पर्जन्य : द्रवीभवन झालेले बाष्प पर्जन्यरूपाने पृथ्वीवर पडते. बहुतांश पर्जन्य पाणी या स्वरूपातच असते; परंतु ते हिम, गारा, दव, हिमकण असे अन्यान्य स्वरूपातही असू शकते.  सु. ५,०५,००० किमी. पाणी पृथ्वीवर पर्जन्यरूपाने पडते. त्यातील ३,९८,००० किमी हे सागरांवर पडते. भूभागावर पडणारे पाणी १,०७,००० किमीआहे आणि हिमस्वरूपात मात्र सु. १,००० किमीआहे. सागरांवर ७८% पर्जन्यवृष्टी होते.

हिमनद्या अथवा अतिथंड भागात साठलेले हिम/बर्फ उन्हाळ्यात वितळून त्याद्वारे प्रवाही जलात त्याचे रूपांतर होणे. भारतामध्ये हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे प्रवाह यामुळे उन्हाळ्यातही वाढतात.

भूपृष्ठावरील जलप्रवाह : भूपृष्ठावरून अनेक मार्गांनी पाणी वाहत असते. नद्या, नाल्यांमधून वाहणारे पाणी अंतिमतः सागराला मिळत असते, तरी वाहत असताना ते जमिनीत मुरते व त्याचे बाष्पीभवन होते. भूपृष्ठावरून वाहताना ते सरोवरांमध्ये आणि जलसाठ्यांमध्येही साठविले जाते. या साठ्यांतून ते कृषी अथवा अन्य मानवी उपयोगांसाठी वापरले जाते.

पाण्याचा झिरपा : भूपृष्ठावरून भूभागात पाणी जाणे (झिरपणे) याला पाण्याचा झिरपा म्हणतात. भूभागात पृष्ठीय मातीच्या थरात पाणी गेल्यावर ते मातीची आर्द्रता वाढविते, आणखी खोलवर पाझरून भूजल होते. मातीची आर्द्रता ही पूर्णतः भूजलाचा भरणा अथवा वनस्पतींच्या बाष्पोच्छ्वासासाठी (Evapotranspiration) उपलब्ध असतेच असे नाही.

भूभागांतर्गत जलप्रवाह : भूभागातील सच्छिद्र खडक अथवा भूरचनेमध्ये साठविले गेलेले पाणी भूरचनेनुसार झऱ्यांच्या स्वरूपात बाहेर येते किंवा भूभागांतर्गत प्रवाही राहून सागरासही मिळते.  गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे भूभागामधील पाणी तेथून भूभागात येते त्यापेक्षा कमी पातळीच्या भूभागात प्रवाही जल म्हणूनही वाहते. भूजलाच्या प्रवाहाचा, गतीचा किंवा भूजलाचा पुनर्भरणा होणाऱ्या प्रक्रियेचा वेग अत्यंत कमी असतो.  त्यामुळे भूजल भूभागांमध्ये हजारो वर्षे राहू शकते.

बाष्पीभवन : पाण्याचे स्थिर पृष्ठभागावरून किंवा प्रवाही द्रवरूप स्वरूपातून वायुरूप (वाफ) होण्याची प्रक्रिया म्हणजे बाष्पीभवन होय. पाण्याचे हे अवस्थांतर पाणी प्रवाही असताना अथवा भूपृष्ठावरील जलसाठ्यांमधून व महासागरांमधून सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेनुसार सातत्याने होत असते. बाष्पीभवनात सामान्यतः वनस्पतींद्वारा सूर्याच्या उत्सर्जित उष्णतेमुळे होणारे पाण्याचे द्रव ते वायू हे अवस्थांतरणही अंतर्भूत आहे. वनस्पतींच्या माध्यमातून होणारे बाष्पीभवन याला बाष्पोच्छ्वास असे स्वतंत्रपणे म्हटले जाते. एकूण सर्व प्रकारे होणारे बाष्पीभवन साधारणतः ५,०५,००० किमी इतके आहे. त्यातील सु. ४,३४,००० किमी हे सागरावरून होते. म्हणजेच साधारणतः ८६% वार्षिक जागतिक बाष्पीभवन सागरांवरून होते.

ऊर्ध्वपातन : पाण्याचे हिम किंवा बर्फ या घन रूपातून थेट बाष्प म्हणजे वायुरूपात अवस्थांतरण होणे.

घनीभवन (Deposition) : पाण्याच्या बाष्पाचे थेट हिम किंवा बर्फात रूपांतरण होणे.

जलाभिसरण / अभिवहन (Advection) : पाण्याची घन, द्रव किंवा वायुरूप अवस्थेत होणारी हालचाल (अभिसरण) याला जलाभिसरण असे म्हणतात. जलाभिसरण झाल्याशिवाय महासागरांवरून बाष्पीभवन होणारे पाणी पृथ्वीतलावर पर्जन्य म्हणून पडू शकत नाही.

द्रवीभवन (Condensation) : वातावरणातील वाफेच्या सूक्ष्म कणांचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होणे याला द्रवीभवन म्हणतात.

बाष्पोच्छ्वास (Evapotranspiration) : वनस्पतींच्या पानांमधून आणि मातीमधून होणाऱ्या बाष्पीभवनास बाष्पोच्छ्वास म्हणतात. ही पाण्याची वाफ नुसत्या नजरेला दिसू शकत नाही.

पाझर : पाणी गुरुत्वाकर्षणामुळे माती, जमीन, खडक यांतून खाली पाझरते.

भूपट्ट सांरचनिकी (Plate Tectonics) : पृथ्वीचा पृष्ठभाग काही कठीण प्रतलांनी / भूस्तरांनी (Plates) बनलेला आहे. या भूभागांच्या प्रतलांच्या अत्यंत कमी गतीने, पण निश्चितपणे, हालचाली होत असतात. हे भूभाग एकमेकांपासून तुटलेले आहेत. एकमेकांच्या वर सरकणे, खाली सरकणे किंवा एकमेकांवर दाब टाकणे अशा प्रकारच्या या हालचाली असतात. या प्रतलांमधून पाणी पृथ्वीच्या गाभ्याकडे जाते. ज्वालामुखीच्या स्फोटाचे वेळी ते पुनश्च भूतलावर येते.

समीक्षक – अशाेक पटवर्धन

प्रतिक्रिया व्यक्त करा