डिकिका बालक हे ३३ लक्ष वर्षांपूर्वीच्या एकाऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस जीवाश्म बालकाचे नाव आहे. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ झेरेसेनाय ऑलेमसागेड यांना या बालकाचे जीवाश्म (डीआयके-१) इथिओपियात हडारजवळील डिकिका येथे २००० मध्ये सापडले. आजूबाजूच्या कठीण दगडांमधून हे जीवाश्म वेगळे काढायला तेरा वर्षे लागली. या लहान मुलीला डिकिका बालक व सेलम (Selam) अशी नावे देण्यात आली आहेत. इथिओपियातील स्थानिक आम्हारिक भाषेत सेलमचा अर्थ ‘शांतताʼ असा आहे. या बालकाला पुरामानवशास्त्राच्या इतिहासातील प्रसिद्ध जीवाश्म ‘ल्युसीʼ हिचे बाळ असेही म्हणतात. तथापि ते बरोबर नाही; कारण ल्युसीच्या अगोदर किमान एक लाख वीस हजार वर्षांपूर्वी (३३ लक्ष वर्षे) हे बालक अस्तित्वात होते.
डिकिका बालक या अडीच वर्षे वयाच्या लहान मुलीची सुमारे ४० टक्के हाडे मिळाली आहेत. तिच्या दातांच्या अभ्यासातून असे दिसते की, दात येण्याची क्रिया साधारणपणे चिंपँझींप्रमाणे होती. तिच्या गळ्यामधील कंठास्थी (Hyoid) व गळ्याभोवतालची हाडे (Clavicle) यांची रचना कपींप्रमाणे होती. सेलमच्या पायांची रचना ही चिंपँझींप्रमाणे झाडांमध्ये वावरण्यासाठी अनुकूल असली, तरी ती नियमितपणे दोन पायांवर चालण्यास सक्षम होती. तिच्या पाठीचा कणा दोन पायांवर उभे असताना पडणारा भार पेलू शकत होता, हे तिच्या मणक्यांच्या रचनेवरून स्पष्ट झाले आहे.
संदर्भ :
- Alemseged, Z.; Spoor, F.; Kimbel, W. H.; Bobe, R.; Geraads, D.; Reed, D. & Wynn, J. G. ‘A juvenile early hominin skeleton from Dikikaʼ, Nature, 443 : 296-300, Ethiopia, 2006.
- Kimbel, William H.; Delezene, Lucas K. ‘Lucy Redux : A Review of Research on Australopithecus afarensisʼ, Yearbook of Physical Anthropology, 52 : 2-48, 2009.
समीक्षक – शौनक कुलकर्णी