कर्नाटक राज्याच्या किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात स्थित असलेले एक छोटेसे बेट. अंजदीप या नावानेही हे बेट ओळखले जाते. कारवार हे कर्नाटकाच्या उत्तर कॅनरा (कानडा) जिल्ह्याचे मुख्य ठाणे असून ते एक प्रमुख शहर व बंदर आहे. कारवार बंदरापासून केवळ ७ किमी. अंतरावरच हे बेट आहे. पाच बेटांच्या द्वीपसमूहांपैकी अंजदीव हे सर्वांत मोठे बेट असून कुर्मागड, मुद्लिंगड, देवगड आणि देव्रागड ही इतर द्वीपके आहेत. हे बेट भौगोलिक दृष्ट्या कर्नाटक राज्याजवळ असले, तरी राजकीय दृष्ट्या ते गोवा राज्याचा भाग आहे. गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यात हे बेट येते. याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्थान अनुक्रमे १४° ४६′ उ. व ७४° ०७′ पू. असे आहे. दक्षिणोत्तर १,५०० मी. व पूर्वपश्चिम २५० मी. पसरलेल्या या बेटाचे क्षेत्रफळ केवळ १.५ चौ. किमी. आहे. हे वेड्यावाकड्या आकाराचे बेट असून अत्यंत वाईट हवामानामुळे जवळजवळ निर्मनुष्य आहे. गोवा, दमण, दीवच्या १९६१ मध्ये झालेल्या जनगणनेत अंजदीव बेटावर राहणाऱ्या लोकांची संख्या केवळ ४६३ नोंदवलेली होती. त्यानंतर भारतातील विलीनीकरणानंतरच्या जनगणनेत येथील लोकसंख्या स्थिर असल्याची पुष्टी मिळते. येथील हवामान आर्द्र उष्णकटिबंधीय मॉन्सून प्रकारचे आहे. खडकाळ, प्रामुख्याने जांभ्या खडकाचा भूप्रदेश व उंचसखल टेकड्या ही भूवैशिष्ट्ये येथे आढळतात. समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंची सुमारे ८ मीटर आहे. बेटाचा पूर्वेकडील किनारा किंचित दंतुर असून हजार टनांपर्यंतच्या छोट्या बोटी येथे थांबू शकतात.

अंजदीव बेटाच्या नावाविषयी दोन शक्यता वर्तविल्या जातात. अंजी म्हणजे पाच आणि दीव म्हणजे बेट. या द्वीपसमूहात पाच बेटे असल्यामुळे याचे अंजदीप हे नाव पडले असावे. दुसऱ्या शक्यतेनुसार प्राचीन काळी येथे अंजदुर्गा मंदिर होते, त्यावरून हे नाव पडले असावे. पुरातत्त्वविद्येच्या दृष्टीने येथे मर्यादित पुरावे आढळले असले, तरी यूरोपीयन येण्यापूर्वी अरबी समुद्रातील प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील हे मोक्याचे ठिकाण असल्याचे पुरावे मिळतात. अरब व्यापाऱ्यांनी या बेटाचा उपयोग एक हंगामी बंदर म्हणून, तसेच जहाज दुरुस्तीसाठी केल्याचे उल्लेख आढळतात. रोमन व्यापाऱ्यांचे या बेटावर वास्तव्य असायचे. इसवी सन पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या प्राचीन रोमन व्यापारासंबंधीच्या नियमपुस्तिकेत या बेटाचा उल्लेख आयगिडिअम (आगी देवतेची भूमी) किंवा आएगिडी असा आढळतो. हा या बेटाचा आद्य संदर्भ आहे. मॉन्सून वाऱ्यांना अनुसरून तांबड्या समुद्रापासून मलबारच्या किनाऱ्यापर्यंत जहाजांनी येणारे रोमन व्यापारी या बेटावर थांबत असत, असे वर्णन या पुस्तिकेत आहे. जहाजे नांगरण्यासाठी नैसर्गिक व सुरक्षित बंदर आणि बेटावरील गोड्या पाण्याचे झरे हे घटक त्यादृष्टीने विशेष फायदेशीर ठरले आहेत. व्यापाऱ्यांकडून कायमस्वरूपी वस्ती न करता याचा हंगामी वापर केला जाई. प्रसिद्ध भूगोलज्ञ टॉलेमी यांच्या इ. स. १५० मधील जिऑग्राफी या पुस्तकात उल्लेखिलेले आयगीदीऑय बहुतेक हेच असावे. पाचव्या ते सातव्या शतकात या बेटावर कदंब वंशाची सत्ता होती. त्यांनी येथे एक लहानसे मंदिर बांधले होते. प्रसिद्ध अरब प्रवासी इब्न बतूता यांनी आपण स्वत: इ. स. १३४२ मध्ये या बेटावर येऊन गेल्याचा उल्लेख केला आहे. ग्रीक, अरब, ईजिप्शियन व पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या दृष्टीने या बेटाला विशेष महत्त्व होते.

पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांनी इ. स. १४९८ मध्ये या बेटास भेट दिली व त्यावर आपला हक्क सांगितला होता. आपल्या दुसऱ्या सफरीतही इ. स. १५०२ मध्ये तो या बेटावर थांबला होता. पोर्तुगालने जिंकलेल्या भारतातील प्रदेशाचा पहिला व्हाइसरॉय फ्रॅन्सिस्कू द आल्मेईदा यांचे इ. स. १५०५ मध्ये येथे आगमन झाले. दक्षिण भारतातील वेगवेगळ्या मोगली सत्ता व स्थानिक सत्ता यांच्यापासून बचाव करण्यासाठी, त्यांना शह देण्यासाठी, सागरी प्रदेशातील आपल्या वर्चस्वासाठी आणि स्वसंरक्षणासाठी इ. स. १५०५ मध्येच त्यांनी या बेटावर एक किल्ला बांधला आणि बेटाला ग्रॅनाइट खडकांत तटबंदी बांधून घेतली. अशाप्रकारे त्यांनी येथे आपल्या पोर्तुगीज सत्तेचे भक्कम पाय रोवले. तेव्हापासून १९६१ मध्ये भारताने ताबा घेईपर्यंत बहुतेक काळ हे पोर्तुगीजांच्याच ताब्यात राहिले; परंतु प्रतिकूल हवामानामुळे येथे प्रगती होऊ शकली नाही. या स्थानावरूनच पुढे इ. स. १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवा प्रदेश काबीज केला. इसवी सन १६६१ मध्ये इंग्रजांना मुंबई आंदण मिळाली व तिचा ताबा घेण्याकरिता आलेल्या इंग्रज सेनापतीस काही दिवस येथे राहावे लागले होते. त्यावेळी वाईट हवामानामुळे ५०० पैकी ३६१ माणसे वर्षभरात मृत्युमुखी पडल्याचा दाखला आहे. म्हणूनच पुढे पोर्तुगीजांनीही काळ्या पाण्याच्या शिक्षेकरिता या बेटाचा उपयोग केला.

भारताने १८ डिसेंबर १९६१ रोजी लष्करी कारवाई करत गोव्यासह या बेटाचा ताबा आपल्याकडे घेतला. त्यामुळे येथील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आली. भारताच्या ताब्यात आल्यानंतर हे बेट गोवा राज्यात सामील करण्यात आले. सध्या येथे भारतीय नौदलाचा तळ असल्यामुळे हा प्रतिबंधित लष्करी प्रदेश आहे. त्याशिवाय क्षेपणास्त्र चाचणीसाठीही या बेटाचा उपयोग केला जातो. त्यामुळे भारतीय नौसेनेच्या जवानांची येथे कायम उपस्थिती असते. अलीकडील पर्यावरणीय आणि पर्यटन अभ्यासानुसार अंजदीव बेट लष्करासाठी उपयुक्त ठरत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सामान्य लोकांना किंवा पर्यटकांना या बेटावर खुला प्रवेश नाही; मात्र येथील वारसास्थळांचे संवर्धन केले जाते. ऐतिहासिक दृष्ट्या अंजदीव बेट जसे महत्त्वाचा ‘थांबा’ म्हणून होते, तसेच ते आजही महत्त्वाचे आहे. गोव्याच्या पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात येथे मंदिराचे दगडी खांब आढळले. ते बहुदा अंजदुर्गा किंवा आर्यदुर्गा देवीच्या मंदिराचे असावेत. पोर्तुगीजांनी बांधलेले दोन चर्च, भारताने पोर्तुगीजांच्या विरोधात राबविलेल्या ऑपरेशन विजय संदर्भातील स्मृतिस्थळ या वास्तू येथे आढळतात.

संदर्भ : घाणेकर, प्र. के., मैत्री सागरदुर्गांची, पुणे, १९९३.

समीक्षक : सुरेखा दौंडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.