इब्‍न बतूता : (२४ फेब्रुवारी १३०४-१३७८). मध्ययुगातील एक प्रसिद्ध अरब प्रवासी व प्रवासवर्णनकार. मोरोक्कोमधील तँजिअर या शहरात न्यायाधीशांची (काझी) परंपरा असलेल्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे पूर्ण नाव अबू अब्दुल्ला बिन मुहंमद बिन इब्राहीम असे होते. बतूता हे त्याच्या घराण्याचे नाव. त्याच्या जन्मगावीच त्याचे परंपरागत न्यायाचे व साहित्याचे शिक्षण झाले. त्याच्या प्रवासवर्णनांपैकी रिहलाह (प्रवास) हे त्याचे सर्वांत प्रसिद्ध पुस्तक होय. त्याने केलेल्या व्यापक प्रवासाचे वर्णन त्याने या पुस्तकात केले आहे. त्याचे हे लेखन खूप काव्यमय वाटत असले, तरी धर्मगुरू व धार्मिक साधुसंत यांचे दर्शन घेण्याच्या त्याच्या उत्कट इच्छेमुळे त्याच्या धार्मिक प्रवृत्तीचे दर्शनही त्यातून होते. तसेच मुस्लिमांच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहासाचीही या पुस्तकामुळे ओळख होते. आपले धार्मिक कर्तव्य पार पाडणे आणि इजिप्त, सिरिया व एझाज येथील विख्यात विद्वान व सूफी संत यांच्याकडून ज्ञानसंपादन करणे हा त्याच्या प्रवासामागील प्रमुख उद्देश होता. त्याने एक-दोन लाख किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला असून बहुतेक सर्व मुस्लीम देशांचा तसेच चीन, सुमात्रा इत्यादी पूर्वेकडील प्रदेशांचा त्याने प्रवास केला.

इब्न बतूताच्या प्रवासाची सुरुवात मक्केच्या यात्रेच्या निमित्ताने १३२५ मध्ये झाली. व्यापाऱ्यांबरोबर तो मक्केच्या यात्रेकरिता अ‍ॅलेक्झांड्रियाहून कैरोस आला व तेथून उंटांच्या एका तांड्याबरोबर दमास्कस, मदीनामार्गे मक्केस पोहोचला. या सफरीमुळे त्याला प्रवासाची खूप आवड निर्माण झाली. मक्केहून परतल्यावर त्याने पर्शिया व इराकचा प्रवास केला. मक्केच्या दुसऱ्या यात्रेनंतर येमेनमध्ये बराच प्रवास करून तो एडनला आला व तेथून दक्षिणेकडे वळला. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोगाडिशू, किल्वा, मोंबासा या बंदरांपर्यंत तो जाऊन आल्याचे व सर्वत्र त्याचे मोठे आदरातिथ्य झाल्याचे त्याने लिहिले आहे. तेथून समुद्रमार्गे तो ओमानमध्ये उतरला व मक्केच्या तिसऱ्या यात्रेकरिता रवाना झाला. दिल्लीचा त्यावेळचा बादशहा महंमद तुघलक याच्या उदारपणाच्या गोष्टी ऐकून तिकडे जावे ही त्याची महत्त्वाकांक्षा होती. परंतु जहाज मिळेना म्हणून तो जमिनीवरून प्रवास करत तांबडा समुद्र पार करून ईजिप्तमध्ये आला व तेथून सिरिया आणि आशिया मायनरचा प्रवास करीत काळ्या समुद्रामार्गे काफा बंदरात पोहोचला. आतापर्यंतच्या सर्व प्रवासात त्याला चर्चच्या घंटांचा आवाज या ठिकाणी प्रथमच ऐकू आला व त्यामुळे तो क्षुब्ध झाला. तेथून त्याने उझबेकिस्तानचा प्रवास केला. यानंतरच्या प्रवासाबाबत त्याने एकदा व्होल्गा नदीवरील बल्घार शहरी गेल्याचे, तर एकदा ग्रीक राजकन्येबरोबर कॉन्स्टँटिनोपलला गेल्याचे सांगितले आहे. तेथील खानाच्या भेटीचे सुरस वर्णनही त्याने केले आहे. तेथून पुढे स्टेप्समधून प्रवास करून तो बुखारा येथे पोहोचला. त्यानंतर इराणमधील खुरासान या विस्तृत प्रदेशाचा प्रवास केल्यावर त्याने हिंदुकुश पर्वत ओलांडून अफगाणिस्तानमार्गे १३३३ च्या सप्टेंबरमध्ये तो सिंधुनदीच्या किनाऱ्यावरून प्रवास करत भारतात पोहोचला. दिल्ली दरबारात पोहोचल्यावर त्याला दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन खिलजी याने १२०० दिनार पगारावर दिल्लीच्या काझीपदाची मानाची जागा दिली. हिंदुस्थानातील त्याच्या आठ वर्षांच्या मुक्कामात तो इतरत्र हिंडल्याची फारशी माहिती त्याच्या लिखाणात वाचायला मिळत नसली, तरी हिंदुस्थानची भव्यता, विविधता व वैभव पाहून तो दिपून गेला होता. त्याच्या पुस्तकातील एक चतुर्थांश भाग, हिंदुस्थानातील त्याला अपरिचित असलेल्या व विचित्र पद्धती व संस्था, नानाविध पदार्थ व त्यांची विपुलता, लोकांची वागणूक, राहणी तसेच बादशहाचे अपार औदार्य आणि त्याबरोबरच जुलूम, जबरदस्ती व क्रौर्य वगैरेंच्या माहितीने भरलेला आहे. त्याच्यावरही बादशहाची अवकृपा झाली होती; पुढे ती दूर झाल्यावर चीनच्या बादशहाकडे राजदूत म्हणून जाण्याचा त्याला हुकूम मिळाला. १३४२ मध्ये तो अलिगढ, कनोज, दौलताबाद, खंबायतमार्गे बोटीने कालिकतला पोहोचला. येथून चीनला जाताना प्रवासात त्याचे जहाज फुटले. तो मग तेथून मालदीवला गेला. तेथे त्याला प्रमुख काझीपद मिळाले. तेथील लोक त्याला फार मान देत. तेथून सु. १३४५ मध्ये स्वर्णदीप उर्फ श्रीलंकेला (सीलोनला) प्रयाण करतो. तेथील पवित्र आदम (अ‍ॅडम्स) शिखराची त्याने यात्रा केली आहे. कोरोमंडलच्या किनाऱ्यावर उतरून मलबारमार्गे तो पुन्हा मालदीवला आला व तेथून बंगालला रवाना झाला. सिल्हेटच्या फकिराला भेट देऊन तो डाक्कामार्गे चीनला जावयास निघाला. पुढे त्याने सुमात्रा, कँटनमार्गे हांगजो व शांघाई (पीकिंग) पर्यंत गेल्याचे लिहिले आहे. तिकडून परत येताना (पॅसिफिक) महासागरात एरुख नावाचा खूप मोठा पक्षी पाहिल्याचे वर्णन त्याने केले आहे. अर्थात वक्रीभवनामुळे त्याला एखाद्या लहान बेटाचा तसा भास झाला असावा, असे वाटते. येताना कोठेही फारसे न थांबता तो सरळ बगदादला आला. तेथे त्याला १५ वर्षांपूर्वी वडिलांचा व तो बगदादला येण्यापूर्वी काही दिवस त्याच्या आईचा मृत्यू झाल्याचे समजले. तेथून तो मक्केस निघाला. वाटेत १३४८ मध्ये सिरियात प्लेगच्या साथीने उडविलेला हाहाकार त्याने पाहिला. त्याचे त्याने अतिशय हृदयद्रावक वर्णन दिले आहे. १३४९ मध्ये तो सार्डिनियामार्गे ट्यूनिशिया तसेच फेज या मोरोक्कोच्या सुलतानाच्या राजधानीत व तेथून तँजिअरला आला. त्यावेळेस धर्मयुद्धे जोरात चालू असल्याने तोही सैन्यात सामील झाला. जिब्राल्टर ओलांडून स्पेनमधील ग्रॅनाडापर्यंत जाऊन तो माराकेशला परत आला. १३५२ साली मोरोक्कोमधून निघून सहारा वाळवंट तुडवीत नायजरपर्यंतचा मोठा धाडसी प्रवास त्याने केला. त्या प्रवासाचे व प्रदेशाचे फार सुरेख वर्णन त्याने दिले आहे. मोरोक्कोच्या सुलतानाने बोलावल्यावरून तो १३५४ मध्ये परत फेजला आला व तेथेच मोरोक्कोचा काझी म्हणून राहिला.

वयाच्या ७३ व्या वर्षी मोरोक्को येथेच त्याचे निधन झाले. त्याच्या जन्मगावी तँजिअर येथे त्याचे दफन करण्यात आले.

मार्को पोलोप्रमाणे इब्‍न बतूताही भूगोलज्ञ नव्हता. दोघांनीही माहिती सांगून लेखकाकडून लिहून घेतली आहे. इब्न जुझ्झाय्य (मृ. १३४४) याने बतूता याचे गद्यमय कथन स्वतःच्या आलंकारिक शैलीने आकर्षक केले आहे. इब्‍न बतूताने त्यावेळची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती खूपच दिली आहे. मार्को पोलोच्या वर्णनात अतिपूर्वेकडील माहिती भरपूर मिळते, परंतु इब्‍न बतूताची भौगोलिक माहिती बरीच अचूक आहे. त्याच्या वृत्तांताचे हस्तलिखित एकोणिसाव्या शतकात पॅरिसला नेण्यात आले. १८५२–५९ मध्ये त्याचे फ्रेंच भाषांतर झाले. १९२९ मध्ये गिब याने इब्‍न बतूताचे चरित्र इंग्रजीत लिहिले आणि १९५८–६२ मध्ये त्याच्या प्रवासवर्णनाचे इंग्रजी भाषांतर-संपादन सुरू केले. त्याच्या भारतातील प्रवासाचा वृत्तांत आघा महंमद हुसेन याने इंग्रजीत १९५३ मध्ये लिहिला.

संदर्भ :

  • Gibb, H. A. R. Ed. Ibn Battuta, Travels in Asia and Africa, London, 1929.
  • Lee, Samual, The Travels of Ibn Batuta, London, 1829.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  समीक्षक : महेश तेंडुलकर