बम्बा, राम प्रकाश (३० सप्टेंबर १९२५).
भारतीय गणितज्ज्ञ. त्यांनी संख्या सिद्धांत (Number Theory) आणि विविक्त भूमिती (Discrete Geometry) या शाखांमध्ये संशोधन कार्य केले. तसेच त्यांनी आवरणींसंबंधी उपपत्ती (Theory of coverings), तारका रचनांसंबंधी क्रांतिक सारणिक (Star bodies Critical determinants) काढण्यात महत्त्वाचे संशोधन करून निष्कर्ष काढले.
राम प्रकाश बम्बा यांचा जन्म जम्मू येथे झाला. त्यांचे गणितातील पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोर येथे झाले. त्यानंतर त्यांनी सेंट जॉन कॉलेज, केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड येथे लुईस जे. मॉर्डेल यांच्या मार्गदर्शनाखाली १९५०मध्ये पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर वर्षभर युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे संशोधन करून त्यांनी एच्. डेवनपोर्ट, सी. ए. रॉजर्स आणि के. एफ. रॉथ यांच्याबरोबर बरेच शोधनिबंध लिहिले. नंतर त्यांनी भारतात अध्यापन कार्य सुरू केले. ते पंजाब विद्यापीठ, चंदिगड येथे १९५२ मध्ये रीडर आणि १९५७ मध्ये प्राध्यापक झाले. १९८५–९१ या काळात ते पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू होते. १९९३ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांची तेथेच गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus) या पदावर नियुक्ती झाली. १९६४–६९ या काळात ओहायओ स्टेट विद्यापीठ, अमेरिका येथे ते अतिथी प्राध्यापक होते. त्यांना १९७० मध्ये, केंब्रिज विद्यापीठाची डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी मिळाली.
संख्या सिद्धांत आणि विविक्त भूमितीमधील अंकगणितीय फलनांच्या एकरूपतेचे गुणधर्म (Congruence properties of arithmetic functions), अ-बहिर्वक्र प्रदेशांचे (non-convex regions), क्रांतिक निर्धारके (Critical determinants) काढण्याच्या पद्धती, नैकविध आकार (non-homogeneous forms), रामानुजन् टी-फलन (Ramanujan`s T-Function), अनिश्चित समीकरणे (Diophantine equations), गौसीय बेरीज (Gaussion sums) इत्यादी संकल्पनांवर बम्बा यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी आवरणींसंबंधीची उपपत्ती (Theory of coverings) तसेच तारका रचना यासंबंधीची क्रांतिक निर्धारके काढण्यात महत्त्वाचे संशोधन करून निष्कर्ष काढले. संख्याभूमिती (Geometry of numbers) ह्या मिंकोव्हस्की यांनी नव्याने सुरू केलेल्या संख्या सिद्धांतातील शाखेत बम्बा ह्यांनी महत्त्वाची भर घातली. ही शाखा बहिर्वक्र रचना(Convex bodies) आणि न-मितीय अवकाशातील पूर्णांक सदिश (Integer vectors in n-dimensional space) यांचा अभ्यास करते. त्रिमितीय गोलांसाठी जालक आवरणीची सर्वोत्तम घनता काढणे, (Best lattice covering density for 3-dimensional spheres) आणि न-मितीय गोलांसाठी जालक आवरणीच्या घनतेचा अंदाज काढणे अशा संशोधनात त्यांचे कार्य आहे. त्यांनी ए. सी. वुड्स यांच्याबरोबर शोधलेली बहिर्वक्र अधिक्षेत्राच्या(Convex domains) सान्त आवरणी (Finite coverings) साठीची असमानता (Inequality) ‘बम्बा-वुड्स’ असमानता या संयुक्त नावाने प्रसिद्ध आहे. मिंकोव्हस्की यांची नैकविध रेषीय रचनांसंबंधीची अटकळ (Conjecture on non-homogeneous liner forms) आणि नैकविध वर्गीय रचनांची मूल्ये (Values of non-homogeneous quadratic forms) यांबद्दल बम्बा यांनी मोलाचे संशोधन केले. विशेषतः दीर्घकाळ अनुत्तरित असलेली मिंकोव्हस्की यांची न = ४ आणि न = ५ यांसंबंधीची अटकळ सिद्ध करण्यात त्यांनी योगदान दिले.
बम्बा यांनी पंजाब विद्यापीठात संख्या भूमितीचे प्रगत अध्ययन केंद्र स्थापन करण्यातही पुढाकार घेतला. त्यांना इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्स, नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया आणि विद्यापीठ अनुदान आयोग या संस्थांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमीचे श्रीनिवास रामानुजन पदक (१९७९) व आर्यभट पदक (१९८८), इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे श्रीनिवास रामानुजन पदक आणि जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी व्याख्यान पारितोषिक, इंडियन नॅशनल मॅथेमॅटिकल सोसायटीचे रामानुजन व्याख्यान पारितोषिक, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हरिओम ट्रस्टचे सैद्धांतिक विज्ञानासाठी दिले जाणारे मेघनाद साहा पारितोषिक आणि भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार (१९८८) असे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी १९७९–८० या वर्षी, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी या संस्थेचे उपाध्यक्षपद तसेच १९६९-७० या वर्षी इंडियन सायन्स काँग्रेसच्या गणित विभागाचे अध्यक्षपद आणि इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचेही अध्यक्षपद भूषविले.
संख्यासिद्धांताचा सर्वंकष आढावा घेणारा ‘नंबर थिअरी ’ (Number Theory)हा त्यांनी सहसंपादित केलेला ग्रंथ आणि ‘ऑन द जॉमेट्री ऑफ नंबर्स ऑफ नॉन-कॉन्व्हेक्स स्टार रिजन्स विथ हेक्झॅगोनल सिमेट्री ’(On the Geometry of Numbers of Non-Convex Star Regions with Hexagonal Symmetry) हा शोधनिबंध नावाजलेला आहे.
संदर्भ:
- www.maths.puchd.ac.in
- https://en.wikipedia.org/wiki/Ram_Prakash_Bambah
- www.insaindia.res.in
- The shaping of Indian Science 1982-2003.Indian Science Congress Association Presidential Address Vol III,1982-2003,University Press,Delhi 2003
समीक्षक – विवेक पाटकर