एडेलमान, जेरल्ड मॉरिस (१ जुलै १९२९ – १७ मे २०१४.)
अमेरिकन वैद्यक (physician) आणि भौतिक रसायनशास्त्रज्ञ. एडेलमान यांनी प्रतिपिंडे (antibodies) एकाच लांब प्रथिनांची बनलेली नसून दोन जड आणि दोन हलक्या प्रथिनांपासून बनलेली असतात आणि या प्रथिनांच्या साखळ्या जोडलेल्या असतात असे दाखवून दिले. एडेलमान आणि मॅनहटन येथील रॉकफेलर विद्यापीठातील त्यांचे सहकारी यांनी प्रतिक्षम आवर्तुलीच्या (इम्युनोग्लोबुलीन) रचनेचा शोध लावला. रोगविरोधी प्रतिकारशक्ती म्हणून काम करणाऱ्या प्रतिपिंडांविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना रॉडनी रॉबर्ट पोर्टर (Rodney Porter) यांच्यासमवेत १९७२ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.
एडेलमान यांचा जन्म क्वीन्स, न्यूयॉर्क येथे झाला. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतल (१९५४). दोन वर्षे त्यांनी पॅरिसमध्ये कॅप्टन म्हणून सैन्यात नोकरी केली. पुढे त्यांनी रॉकफेलर संस्थेत प्रतिपिंडांवर (Antibodies) संशोधन सुरू केले. नंतर त्यांनी हेन्री कंकेल (Henry Kunkel) यांच्या प्रयोगशाळेत पीएच.डी.साठी काम केले. सैन्यात असताना एका पुस्तकाने एडेलमान यांच्या मनात प्रतिपिंडांविषयी कुतूहल जागृत झाले. अमेरिकेत गेल्यावर त्यांनी प्रतिपिंडांच्या रासायनिक रचनेवरच काम केले व भौतिकी-रसायन शास्त्रात पीएच.डी. मिळवली (१९६०). एडेलमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे काम आणि रॉडनी पोर्टर यांनी केलेल्या कामामुळे प्रतिपिंडांविषयी रासायनिक रचना समजण्याएवढी माहिती मिळाली. एडेलमान यांनी प्रतिपिंड एकाच लांब प्रथिनांची बनलेली नसून दोन जड आणि दोन हलक्या प्रथिनांपासून बनलेली असतात व या प्रथिनांच्या साखळ्या जोडलेल्या असतात असे दाखवून दिले. तसेच इतर सहकाऱ्यांसोबत त्यांनी प्रतिक्षम आवर्तुलीच्या संपूर्ण रचनेचा शोध लावला. त्यांनी केलेली ही प्रगती आणि रॉडनी पोर्टर यांचे काम या सर्वानी प्रतिकारशक्तीच्या (इम्युनॉलॉजी) क्षेत्रात खूप संशोधन सुरू झाले. या योगदानामुळे चिकित्साविषयक निदान आणि उपचार यांमध्ये प्रगती झाली.
एडेलमान यांनी नंतर मेंदू आणि जाणिवेचे स्वरूप यावर काम सुरू केले. याला एडेलमान ‘मेंदूने मनाला जन्म देणे’ असे म्हणत. त्यांनी संगणक हे मेंदूच्या अभ्यासाचे प्रारूप आहे ही अस्तित्वात असलेली कल्पना नाकारली.
एडेलमान ह्यांनी आधी दाखवून दिले होते की, प्रतिपिंड डार्विनच्या निवड पद्धतीनुसार काम करतात. त्याने आता असे सुचवले की मेंदू न्यूरॉनच्या निवडीप्रमाणे काम करतो. त्याने त्याला न्यूरल डार्विनिजम असे म्हटले.
एडेलमान ह्यांनी, मेंदू अनुभवातून प्रतिसाद द्यायला कसा शिकतो व कसा आकार घेतो हे दाखवून दिले. त्यांच्या मते विशिष्ट न्यूरोनल गटाची निवड ह्याला जबाबदार असते.
एडेलमान यांनी न्यूरल डार्विनिजम आणि त्याची जीवशास्त्र व जाणिवा यांच्यातील संबंधांवर चार पुस्तके लिहिली. Bright Air, Brilliant Fire: On the Matter of the Mind (1992) हे त्यातील एक. त्यांनी गिलिओ टोनन (Giulio Tonon) यांच्याबरोबर लिहिलेले A Universe of Consciousness: How Matter becomes Imagination हे पुस्तक जाणिवांचे अनुभव व न्यूरल संबंध याबद्दल नवीन माहिती देते. एडेलमान Wider than the Sky – The Phenomenal Gift of Consciousness या त्यांच्या अलीकडच्या पुस्तकात जाणिवांचे जीवशास्त्र याविषयी माहिती करून देतात.
एडेलमान यांनी शेकडो लेख आणि ५०० पेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले. एडेलमान प्रश्न सोडविणारे म्हणून ओळखले जायचे. ते त्यांच्या अमर्याद बौद्धिक शक्तीने कठिण प्रकल्प हाताळायचे आणि मोठे प्रश्न सोडवायचे. त्यांनी विस्तृत सोपपत्तीमधून (थिअरी) मेंदूची वाढ, रचना आणि कार्य यांचा व न्यूरोनल गट निवड याचा संबंध मांडला. एडेलमान यांनी मज्जाशास्त्राचा (न्यूरोसायन्स) अभ्यास करताना recognition automata सारखी नवीन यंत्रे विकसित केली . The Remembered Present पुस्तकात जाणिवा आणि न्यूरोनल गट निवड यासंदर्भात सोपपत्ती दिली आहे. Bright Air, Brilliant Fire या त्यानंतरच्या पुस्तकात न्यूरोनल गट निवड आणि न्यूरल उत्क्रांती यांचा मेंदू आणि मन या आधुनिक संकल्पनेशी संबंध दाखविला आहे.
एडेलमान यांनी जीवभौतिकी, प्रथिनांचे रसायनशास्त्र, प्रतिक्षमताशास्त्र, पेशी जीवशास्त्र आणि मज्जाजीवशास्त्र या विषयातील संशोधनात भरीव कामगिरी केली आहे. एडेलमान यांनी न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली.
एडेलमान यांचे सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.
संदर्भ :
- Bruce Weber, Gerald M. Edelman, Nobel Laureate and ‘Neural Darwinist,’ Dies at 84, http://www.nytimes.com/pages/science/index.html, May 22, 2014.
- Gerald Edelman – obituary, Telegraph, http://www.telegraph.co.uk/news/obituaries/ June 12, 2014.
- John Horgan, My Testy Encounter with the Late, Great Gerald Edelman, http://www.scientificamerican.com/, May 22, 2014.
- Curriculum Vitae of Prof. Dr. Gerald M. Edelman, Lindau Nobel Laureate Meetings, http://lindau-nobel.org/
- Biography on the official website of the Nobel Prize, http://nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1972/edelman-bio.html
- Richard A. Lerner, Gerald Maurice Edelman, Retrospective, PNAS, 29 July 2014, 10900-10901, Vol. 111. No. 30,www.pnas.org/cgi/doi/10.1073/pnas.1410861111
समीक्षक – रंजन गर्गे