते आठ लाख अंडी घालतात. रात्रीच्या अंधारात कात टाकल्यावर थोड्याच वेळात नर मादीच्या वक्षाच्या खालच्या भागात असलेल्या कोशासारख्या थेलायकम (Thelycum) या अवयवावर शुक्राणू सोडतो. स्वत:च्या कोशातील नराकडून मिळालेले शुक्राणू मादी स्वत:च अंड्यांवर सोडते. अशा प्रकारे बाह्यफलन झाल्यानंतर १२–१५ तासांत अंड्यांतून पहिली डिंभके बाहेर पडतात. कोळ्यासारखी दिसणारी नॉप्लीयस (Nauplius) अवस्थेतील डिंभके मुक्तपणे पोहत असतात. त्यानंतरच्या प्रोटोझूइया (Protozoea) आणि मायसीस (Mysis) या वाढीच्या अवस्था असतात. डिंभकापासून तयार झालेली डिंभकोत्तर अवस्था पार पडल्यावर तलस्थ कोळंबी निर्माण होते. कोळंबीच्या पूर्ण वाढीसाठी सु.११८ दिवस लागतात. अंडाशयाच्या पाच अवस्था आढळून येतात.

टायगर कोळंबीची उत्पादन क्षमता अधिक असल्याने त्याचे उत्पादन मूल्यदेखील जास्त आहे. पूर्वी मत्स्यशेतीसाठी कोळंबीच्या पि. मोनोडॉन या जातीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. परंतु, गेल्या काही वर्षांत मत्स्यशेतीसाठी या जातीऐवजी लिटोपिनिअस वॅनामी (Litopenaeus vannmei) ही जाती वापरली जात आहे. या कोळंबीला पांढऱ्या पायाची कोळंबी (Whiteleg shrimp or King prawn) असे म्हणतात. टायगर कोळंबीला होणारे संसर्गजन्य रोग आणि त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे त्यांची शेती कारणे फायदेशीर ठरत नसल्याने भारत शासनाने मत्स्यशेतीसाठी टायगर कोळंबीऐवजी पांढऱ्या पायाची कोळंबी आणि पांढरी कोळंबी या दोन जातींना परवानगी दिली आहे.
पहा : गोड्या पाण्यातील कोळंबी, सागरी कोळंबी.
संदर्भ :
- http://www.fao.org/fishery/culturedspecies/Penaeus_vannamei/en
- https://www.joelsartore.com/inv005-00036/
- https://www.researchgate.net/figure/Natural-life-cycle-of-black-tiger-shrimp-Penaeus-monodon_fig1_320189161
- https://repository.seafdec.org.ph/bitstream/handle/10862/864/biol.monodon_p003-036.pdf?sequence=1&isAllowed=y
- https://www.zoologyverse.com/classification-of-penaeus-prawn
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
