वाकाटक हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध राजवंश. या राजवंशाच्या काळातील मंदिरांचे अवशेष मागील काही दशकांपासून विदर्भातील वेगवेगळ्या भागांत उत्खननाद्वारे उजेडात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे मिळालेल्या शिलालेखामध्ये वाकाटक नृपती पहिला रुद्रसेन याने बांधलेल्या ‘धर्मस्थानाʼबद्दलची माहिती मिळते. ‘धर्मस्थानʼ म्हणजे धार्मिक उपासनेचे स्थळ अथवा मंदिर. वाकाटककालीन मंदिरे विटांची तर आहेतच; परंतु प्रस्तर मंदिरेही आढळतात. विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन मंदिरांचे अवशेष विदर्भातील मांढळ, मुलचेरा, मनसर, नागरा व वाशिम येथे झालेल्या उत्खननात निदर्शनास आले आहेत. येथील मंदिरांचे अधिष्ठानापर्यंतचे अवशेष उपलब्ध होऊ शकले, मात्र मंदिरांच्या इतर भागांबाबत अंदाज करता आले नाहीत. असे असले तरी तत्कालीन मंदिरस्थापत्याच्या आधारे – उत्तर भारतातील गुप्तकाळातील मंदिरे – या मंदिरांच्या उर्वरित रचनेची कल्पना करता येते. त्याचप्रमाणे ही मंदिरे मंदिरस्थापत्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातील, प्राथमिक (मांढळ, मुलचेरा) तसेच प्रगत अवस्थेतील (नागरा, मनसर, वाशिम) आहेत.

वाकाटककालीन मंदिराचे अवशेष, मनसर (नागपूर).

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मांढळ येथे १९७५-७७, १९८५ व १९९२ मध्ये करण्यात आलेल्या उत्खननात तीन मंदिरांचे अवशेष प्राप्त झाले. बोंगी हुडकी, भोला हुडकी व वऱ्हाडी तलाव या नावाने ही ठिकाणे ओळखली जातात. येथील पहिली दोन मंदिरे शेजारी, तर तिसरे ५०० मी. अंतरावर आहे. बोंगी हुडकी येथील मंदिररचनेत गर्भगृह व मुखमंडप असलेल्या मध्यम आकाराच्या मंदिराचे अवशेष उपलब्ध झाले. शेजारील भोला हुडकी या ठिकाणी आयताकृती ओटा असून त्याच्या अरुंद बाजू दक्षिणोत्तर आहेत. दक्षिण व उत्तरेकडे ओट्यावर जाण्यासाठी जिने आहेत. या मंदिरापुढे खाली अरुंद होत जाणारे पाच फुटांहून अधिक खोलीचे एक कुंड आहे. मंदिराजवळच पुजाऱ्यांची घरे असावीत. या सर्व वास्तूंभोवती प्राकार होता. प्राकाराच्या आत शैव व वैष्णव मूर्ती भग्नावस्थेत एकाच खड्ड्यात आढळल्या. वऱ्हाडी तलाव येथील मंदिररचनेत गर्भगृह आणि त्यात प्रवेशासाठी पायऱ्या होत्या. सोपानाला ४·४९ मी. लांबीचा कठडा आहे. कठड्याच्या उभ्या बाजूंना नंतरच्या काळात वालुकाश्म घडीव चिरे लावलेले आढळतात. ही चिऱ्यांची भिंत प्रणालकाच्या पातळीपर्यंत आहे. उत्खननादरम्यान प्रतिहारीचे व सिंहाचे शिल्प तसेच गर्भगृहात शिवलिंग सापडले. या मंदिराचा काळ इ. स. चौथे–पाचवे शतक असा ठरतो.

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे १९८७-८८ आणि १९८८-८९ या काळात झालेल्या उत्खननात दोन मंदिरांचे अवशेष उजेडात आले. गावाच्या सीमेलगत असलेल्या टेकाडातील (विवेकानंदपूर) उत्खननात मंदिराच्या तलविन्यासावरून मुखमंडप व त्याला लागून गर्भगृह अशी रचना दिसून आली. या मंदिराचे पीठ बांधताना पवनी येथील स्तूपामध्ये (जगन्नाथ टेकडी) अंमलात आणलेल्या तंत्राचा प्रभाव असल्याचे दिसून आले. दुसऱ्या मंदिराचे अवशेष विशेष उल्लेखनीय नाहीत.

