हर्न, सॅम्युएल (Hearne, Samuel) : (१७४५ – नोव्हेंबर १७९२). ब्रिटिश खलाशी, फरचा व्यापारी आणि समन्वेषक. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. थोडेबहुत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ‘ब्रिटिश रॉयल नेव्ही’मध्ये कॅप्टन सॅम्युएल हुड यांचा नोकर (शिपमन) म्हणून ते रुजू झाले. १७५६ ते १७६३ या काळात झालेल्या सप्तवर्षीय युद्धात (सेव्हन यिअर्स वॉर) ले हाव्र (फ्रान्स) वरील बाँबहल्ल्यासह अनेक युद्धजन्य गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या. १७६३ मध्ये त्यांनी नेव्ही सोडली. त्यानंतर १७६६ मध्ये ‘हडसन्स बे कंपनी’ या मूळ ब्रिटिश फर कंपनीच्या (एचबीसी) सेवेत रुजू झाले. तेथे त्यांनी नाखव्याच्या हाताखालचा अंमलदार म्हणून काम केले. फोर्ट प्रिन्स ऑफ वेल्स (मॅनिटोबा) येथून निघणाऱ्या अनेक बोटींवर त्यांनी दोन वर्षे काम केले. हडसन उपसागराच्या किनाऱ्याची त्यांनी बरीच पाहणी केली. त्यानंतर १७६९ मध्ये त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कॅनडातील चर्चिल नदीच्या मुखाजवळील फोर्ट प्रिन्स ऑफ वेल्स येथे आणण्यात आले. फोर्ट प्रिन्स ऑफ वेल्स आणि आर्क्टिक महासागर यांदरम्यान पसरलेल्या विस्तृत ओसाड प्रदेशात तांबे आणि इतरही विपुल संपत्ती असल्याची वदंता होती. रहस्यमय टंड्रा प्रदेशाकडून पूर्व आशियाकडे जाण्याचा मार्गही मिळू शकेल, अशी एक शक्यता वर्तविली जात होती.

फोर्ट प्रिन्स ऑफ वेल्सचा गव्हर्नर मोझस नॉर्टन यांनी हर्न यांना दोन वेळा आर्क्टिक प्रदेशाच्या सफरीवर पाठविले; परंतु त्या दोन्ही अपयशी ठरल्या. पहिली सफर ६ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर १७६९, तर दुसरी सफर फेब्रुवारी ते २५ नोव्हेंबर १७७० या कालावधीत झाली. ढिसाळ नियोजन, भौगोलिक ज्ञानाचा व माहीतगार वाटाड्याचा अभाव इत्यादींमुळे या दोन्ही सफरी अपयशी ठरल्या.

डिसेंबर १७७० मध्ये हर्न पुन्हा आर्क्टिक प्रदेशाच्या तिसऱ्या महत्त्वपूर्ण आणि यशस्वी सफरीसाठी निघाले. या वेळी वाटाड्या म्हणून चिपवाइअन इंडियननांचा नेता व शिकारी मॅटोनॅबी यांना त्यांच्या आठ पत्नींसह बरोबर घेतले. मार्गात वेळो वेळी काही इंडियनांनाही बरोबर घेतले. चर्चिल नदीपासून निघाल्यानंतर आर्टिलरी, एल्मर आणि काँटवॉयटो सरोवरांमार्गे ते आर्क्टिक महासागर किनाऱ्यावरील कॉपरमाइन नदीच्या मुखाजवळ १५ जुलै १७७१ रोजी पोहोचले. त्यानंतर ते ३० जून १७७२ रोजी उत्तर कॅनडातील ग्रेट स्लेव्ह सरोवरामार्गे फोर्ट प्रिन्स ऑफ वेल्स येथे परतले. या सफरीत त्यांनी विस्तृत प्रदेशाचे समन्वेषण केले. हडसन उपसागरापासून आर्क्टिक महासागरापर्यंत जमिनीवरून पायी प्रवास करणारे हे पहिलेच यूरोपीय होय. त्यांनीच पहिल्यांदा आर्क्टिक किनाऱ्याचे स्वरूप दाखवून दिले. खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने मात्र या सफरीतून काही विशेष साध्य होऊ शकले नाही. नॉर्थवेस्ट पॅसेजची शक्यताही त्यांनी नाकारली होती.

कंपनीचे पश्चिमेकडील पहिले व्यापारी ठाणे स्थापन करण्याची जबाबदारी १७७३ मध्ये हर्न यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार १७७४ मध्ये त्यांनी हडसन्स बे कंपनीचे सस्कॅचेवन नदीकाठावर ‘कंबर्लंड हाऊस’ हे पहिले अंतर्गत व्यापारी ठाणे वसविले. सांप्रत सस्कॅचेवनमधील हीच पहिली कायमस्वरूपी वस्ती होय.

फोर्ट प्रिन्स ऑफ वेल्स कंपनीचा गव्हर्नर म्हणून हर्न १७७५ ते १७८२ या काळात कार्यरत असताना फ्रेंच मार्गनिर्देशक झां फ्रान्स्वाझ दे गॅलोप (काँत दे ला पॅरूझ) यांच्या नेतृत्वाखालील लष्कराने त्यांचे ठाणे लुटून त्यांचा विध्वंस केला. तसेच हर्न व त्यांच्याबरोबरील ३८ सहकारी यांना ६ ऑगस्ट १७८२ रोजी तुरुंगात डांबले. त्या वेळी हर्न यांना फ्रान्सला पाठविले; परंतु फ्रेंच नौदलाने त्यांना सन्मानाची वागणूक दिली. गॅलोप हे स्वत:च एक समन्वेषक असल्यामुळे हर्न यांनी केलेल्या कल्पनातीत धाडशी प्रवासाच्या नोंदी केवळ स्वत:जवळ राखून न ठेवता त्यांनी त्या प्रसिद्ध कराव्यात असा गॅलोप यांनी सल्ला दिला. फ्रेंचांनी १७८३ मध्ये हर्न यांची तुरुंगातून सुटका केल्यानंतर हर्न कॅनडाला परतले. हडसन उपसागर किनाऱ्यावरील चर्चिल येथे १७८३ मध्ये त्यांनी आपल्या ठाण्याची पुन:स्थापना केली. तदनंतर १७८७ मध्ये ते इंग्लंडला परतले. इंग्लंडला आल्यानंतर त्यांनी ए जर्नी फ्रॉम प्रिन्स ऑफ वेल्स फोर्ट, इन हडसन्स बे, टू द नॉर्दर्न ओशन -इन द यिअर्स १७६९, १७७०, १७७१ ॲण्ड १७७२ हे पुस्तक लिहिले. त्याचे प्रकाशन त्यांच्या पश्चात १७९५ मध्ये झाले. त्यांचे कॉपरमाइन जर्नी हे पुस्तक १९५८ मध्ये प्रसिद्ध झाले होते.

हर्न यांचे इंग्लंड येथे निधन झाले.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम