रेन्सीस लायकर्ट : (५ ऑगस्ट १९०३ – ३ सप्टेंबर १९८१ ). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व सामाजिक मानसशास्त्रज्ञ. त्यांनी अभिवृत्ती मापनपद्धती विकसित केली आणि तिला सहभागी व्यवस्थापनाच्या संकल्पनेची जोड दिली. त्याला ‘फाईव्ह पॉइंट लायकर्ट स्केलʼ असे म्हणतात. त्यांचा जन्म अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील शायेन येथे जॉर्ज हर्बर्ट व कोरा ए. या दाम्पत्यापोटी झाला. त्यांनी १९२२ मध्ये मिशिगन विद्यापीठातून अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांत ए. बी. ही पदवी मिळविली, तर १९३२ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयात पी. एचडी. ही पदवी संपादन केली.

लायकर्ट यांनी १९३० ते १९३५ या काळात न्यूयॉर्क विद्यापीठात मानसशास्त्र विषयाचे अध्यापन केले. तत्पूर्वी ते ‘लाईफ इन्शुरन्स एजन्सी मॅनेजमेन्ट असोसिएशनʼ हार्टफोर्ड, कनेक्टिकट या ठिकाणी संशोधन संचालक पदावर कार्यरत होते. तेथे असताना त्यांनी मानवी प्रवृत्तींचा अभ्यासात्मक परिणाम आणि त्यांवर प्रभाव पाडणारे घटक यांचे निरिक्षण करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे लोकांकडून स्वारस्यपूर्ण प्रश्नांची ‘सहमतʼ, ‘पूर्ण सहमतʼ व ‘पूर्णत: असहमतʼ अशी उत्तरे मिळवून त्यांच्या आवडी-निवडीचे मापन करता येई. व्यक्तीच्या प्रत्येक वक्तव्यात एक संख्यात्मक मूल्य नियुक्त केले जात.

लायकर्ट हे १९३९ मध्ये अमेरिकेच्या कृषी खात्यांत कृषी अर्थशास्त्राच्या विभाग कार्यालयात विभागीय संचालक होते. दुसरे महायुद्ध (World War Second) वेळी ते अमेरिकेच्या युद्ध माहितीगार कार्यालयात कार्यरत होते. त्यातच त्यांची १९४४ मध्ये अमेरिकेच्या ‘स्ट्रटेजिक बाँबिंग सर्व्हे मोरॅल डिव्हीजनʼच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ते १९४६ मध्ये मिशिगन विद्यापीठात अध्यापनास सुरुवात केली. त्यांनी तेथे एक संशोधन केंद्र स्थापन करण्यास साह्य केले. त्याचेच नंतर ‘सामाजिक संशोधन संस्थाʼ (Institute For Social Research) असे नामकरण झाले. १९४८ पासून ते त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत (१९७०) लायकर्ट या संस्थेचे संचालक होते. त्यांना समाजशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र या दोन्ही विषयांचे ज्ञान व त्यामधील तरल दृष्टी माहिती होती. समाजशास्त्र क्षेत्रातील सिद्धांताचा व्यवस्थापन शाखेला कोणत्या प्रकारे उपयोग होऊ शकेल, हे प्रमाण मानून त्यांनी आपले सर्व लिखाण व संशोधन केले आहे.

लायकर्ट यांनी १९६१ मधील आपल्या न्यू पॅटर्न्स ऑफ मॅनेजमेंट या प्रसिद्ध ग्रंथात आधुनिक व्यवस्थापनात मानवी संबंधांचे महत्त्व आणि उपयुक्तता यांवर महत्त्वपूर्ण लिखाण केले आहे. त्यांचा हा ग्रंथ त्यांच्या एम. आय. टी.मधील अनुभव आणि संशोधन यांवर आधारित आहे. या ग्रंथाच्या लिखाणाने अमेरिकन उद्योगाचे आधुनिक व्यवस्थापन समृद्ध केले आहे. व्यवस्थापनातील अनेक महत्त्वाचे सिद्धांत अमेरिकन उद्योगातील संशोधनावर आधारित आहेत, असे त्यांचे निरीक्षण आहे.

