हमिल्को : (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक). कार्थेजिनीयन मार्गनिर्देशक व समन्वेषक. भूमध्य समुद्रापासून यूरोपच्या वायव्य किनाऱ्यापर्यंत जाणारे हमिल्को हे पहिले समन्वेषक असल्याचे मानले जाते. आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील कार्थेज येथून गलबताने निघून जिब्राल्टर सामुद्रधुनी (Strait of Gibraltar) पार करून स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स व इंग्लंडपर्यंत अटलांटिकच्या किनाऱ्याने ते गेल्याचे मानले जाते. तसेच पुढे ते उत्तरेकडे आयर्लंडपर्यंत गेले असावे, अशीही शक्यता वर्तविली जाते. त्यांनी सारगॅसो समुद्रापर्यंत प्रवास केला असावा. कथील आणि इतर मौल्यवान धातूंच्या व्यापारासाठी ते पोर्तुगालमधील ओएस्ट्रीमिनिस जमातींच्या प्रदेशात गेले होते.

हमिल्को यांच्या सफरीविषयीच्या गहाळ वृत्तान्ताचा उल्लेख रोमन लेखकांच्या साहित्यांमध्ये आलेला आहे. रोमन विद्वान थोरला प्लिनी यांच्या नॅचरल हिस्टरी या पुस्तकात हमिल्को यांच्या प्रवासाविषयीचा जो अल्प उल्लेख आला आहे, तो सर्वांत जुना संदर्भ आहे. रोमन कवी रूफस फेस्टस एव्हीईनस यांच्या मते, अटलांटिकमध्ये जाणारे हमिल्को हे पहिले प्रवासी नसून दक्षिण आयबेरियातील तार्तेशीअन लोकांनी वापरलेल्या सागरी मार्गानेच हमिल्को गेले होते. हमिल्को यांनी जे प्रवासवर्णन लिहिले, त्यात त्यांनी प्रवासमार्गावरील भयानक सागरी प्राणी, समुद्रवेली इत्यादींविषयक काही माहिती जाणीवपूर्वक खोटी व भीतिदायक दिली आहे, जेणेकरून इतरांनी, विशेषत: ग्रीक स्पर्धकांनी, त्या प्रवासमार्गाचा वापर करू नये.

समीक्षक संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा