दुसर्या महायुद्धकाळात जपानने अमेरिकेतील हवाई राज्याच्या ओआहू बेटावरील नाविक तळावर दि. ७ डिसेंबर १९४१ रोजी अनपेक्षितपणे केलेला हवाई हल्ला.
पार्श्वभूमी : जर्मनी, इटली आणि जपान या तीन अक्ष (Axis) राष्ट्रांमध्ये २७ सप्टेंबर १९४० रोजी तिरंगी करार झाला. त्याआधी मे १९४० मध्ये अमेरिकेच्या नौदलाचा बलाढ्य पॅसिफिक ताफा प्रशांत महासागरातील हवाई बेटांवरील पर्ल हार्बर या नाविक तळावर हलविण्यात आला होता. अक्ष राष्ट्रांमध्ये जपान सामील होण्याच्या अनेक कारणांपैकी हेसुद्धा एक कारण होते. त्याशिवाय जपानने चीनमध्ये घुसविलेल्या फौजा मागे घेण्यासाठी अमेरिका राजनैतिक आणि आर्थिक दबाव आणत होती. याचाच एक भाग म्हणून जून १९४१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी जपानवर तेल निर्बंध लादण्याची आणि जपानची अमेरिकेमधील सर्व संपत्ती गोठविण्याची घोषणा केली. तेलाअभावी जपानची प्रचंड कोंडी होऊ लागली. २९ नोव्हेंबर १९४१ पर्यंत हे निर्बंध हटविण्याचा निर्वाणीचा इशारा जपानने अमेरिकेला दिला होता.
जपान आणि अमेरिका यांमध्ये चाललेल्या वाटाघाटी हा केवळ दिखावा होता. जपानच्या संयुक्त नौदलाचे प्रभुत्व ॲडमिरल एसोरोकू यामामोतो यांनी आखलेल्या पर्ल हार्बरवरील घणाघाती हल्ल्याच्या योजनेला सम्राट हिरोहितो यांची संमती मिळाली होती. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच जपानी नौदलाच्या लढाऊ जहाजांच्या ताफ्याने अतीव गोपनीयता राखून जपानी समुद्रकिनारा सोडला होता. या कारवाईबाबत अमेरिकेला काही संकेत मिळाले होते. परंतु जपानच्या निर्वाणीच्या खलित्याला किती महत्त्व द्यावयाचे याबद्दल अमेरिकन शासनातही मतभेद होते. शेवटचा खलिता जपानी हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच पोहोचला होता; पण रविवार असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होऊन सर्व कारभार थंडपणे चालला होता.
पर्ल हार्बरवरील नाविक तळ : उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडील उत्तर प्रशांत महासागरात (नॉर्थ पॅसिफिक ओशन) वसलेल्या हवाई बेटांचे सामरिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यावर पर्ल हार्बर हा अमेरिकेचा नाविक तळ उभारण्यात आला होता. ॲडमिरल हझबंड किमेल यांच्या नेतृत्वाखाली या तळावर अमेरिकी नौदलाच्या आठ युद्धनौका, आठ क्रूझर, ३० विनाशिका, चार पाणबुड्या, ४१ इतर युद्धनौका व ३९० विमानांचा पॅसिफिक ताफा तैनात होता.
जपानी काफिल्याची आगेकूच : पर्ल हार्बरवरील चढाईसाठी जपानी नौदलाच्या सहा विमानवाहू जहाजे, दोन युद्धनौका, तीन क्रूझर, नऊ विनाशिका, आठ जहाजे, २३ पाणबुड्या, पाच मिजेट पाणबुड्या (दोन नाविक सैनिकांची छोटी पाणबुडी) आणि ४१४ विमानांचा एक काफिला सुसज्ज करण्यात आला होता. ॲडमिरल एसोरोकू यामामोतो यांनी या कारवाईची योजना अत्यंत चाणाक्षपणे आखली होती. कारवाईचे नेतृत्व जपानी नौदलातील एक सर्वोत्तम कर्तबगार अधिकारी व्हाइस ॲडमिरल चुइची नागुमो यांच्यावर सोपविण्यात आले होते. या लढाऊ संचाचे प्रशिक्षण, पर्ल हार्बरशी साम्य असलेल्या जपानमधील कागोशिमा बेटाच्या परिसरात यामामोतो यांनी मोठ्या परिश्रमाने करून घेतले होते. ड्राइव्ह बॉम्बिंग, पाणतीर (Torpedo) फेक आणि इतर अनेक कवायतींचा सराव कसून करण्यात आला होता. नोव्हेंबर १९४१ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रयाण करून हा काफिला जपानजवळील कूरील बेटांवरील टंकन उपसागरात पोहोचला. २६ नोव्हेंबरला या बलाढ्य संचाने कूरील बेटांचा किनारा सोडला आणि पर्ल हार्बरकडे मोर्चा वळविला. हवेच्या अंदाजानुसार वातावरण काही ठिकाणी प्रतिकूल असणार होते. पर्ल हार्बरवर उत्तरेच्या बाजूने आगमन केले, तर शत्रूला त्याची चाहूल लागण्याची शक्यता तुलनेने कमी होती. काफिल्यामध्ये सहा महाकाय विमानवाहू जहाजे होती : अकागी, कागा, सोर्यू, हिर्यू, शोकाकू आणि झूईकाकू. ती सर्व कोणतीही पूर्वसूचना न देता ५/६ डिसेंबरला पर्ल हार्बरच्या सान्निध्यात पोहोचली.
ॲडमिरल नागुमो यांनी हल्ला तीन टप्प्यांत करण्याचे योजले होते. एकूण ४०८ विमाने वापरण्यात येणार होती. त्यातली ३६० विमाने पहिल्या दोन लाटांमध्ये हल्ले चढविणार होती आणि ४८ विमाने शत्रूच्या विमानांना प्रतिबंध करण्यासाठी संरक्षणात्मक घिरट्या घालत राहणार होती. पहिली लाट प्रामुख्याने सर्व उद्दिष्टे साधणार होती. दुसरी लाट केवळ राहिलेले काम संपविणार होती. त्यामुळे युद्धनौका आणि विमानवाहू जहाजे यांवर सर्वप्रथम हवाई पाणतीरांनी (टाइप ९१) प्रखर हल्ला चढविला जाणार होता. ड्राइव्ह बॉम्बर्सनी जमिनीवरील शत्रूच्या तळाचा आणि विमानतळावर उभ्या असलेल्या विमानांचा वेध घ्यायचा होता.
पर्ल हार्बरवर हल्ला : ७ डिसेंबर १९४१ रोजी पहाटे जपानी विमानवाहू युद्धनौकांचा संच पर्ल हार्बरपासून २७५ मैल (४४० किमी.) उत्तरेस पोहोचला. बरोबर सहा वाजता ५१ ‘ऐची व्हाल’ बॉम्बफेकी विमाने, ४३ मित्सुबिशी झीरो-सेन्स झेक लढाऊ विमाने, ४० नाकाजिमा बी, ५ एन टू ‘केट’ विमाने आणि ५० हायलेव्हल ‘केट’ विमाने एकाचवेळी सहा महाकाय जपानी विमानवाहू युद्धनौकांच्या डेकवरून एकामागून एक आकाशात उडाली. त्यांच्यानंतर काही वेळाने ८० व्हाल, ५४ केट आणि ३६ झीरो विमानांनी अंतराळात भरारी मारली. पर्ल हार्बरमधील अमेरिकी युद्धनौकांच्या प्रत्येक चार तोफांपैकी फक्त एका तोफेमागेच तोफची होता. बाकी तीन तोफांवर आच्छादन होते. मुख्य तोफा तर बंदच होत्या. मशीनगनचा दारूगोळा पेट्यांमध्ये बंद होता आणि कुलपांच्या किल्ल्या अधिकाऱ्यांजवळ होत्या. त्यातील काही अधिकारी तर जहाजांवर हजरच नव्हते.
पहाऱ्यावरील एका नौसैनिकाला साडेसात वाजता दुरून वीस ते पंचवीस विमाने येताना दिसली. ती आपलीच असावीत, असे त्याला वाटले. पण, आठ वाजता युद्धनौकेवर जेव्हा दणादण बॉम्ब आदळू लागले, तेव्हा कोणालाच संदेह राहिला नाही. पहिला हल्ला ३२,६०० टन वजनाच्या अजस्र यूएसएस ‘ॲरिझोना’ जहाजावर झाला आणि त्याची दोन शकले झाली. त्यामधील १,००० पेक्षाही अधिक नौसैनिक दगावले. त्यानंतर ‘ओक्लाहोमा’ जहाजावर हल्ला झाला. ते बुडल्यानंतर फक्त ३२ सैनिकांनाच नंतर बाहेर काढण्यात आले. केवळ चार पाणतीर आणि एका बॉम्बनी ३१,८०० टनाच्या ‘वेस्ट व्हर्जिनिया’ या युद्धनौकेला जलसमाधी दिली. ३२,६०० टन वजनाची ‘कॅलिफोर्निया’ युद्धनौका तीन दिवस जळत होती आणि नंतर ती बुडाली. यूएसएस ‘नेव्हाडा’ जहाजाने बंदरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु जपानी बॉम्बर्सनी तो निष्फळ ठरविला. ‘मेरीलँड’ आणि ‘टेनेसी’ या युद्धनौका मात्र निसटल्या. अमेरिकेच्या ताफ्याचे निशाणाचे जहाज ‘पेनसिल्व्हेनिया’ दुरुस्तीसाठी सुक्या गोदीमध्ये दाखल झाले होते, ते मात्र बचावले. हेलेना होलोलव्ह आणि रॅली, माइनलेअर ओग्लाला इ. जहाजे आणि शॉ, कॅसिन, डाउन्स इ. विनाशिका समुद्रतळाला गेल्या किंवा जायबंदी झाल्या.
ज्या वेळी पॅसिफिक ताफा विदीर्ण होत होता, त्या वेळी बंदरातील विमानतळावरील विराजमान विमानांचाही जपानी बॉम्बफेकी विमाने चुराडा करत होती. हल्ला व्हायच्या आधी मरीन कोअरच्या इव्हा फिल्ड या विमानतळावर ४९ विमाने उभी होती. त्यातील फक्त १६ बचावली. अमेरिकी नौसेनेच्या १४८ विमानांपैकी ११२ चक्काचूर झाली, तर लष्कराच्या १२९ विमानांपैकी ५२ बरबाद झाली.
आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ३६ झेक, ५४ टार्पेंडो ‘केट’ आणि ८० हायलेव्हल ‘केट’ यांच्या दुसऱ्या लाटेने आकाशात झेप घेतली. तोपर्यंत अमेरिकी सैनिकांना जाग आली होती. तोफखान्याच्या शोअर बॅटरींनी आता मात्र जोरदार मारा केला. जपान्यांची पहिल्या लाटेत फक्त नऊ विमाने जायबंदी झाली होती. या दुसऱ्या लाटेतील वीस विमानांना खाली पाडण्यात आले. पर्ल हार्बरचा पाणबुड्यांचा तळ आणि इंधनसाठा सुदैवाने बचावला. तेथील तेलाचे भांडार जपानमधील संपूर्ण तेलाच्या साठ्याइतके अजस्त्र होते. अमेरिकेचे २,०४३ सैनिक, १६४ विमाने, सहा युद्धनौका, तीन विनाशिका कामी आले होते. यासाठी जपान्यांनी मोजलेली किंमत – फक्त २९ विमाने आणि १०० सैनिकांचे प्राण! सुदैवाने अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांचा ‘कॅरिअर फोर्स’ त्या वेळी पर्ल हार्बरमध्ये नसल्यामुळे तो बचावला.
उपसंहार : पर्ल हार्बर हे जपानच्या नाविक युद्धेतिहासात सोनेरी अक्षरांत कोरलेले प्रकरण आहे. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाकडे तटस्थपणे दुरून पाहणाऱ्या अमेरिकेचा एकलकोंडेपणा क्षणात भंगला. त्याने जपान आणि नंतर इतर अक्ष राष्ट्रांशी युद्धाची घोषणा केली.
https://www.youtube.com/watch?v=uZLVUiG1nUY
संदर्भ :
- Nelson, Craig, Pearl Harbor : From Infamy to Greatness, New York City, 2016.
- Prange, Gordon W. At Dawn We Slept : The Untold Story of Pearl Harbor, New York City, 1981.
समीक्षक – प्रमोदन मराठे