व्यवस्थापकीय जगात मानवी संबध आणि रचना अत्यंत जटील स्वरूपाच्या असतात.  मानवी स्वभाव, प्रवृत्ती आणि भूमिकांना समजून घेतल्याशिवाय कोणताही व्यवस्थापक आपल्या कार्यात यशस्वी होऊ शकत नाही. लायकर्ट यांनी पर्यवेक्षकाचे त्यांच्या कार्यशैलीनुसार दोन प्रकारात वर्गीकरण केले आहे. १) कार्यकेंद्री पर्यवेक्षक आणि २) मानव्यकेंद्री पर्यवेक्षक.

१) कार्यकेंद्री पर्यवेक्षक : कार्यकेंद्री पर्यवेक्षक केवळ स्वतःचे आणि त्यांच्या अनुयायांचे कार्य याचाच विचार करतात. त्यांना आपल्या अनुयायांचे आणि त्यांच्या भावनांचे विशेष महत्त्व वाटत नाही. ते त्यांच्या भावना आणि भूमिका यांचा विचार न करता त्यांच्यावर आपली मते लादतात. त्यांना ठराविक उद्दिष्टे आणि लक्ष्य यांच्या पलीकडे असणारे मानवी संवेदन आणि भावनांचे जग उमजत नाही. असे व्यवस्थापक प्रारंभी जरी यशस्वी होत असले, तरी नंतर ते आपला प्रभाव गाजवू शकत नाहीत.

२) मानव्यकेंद्री पर्यवेक्षक : मानव्यकेंद्री पर्यवेक्षक मानवी भावना, दृष्टिकोन आणि मनोवृत्ती यांचा विचार करून आपले कार्य, उद्दिष्टे आणि पद्धती निर्धारित करतात. त्यामुळे ते आपल्या अनुयायांना एकत्रित ठेऊ शकतात व त्यांना योग्य दिशा देऊन नेतृत्त्वाची धुरा सांभाळू शकतात. आपल्या अनुयायांना ते निर्णय आणि व्यवस्थापन या प्रक्रियेंत सहभागी करून घेतात.

व्यवस्थापनाचे काही त्रिकालबाधित नियम आहेत. हे नियम आणि सूत्रे सर्वव्यापी आणि सर्वच प्रकारच्या संघटनांना लागू होतात; परंतु ते स्थूल स्वरूपाचे आहेत. स्थळ, काळ आणि पर्यावरणाच्या विशिष्ट मर्यादा यांच्या चौकटीत राहूनच हे नियम कार्य करतात. हे नियम आचरणात आणताना अनुयायांच्या अपेक्षा, कार्यपद्धती आणि भावना यांचादेखील विचार करणे आवश्यक असते. म्हणजेच, ज्या पर्यवेक्षकाला आपला परिसर आणि संघटनेचे उचित ज्ञान व भान असते, तोच अधिक यशस्वी होतो. व्यवस्थापकांची तत्त्वे जरी वैश्विक स्वरूपाची असली, तरी प्रत्यक्ष व्यवहारातील खाचाखोचा आणि वास्तव लक्षात घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, असे लायकर्ट यांचे मत आहे.

लायकर्ट यांचे अमेरिकन व्यवस्थापन तज्ज्ञांच्या परंपरेत एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. वैचारिक संपत्तीसोबतच औद्योगिक अनुभवाचे मोठे पाठबळ त्यांना होते. मध्यम आणि अजस्र उद्योग कसे कार्यरत असतात, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी सल्लागार आणि व्यवस्थापन प्रमुख म्हणून काम करताना घेतला आहे. त्यामुळे त्यांना व्यावहारिक व्यवस्थापनाची अनुभूती आणि अंत:प्रेरणा यांचे सखोल ज्ञान आहे. सध्या मानसशास्त्रात मानवी प्रवृत्ती मापनाकरिता ‘लायकर्ट परिणामाʼचा वापर केला जातो.

लायकर्ट यांनी व्यवस्थापनावर पुढील ग्रंथ लिहिले : टेक्निकल फॉर दि मेजरमेन्ट ऑफ ॲटिट्यूड्स (१९३२); ह्यूमन ऑर्गनायझेशन : ईट्स मॅनेजमेन्ट ॲण्ड व्हॅल्यू (१९६७); न्यू वे ऑफ मॅनेजिंग कॉन्फ्लिक्ट (१९७६).

लायकर्ट यांचे मिशिगन राज्यातील अन आर्बर येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Pollard, Harold R., Development in Management Thought, Michigan, 1974.
  • Tillett, Kempner and Wills, Management Thinkers, London, 1978.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा