व्हेराझानो, जोव्हानी दा (Verrazano, Giovanni da) : (१४८५ – १५२८). इटालियन मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. त्यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्सजवळील व्हाल दी ग्रेव्ह येथील एका व्यापारी कुटुंबात झाला. फ्लॉरेन्स येथे उच्च दर्जाचे शिक्षण घेतल्यानंतर इ. स. १५०६ नंतर फ्रान्समधील दीएप येथे जाऊन ते स्थायिक झाले. तेथेच फ्रान्सच्या सागरी सेवेत एक मार्गनिर्देशक म्हणून रूजू झाले आणि फ्रान्ससाठीच समन्वेषणाचे काम केले. स्पेन हा देश फ्रान्सचा स्पर्धक होता. स्पॅनिश समन्वेषक कोर्तेझ यांनी मेक्सिकोहून पाठविलेली मौल्यवान वस्तूंनी भरलेली स्पॅनिशांची दोन जहाजे व्हेराझानो यांनी १५२२ मध्ये हस्तगत केली. त्यामुळे फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला त्यांच्यावर खूष झाला. अमेरिकेच्या किनाऱ्याचे समन्वेषण करून तेथे आपल्या वसाहती स्थापन करण्याच्या दृष्टीने योग्य त्या जागांचा शोध घेण्यासाठी, तसेच पॅसिफिककडे जाण्याचा वायव्य पॅसेज मार्ग शोधण्यासाठी राजा फ्रान्सिस पहिला यांनी व्हेराझानो यांची नेमणूक केली.

अमेरिकेकडील सफरीसाठी चार जहाजे तयार करण्यात आली; परंतु जोराचे वादळ आणि खवळलेला समुद्र यांमुळे प्रथम दोन जहाजे त्यानंतर एक जहाज निकामी झाले. त्यामुळे व्हेराझानो यांचे ‘ला दोफीने’  हे एकच जहाज १७ जानेवारी १५२४ रोजी उत्तर अमेरिका खंडाकडे निघाले. मार्चच्या सुरुवातीस उत्तर अमेरिकेच्या अटलांटिक किनाऱ्यावरील सांप्रत नॉर्थ कॅरोलायना राज्याच्या आग्नेय भागात असलेल्या केप फिअर या भूशिराजवळ ते पोहाचले. त्यानंतर त्यांनी उत्तरेस केप ब्रेटनपर्यंत उत्तर अमेरिका खंडाच्या किनारी प्रदेशाचे समन्वेषण केले. या प्रवासात त्यांनी अनेक ठिकाणांचा आणि उपसागरांचा शोध लावला. उदा., चेसापीक उपसागर, डेलावेअर उपसागर, न्यूयॉर्क उपसागर, सांप्रत न्यूयॉर्क बंदर, ब्लॉक आयलंड बेट, नॅरागँसिट उपसागर, केप कॉड द्वीपकल्प इत्यादी. चेसापीक उपसागर पाहिला त्या वेळी व्हेराझानो यांचा असा समज झाला की, या उपसागरामार्गे उत्तर अमेरिका खंडातून चीनकडे जाता येईल;

व्हेराझानो – नॅरोज ब्रिज

परंतु ते चुकीचे होते. त्यांनी तो उपसागर पार करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यांच्या या चुकीच्या अंदाजाचा पुढे अनेक वर्षे उत्तर अमेरिकेचा नकाशा तयार करणाऱ्या मानचित्रकारांवर झाला; कारण त्यांनी व्हेराझानोचा अंदाज खरा समजून त्यांच्याकडून त्याप्रमाणे चुकीचे नकाशे तयार केले गेले. उत्तर अमेरिकेतील नव्याने शोधलेल्या स्थळांना त्यांनी जुन्या जगातील व्यक्ती आणि स्थळांची नावे दिली. ८ जुलै १५२४ रोजी ते फ्रान्सला परतले. या सफरीचा राजाला दिलेल्या वृत्तांतामुळे राजांनी त्यांना ब्राझीलच्या सफरीचे नेतृत्व दिले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या आणखी दोन सफरी केल्या.

व्हेराझानो यांनी इसवी सन १५२७ मध्ये ब्राझीलकडे गेलेल्या सफरीतील जहाजांच्या ताफ्याचे नेतृत्व केले. या सफरीवरून परत येताना त्यांनी रंगद्रव्य उत्पादन होऊ शकणारी लाकडे फ्रान्सला आणली. अटलांटिक महासागर पार करून जाण्याचा त्यांचा अखेरचा प्रवास १५२८ मधील वंसत ऋतूत सुरू झाला. या सफरीत त्यांच्या बरोबर त्यांचा भाऊ जेरॉलामो दोन किंवा तीन जहाजांसह सामील झाला होता. त्यांचा ताफा फ्लॉरिडा, बहामा आणि त्यानंतर लेसर अँटिलीसपर्यंत गेला. तेथील एका बेटाजवळ बहुधा ग्वादलूपजवळ जहाजे नांगरून ते किनाऱ्याकडे गेले. तेव्हा स्थानिक नरमांसभक्षकांनी व्हेराझानो यांना ठार मारून त्यांचे मांस खाल्ले असावे अशी शक्यता वर्तविली जाते; परंतु त्यांच्या मृत्युची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. व्हेराझानो यांच्या शोधाच्या आधारावर त्यांचा भाऊ जेरॉलामो यांनी १५२९ मध्ये उत्तर अमेरिकेचे नकाशे तयार केले. त्यांतून उत्तर अमेरिकेविषयीच्या नवीन कल्पना स्पष्ट झाल्या. १९६४ मध्ये न्यूयॉर्क उपसागर पार करणारा एक पूल बांधण्यात आला असून त्या पुलाला व्हेराझानो यांच्या नावावरून ‘व्हेराझानो – नॅरोज ब्रिज’ असे नाव देण्यात आले आहे.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम