सम्राट अशोक : (इ.स.पू. ?३०३—?२३२). सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्य याचा नातू आणि बिंदुसार याचा मुलगा. बिंदुसार इ.स.पूर्व २७३ साली निवर्तला. त्यानंतर मगधाच्या गादीबद्दल वाद निर्माण झाले. त्यावर मात करून अशोकाने मगध राज्याचा ताबा मिळवल्यानंतर इ.स.पू. २६९ साली त्याचा राज्याभिषेक झाला. अशोक अत्यंत शूर होता. आपल्या राज्याचा विस्तार त्याने दक्षिणेत म्हैसूरपर्यंत केला आणि दक्षिणेकडील चोल, पांड्य, सत्यपुत्र आणि चेर (केरळपुत्र) या राज्यांना आपले मांडलिकत्व पत्करावयास भाग पाडले. तसेच उत्तरेकडील काश्मीर राज्य त्याने आपल्या आधिपत्याखाली आणले. आंध्र आणि बंगाल या दोन्ही प्रदेशांच्या मध्ये असलेले कलिंग राज्य अशोकाने प्रखर लढाईअंती जिंकून घेतले. त्या युद्धात दोन्ही बाजूंच्या सैन्यदलांची प्रचंड हानी झाली. अशोकाने आपल्या साम्राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेल्या शिलालेखांपैकी १३व्या शिलालेखात या युद्धाचा उल्लेख आहे. ‘कलिंग देशाबरोबरील युद्धात एक लाख सैनिक मारले गेले, दीड लाख बेपत्ता झाले आणि त्याहून जास्त जखमी झाले’, असे त्या शिलालेखावर नमूद करण्यात आले आहे. युद्ध संपल्यावर पसरलेल्या रोगराईत अनेक प्रजाजन मृत्यू पावले. या सगळ्यामुळे अशोक शोकग्रस्त झाला आणि त्याच्या मनात ऐहिक सुखांबाबत अतीव विरक्ती निर्माण झाली. त्यापश्चात त्याने सत्य आणि अहिंसावादी बौद्ध धर्म स्वीकारला.
अशोक एक कर्तृत्ववान राजा होता. कार्यक्षम अनुशासन, लोककल्याणाभिमुख राज्यकारभार आणि सौजन्यपूर्ण धर्मप्रसार यांसाठी तो नावाजला जातो. अशोकाने अनेक शिलालेख, स्तंभलेख आणि गुहालेख जागोजागी निर्माण केले. त्यांत राज्याचे शासन, शासकीय अधिकाऱ्याची लोकांसाठी बांधिलकी, आत्मसंयम, धर्म आणि सामान्य जनतेच्या सुवर्तनाबाबत विचार अशा विविध विषयांवर भाष्य केले गेले होते. तसेच मगध राज्यात येणाऱ्या परकीयांसाठी राज्यघटना आणि व्यवस्थापनाबाबत माहिती सीमा भागांतल्या शिलालेखांवर कोरली होती. अशोकाने तिसऱ्या बौद्ध धर्मपरिषदेचे पाटलिपुत्र (पाटणा) येथे आयोजन केले. कलिंग युद्धापश्चात साम्राज्यात सर्वत्र शांतता नांदत राहिल्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास झाला, राज्यांत स्थैर्य निर्माण झाले आणि अशोकाने घालून दिलेल्या मूल्यप्रणालींची जोपासना होऊ शकली. अफगाणिस्तानपासून बंगालच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशावर सार्वभौमत्व स्थापन करणारा अशोक भारतीय इतिहासातील एकमेव योद्धा होता. त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ भारतीय सम्राट मानला जातो.
संदर्भ :
- Majumdar, R. C.; Pusalkar, A. D. Ed. The Age of the Imperial Unity, Vol. 2, Bombay, 1960.
- कदम, य. ना. समग्र भारताचा इतिहास, कोल्हापूर, २००३.
समीक्षक – मनिषा पोळ
nice information given