सामंत, रघुवीर : (२४ डिसेंबर १९०९-१७ सप्टेंबर १९८५). कुमार रघुवीर. कथा, कादंबरीकार, कोशकार, गीतकार, शब्दचित्रकार, संपादक, प्रकाशक, अनुवादक. जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे. त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडील जगन्नाथ आत्माराम सामंत हे सबजज्ज म्हणून कार्यरत होते. गावोगावी त्यांच्या बदल्या होत असत, त्यामुळे ठाणे,नाशिक, पुणे, सांगली अशा अनेक ठिकाणी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. १९२६ मध्ये मॅट्रीक झाल्यावर सेंट झेवियर कॉलेजमधून १९३४ मध्ये ते बी.ए. झाले. या काळातही त्यांचे लेखन सुरू होते. लहानपणापासूनच त्यांना लेखन, वाचन, संगीत, फोटोग्राफीची आवड होती.देवाची पूजा करण्यापेक्षा माणसाची पूजा करावी, माणुसकी हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे ते आग्रहाने सांगत. गांधीवादी विचारसरणी आणि ध्येयवादी शिक्षकांचे शाळेत झालेले संस्कार, लेखन-वाचनाची आवड आणि अध्यापनाची असलेली आवड यामुळे सामंतांना शिक्षक व्हावेसे वाटले. १९३८ मध्ये कोल्हापूरच्या कॉलेजमधून बी.टी. झाल्यावर १९३८ ते १९५० या कालावधीत शिरोळकर हायस्कूलमध्ये त्यांनी मराठी आणि इतिहास ह्या विषयाचे अध्यापन कार्य केले. आकाशवाणीवरील त्यांचे नाट्यविषयक आणि काव्य गायनाचे कार्यक्रमही रसिकप्रिय होते.
१९२९ मध्ये त्यांचे सुभान्या हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले.हृदय हा शब्द्चित्रांचा संग्रह कुमार रघुवीर या नावाने प्रकाशित झाला (१९३२). उपकारी माणसे (१९३८-४०) आम्ही खेडवळ माणसं (१९४६) जीवनगंगा (१९४७),आम्हाला जगायचंय (१९५४) इ. कादंबऱ्या ; वाळूतील पावले (१९३४, कथाशब्दचित्रे) मासलेवाईक प्राणी (१९४० स्वभावचित्रे ),तारांगण (अभिनव चित्रबंध १९४०), हे लघुनिबंधसंग्रह ; आजची गाणी (१९३९),गीतज्योती(१९४४) रक्त आणि शाई (१९४७) हे कवितासंग्रह; ताडा (१९४६), जिवंत झरे (१९५९) हे कथा-शब्दचित्रसंग्रह ;टॉम सॉयरची साहसे (१९५७),अमरविश्वसाहित्य ,मॉबी डिकचा राक्षस (१९६२) ही अनुवादित पुस्तके .इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे .
१९३४ मध्ये सामंत यांनी पारिजात हे साहित्यविषयक मासिक सुरु केले. कालांतराने मासिक बंद पडले तरी पारिजात प्रकाशनातून त्यांनी स्वत:ची ग्रंथनिर्मिती सुरुच ठेवली होती. पुढे त्यांनी १९४० मध्ये ज्योती हे मासिक सुरु केले. त्यातूनच पुढे १९४२-४४ मध्ये त्यांनी अमरज्योती वाङ्मय विभागाच्या रूपाने योजनाबद्ध बालवाङ्मयाची निर्मिती केली. मडक्याचा न्याय, जलदेवतेचा न्याय अशी त्यांची बालवाङ्मयाची पुस्तके याकाळात प्रकाशित झाली होती. बाबुराव सामंत या चुलतभावांबरोबर त्यांनी चिरंजीव या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व गीते सामंतांची होती.निर्मिती व वितरण व्यवस्थेतही त्यांनी लक्ष घातले.पण अखेर पुन्हा ते अध्यापनाकडे वळले. १९५४-५६ मध्ये त्यांनी दादरच्या शारदाश्रम शाळेत माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हणून काम केले.निवृत्तीनंतर मुलांसाठी ज्ञानपारिजात या सचित्रविज्ञानकोशाचे काम त्यांनी सुरु केले होते.सामंतांचे लेखन हे आदर्शवादी,कौटुंबिक,बोधवादी विचारसरणीचे असून सहज आणि सोप्या भाषेत प्रकट झाले आहे. शब्दचित्र या साहित्यप्रकाराची त्यांनी मराठी साहित्यात घातलेली भर हे त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
संदर्भ :
- गणोरकर,प्रभा,डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा), संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२० -२००३), मुंबई, २००४.