कृषी, उद्योग, वातावरणाच्या रासायनिक संरचनेत बदल, धरणांचे बांधकाम, निर्वनीकरण आणि वनीकरण, भूजलाचा उपसा, नद्यांमधून होणारा उपसा, शहरीकरण इत्यादी क्रियासमूह मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी केले जातात. परंतु त्याचा जलचक्रावर परिणाम होत असतो. हे सर्व अधिक गतीने झाले तर त्याचे परिणामही तशाचप्रकारे वाढतात. अंतिमतः हे मानवी जीवनासाठी सुखदायक असेलच असे नाही. जगभरातील शास्त्रज्ञांची यासंबंधी, ढोबळमानाने तरी एकवाक्यता आहे. म्हणूनच जगभरातील राज्यकर्ते याविषयाच्या अभ्यासासाठी सहमत आहेत. त्यासाठी जलवायू परिवर्तनावरील आंतरशासकीय समितीची रचना झाली आहे.

हवामानावरील परिणाम : जलचक्र हे सूर्याच्या ऊर्जेमुळे कार्यान्वित होते. जागतिक बाष्पीभवनापैकी ८६% बाष्पीभवन महासागरांमधून होते. बाष्पीभवनामुळे समुद्राचा पृष्ठभाग शीतही होतो. बाष्पीभवन – शीतकरणामुळे तापमान कमी होते. असे शीतकरण झाले नाही तर त्याचे परिणाम हरितगृह परिणामांवर होऊन कदाचित खूप अधिक तापमानवाढ होईल (६७ सेल्सिअस पर्यंत) असाही एक मतप्रवाह आहे.

जलप्रस्तरांमधील पाणी अति-उपसा केल्यामुळे जलावरण (hydrosphere) पाण्यात वाढ होऊन समुद्राचा पातळी वाढण्याचे तेही एक कारण होईल.

जलचक्र हे स्वतःच एक जैवभूरासायनिक चक्र आहे. पाण्याचा भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील (जमिनीखालील) प्रवाह हा जैवभूरासायनिक घटकांच्या चक्राचा कळीचा घटक आहे.  वर्षास्रवण (पाणलोट) हे धूप झालेले खडकांचे सूक्ष्म कण आणि फॉस्फरस वाहून नेण्याचे मुख्य कारण आहे. समुद्रांची क्षारयुक्तता जमिनीवरील धूप झालेल्या आणि समुद्रात वाहून गेलेल्या विद्राव्य क्षारांमुळे आहे. सरोवरांचे कल्चरल युट्रॉफिकेशन (Cultural Eutrophication) हे प्रामुख्याने फॉस्फसरमुळे होते. कृषीसाठी वापरल्या जाणाऱ्या खतांमध्ये फॉस्फरस असतो.  अतिरिक्त वापरल्या जाणाऱ्या खतांमधील हा फॉस्फरस पाण्याबरोबर जमिनीवरून नद्यांमध्ये वाहत जातो.  तसेच वर्षास्रवण आणि भूजलप्रवाहांमुळे जमिनीवरील नायट्रोजनही जलसाठ्यांमध्ये जातो.  मिसिसिपी नदीचा निष्कासक्षेत्राचा भाग (outlet) हा मृत झाला आहे. तो अतिरिक्त नायट्रोजन कृषिक्षेत्रांवरून प्रवाहित होऊन नद्यांद्वारे गल्फ ऑफ मेक्सिकोपर्यंत गेल्यामुळे झाला आहे. वर्षास्रवण, धूप झालेले खडक आणि माती वाहून नेण्याच्या क्रियेमुळे, कार्बनचक्रातही (Carbon cycle) भूमिका वठवतो.

जलचक्राचा इतिहास : प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये जलचक्राविषयीचे उल्लेख आढळतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी (NIH), रुडकी या संस्थेने Hydrology in Ancient India हे पुस्तक प्रकाशित केले आहे (१९९०). त्यामध्ये याविषयीची माहिती संकलित करण्यात आली आहे. (एक्लीझियास्टीस १ : ७) हिब्रू विद्वानांनी नद्या कायम समुद्रात पाणी नेत असूनही समुद्र पूर्णपणे भरत नाहीत असे प्रतिपादन केले आहे आणि एका अर्थाने जलचक्राचे वर्णन केले आहे.

 

समीक्षक : अशोक पटवर्धन