नागपूर जिल्ह्यातील मनसर (ता. रामटेक) येथे गावापासून पूर्वेला १ किमी. अंतरावर प्राचीन काळातील विटांनी बांधलेली चार मंदिरे हिडिंबा टेकडीच्या उत्खननात उजेडात आली (१९९८–२००८). उत्खनकांच्या मते, यांतील भव्य शिवालय व शिवमंदिर समूह ही दोन मंदिरे ही वाकाटक काळातील होत, तर दुसरी दोन मंदिरे वाकाटकपूर्व काळातील असावीत. या मंदिरांच्या गर्भगृहांचा तलविन्यास तारांकित असून इ. स. दुसऱ्या शतकातील ही सर्वांत प्राचीन मंदिरे होत.

भव्य शिवालय : या मंदिराचे अवशेष हिडिंबा टेकडीच्या माथ्यावर पश्चिमेला निदर्शनास आले. पाषाणाची पायाभरणी केलेल्या या मंदिराच्या वास्तुरचनेचे दोन टप्पे आढळतात. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरास पूर्वेकडे अर्धमंडपास (४·३०×८ मी.) प्रवेशाकरिता पायऱ्या होत्या. अर्धमंडपाच्या पश्चिमेला मंडप (६×५ मी.) व त्यालगत गर्भगृहाचे (५×५ मी.) अवशेष आढळले. हे गर्भगृह फरश्यांनी आच्छादले होते, तर फक्त मंडपाच्या जोत्याचे बांधकाम पाषाणात केले होते. गर्भगृह व मंडपाभोवती २ मी. रुंद प्रदक्षिणापथ होता. मंदिराचा वरचा भाग विटांनी बांधलेला तसेच अलंकारित केलेला असावा, असे अनुमान करण्यात आले. त्याचप्रमाणे वाकाटक काळातील शिल्पपरंपरेतील शिल्पेही उत्खननात सापडली. या मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती याच मंदिराच्या नैर्ऋत्य भागातून १९७० साली सापडलेल्या प्रख्यात शिवाची (वामनठेवणीची) असावी. तसेच हे मंदिर वाकाटक नृपती प्रवरसेन (पहिला) याने बांधले असावे, तर प्रवरसेन (दुसरा) याने आपल्या आजोबांच्या (प्रवरसेन पहिला) स्मरणार्थ याचे पुनर्नामांकन केलेले ‘प्रवरेश्वर देवकुलस्थानʼ असावे, असे अनुमान उत्खनकांनी केले आहे.

शिवमंदिर समूह : वाकाटक काळातील दुसरे विटांचे भव्य मंदिर फक्त जोत्याच्या अवशेषरूपाने हिडिंबा टेकडीच्या उत्तर-नैर्ऋत्य-पश्चिम उतारावर आढळले. या मंदिराच्या वास्तुरचनेसंदर्भात दोन टप्पे दिसून आले. टेकडीची नैसर्गिक रचना कायम राखण्याकरिता बांधलेल्या विराट भिंतीच्या साहाय्याने टेकडीच्या माथ्यावर सपाट चौथरा करून त्यावर हे मंदिर उभारले गेले. या मंदिराच्या पहिल्या टप्प्यात मुख्य मंदिराच्या भोवती जोत्यावर लहान लहान २ मी. उंचीची प्रतिमागृहे (shrines) व त्यात देवकोष्ठे (niches) होती. ही अष्टकोनी पन्हाळीसदृश वास्तुरचना असलेली प्रतिमागृहे कौशल्यपूर्ण नियोजनातून तीन स्तरांवर निर्माण केली गेली व तेथे जाण्याकरिता पायऱ्या केल्या गेल्या. या मंदिरसमूहाची प्रतिमागृहे ऊर्ध्वरेषेत संकल्पित केली गेली. ही प्रतिमागृहे कमळाच्या कळीचा आकारात व भौमितिक त्रिकोणांचा कल्पकतेने वापर करून प्रतिमागृहांच्या शिखराचे प्रयोजन केलेले आढळते. उत्तरेकडील काही प्रतिमागृहांतून काही प्रतिमांचे भग्नावशेष मिळाले, तर पश्चिम आणि दक्षिणेकडील सोळा प्रतिमागृहांपैकी सहांमध्ये वैविध्यपूर्ण शिवलिंगे आढळून आली. पुरातत्त्वज्ञ अरविंद जामखेडकर यांच्या मते, वाकाटक काळातील ही मंदिरे पाशुपत संप्रदायाशी निगडित असावीत.

गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील भैरव टेकडीवर १९७९-८२ दरम्यान उत्खनन केले गेले. यात भव्य वेदिबंध असलेल्या जगतीमध्ये (२७×४२ मी.) पूर्वाभिमुख मंदिरात पूर्वेकडे पायऱ्यांची रचना केली होती. पीठाचा पश्चिम भाग व्यापणाऱ्या गर्भगृहाच्या (५ चौमी.) आतबाहेर जाणाऱ्या बाह्यरेषेचे काही भाग पीठाच्या थरांवरही दिसून येतात. टेकाडाच्या पृष्ठभागावर आढळलेले शिवलिंग याच मंदिरातील असल्याचे मानले जाते.

येथील मंदिररचनेमध्ये भूतप्रणाल असलेल्या गर्भगृहाव्यतिरिक्त अंतराळ व मंडपाचे अवशेष सापडले. मंडपात जाण्याकरिता पायऱ्या व त्यांच्या दोन्ही बाजूंना छोटेखानी देवळे होती. वैशिष्ट्यपूर्ण जगतीवरील वेदिबंधात खूर थराच्या वर कुंभ थर असून त्याच्यावर साध्या चौरस अर्धस्तांभानी बनलेले देवकोष्ठ आहेत. मध्यप्रदेशातील भूमरा येथील शिवमंदिराशी साधर्म्य असलेले हे मंदिर इ. स. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले असावे.

वाशिम येथे १९९१-९२ आणि १९९४-९५ या काळात झालेल्या उत्खननांत दोन मंदिरांचे अवशेष उजेडात आले. यांतील पहिल्या उत्खननात फुकटपर भागात तारांकित तलविन्यास असलेले मंदिराचे १४×१२ मी. अंडाकृती आकाराचे बांधकाम निदर्शनास आले. इंग्रजीतील ‘एलʼ आकाराच्या विटांचा कौशल्यपूर्ण वापर करून मंदिराच्या पदविन्यासाचा तारांकित आकार प्राप्त केलेला आढळतो. एकूणच वास्तूच्या मधोमध अष्टकोनाकृत चौरस संरचना होती; त्यात शिवलिंग असण्याची शक्यता वर्तविली आहे. तारांकित तलविन्यास प्रकारच्या मंदिरविकासाची प्राथमिक अवस्था हे मंदिर सूचित करते.

वाशिममधील लाल देऊळ भागात झालेल्या उत्खननात (१९९४-९५) मंदिराच्या ७० मी. पूर्व-पश्चिम प्राकारालगत चार वास्तुशेष आढळले. त्यांतील एक अंडाकृती असून त्याचा तलविन्यास तारांकित असला, तरी तो बहुकोनविरहित आहे. येथील मंदिररचनेमध्ये अष्टकोनी गर्भगृह आणि आयताकार मुखमंडपाचे पुरावशेष निदर्शनास आले.

संदर्भ :

  • Jamkhedkar, A. P. Ed., Doshi, S. ‘Ancient Structuresʼ, Marg, Vol. 37, Bombay, 1983.
  • Sharma, A. K. & Joshi, Jagatpati, Excavations at Mansar, Delhi, 2015.
  • Singh, H. N. & Trivedi, Preety A. Eds., Mandhal Excavations (1975-77), Nagpur, 2019.
  • जामखेडकर, अ. प्र. ‘स्थापत्य व कला – प्रारंभिक ऐतिहासिक काळ ते यादव काळʼ, महाराष्ट्र : इतिहास – प्राचीन काळ (खंड : १, भाग : २), महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                                                               समीक्षक – श्रीकांत गणवीर

 

प्रतिक्रिया व्यक्त करा