पार्श्वभूमी : काश्मीर हे पाकिस्तानात विलीन व्हावे ही सुप्त इच्छा १९४७-४८च्या युद्धानंतरसुद्धा पाकिस्तानने जोपासली होती आणि काश्मीर पादाक्रांत करण्याची संधीच पाकिस्तानचे नेते शोधीत होते. १९६५च्या लढाईला खालील गोष्टी कारणीभूत ठरल्या.
- १९५४ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला रशियाविरुद्ध लढण्यासाठी दोनशे एम‒४५ पॅटन (Patton) रणगाडे, एम‒१०४ सुपरसॉनिक लढाऊ विमानांची एक स्कॉड्रन, एफ‒८६ विमानांच्या चार स्कॉड्रन आणि बी‒७५ बॉम्बरची एक स्कॉड्रन इतकी आधुनिक शस्त्रसामग्री दिली. याचा उपयोग पाकिस्तान भारताविरुद्ध करेल यात कोणालाही संदेह नव्हता. पाकिस्तानला याच कालादरम्यान सीटो आणि सेंटो या दोन लष्करी करारांचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले होते. यामुळे भारत पाकिस्तानमधील शस्त्रसमतोल पाकिस्तानच्या बाजूला कलण्यास मदत झाली.
- पाकिस्तानात १९५८ मध्ये लष्करी क्रांती घडवून लष्करप्रमुख अयुबखानाने सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. १९६२ मध्ये चीनबरोबरील युद्धात भारतीय सैन्याचा निर्णायक पराभव झाला. १९६३ मध्ये पाकव्याप्त प्रदेशातील शासगम खोऱ्याचा भाग चीनला देऊन त्याची मर्जी पाकिस्तानने संपादिली होती.
- जवाहरलाल नेहरू यांच्या निधनापश्चात लालबहादूर शास्त्री यांची भारताच्या प्रधानमंत्रीपदावर नेमणूक झाली होती. शेख अब्दुल्लाची तुरुंगात रवानगी, हजरतबल घटना आणि वारंवार मुख्यमंत्र्यांमध्ये बदल वगैरे कारणांमुळे भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. १९६२च्या पराभवानंतर भारतीय सेनेचे मनोबल खचले असेल आणि भारताचे नेतृत्व कणखर नसेल, असा आडाखा बांधला गेला होता. त्यामुळे आठ वर्षांच्या कारकिर्दीनंतर सैल होत चाललेली देशावरील आपली पकड पुनश्च मजबूत करण्यासाठी ही वेळ प्रसंगोचित वाटल्याने काश्मीरवर हल्ला करण्याचा अयुबखानाने निर्णय घेतला.
योजना : अयुबखानाच्या योजनेचे दोन टप्पे होते. पहिल्या टप्प्यात मे १९६५ मध्ये अर्ध्या कच्छवर हक्काचा दावा लावून हल्ला करायचा आणि त्यायोगे भारताचा प्रतिसाद अजमावयाचा, त्याचबरोबर अमेरिकी शस्त्रास्त्रांची चाचणी घ्यायचा त्याचा मनोदय होता. दुसऱ्या टप्प्यात ऑगस्टनंतर १९४७च्या धर्तीवर घुसखोरीकरवी काश्मीरवर कब्जा करण्याचा त्यांचा निर्धार होता.
लढाई :
पहिला टप्पा : कच्छ व कारगिलमधील कारवाई : मार्च १९६५ नंतर कच्छ सीमेवरील पाकिस्तानी रेंजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्याबरोबर ‘बलुचिस्तानचा कसाई’ म्हणून ओळखला जाणारा जनरल टिक्काखान याच्या नेतृत्वाखाली एक डिव्हिजन सीमेवर पोहचली. प्रथम भारतीय सीमा दलाची सरदार पोस्ट चौकी आणि त्यानंतर २४ एप्रिल १९६५ रोजी विगोकोट व बिअरबेट चौक्यांवर पाकिस्तानी सेनेने हल्ले चढवले. जनरल डन्न यांच्या हाताखाली भारतीय लष्कराची एक डिव्हिजन सीमाभागात हलवण्यात आली आणि त्यांनी आपली मोर्चेबंदी सुरू केली. पाकिस्तानने घेतलेल्या चौक्यांवर हल्ले चढवून त्या परत घेण्यात आल्या, परंतु फार मोठ्या प्रमाणात लढाईला तोंड लागले नाही.
१६ मे १९६५ रोजी कारगिल क्षेत्रात पाकिस्तान सैन्याने मर्यादित हल्ले चढवले. भारतीय सैन्याच्या १२१ इन्फन्ट्री ब्रिगेडने ते थोपवलेच, पण त्याशिवाय पॉइंट १३६२५ हा पाकिस्तानचा महत्त्वाचा मोर्चा जिंकला. इतरही झटापटी झाल्या. त्यात पाकिस्तानी सैन्याची जबर जीवितहानी झाली. युद्धबंदीनंतर भारतीय सैन्याने घेतलेली दोन ठाणी परत करावी लागली.
लालबहादूर शास्त्री यांनी २८ एप्रिलला लोकसभेत आपल्या आवेशयुक्त भाषणात पाकिस्तानला इशारा दिला की, भारताच्या सार्वभौमत्वावर पाकिस्तानने कोठेही आघात केला, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी यथायोग्य रणनीतीचा अवलंब करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. थोडक्यात, काश्मीर धरून १३०० किमी.च्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कोठेही हल्ला चढवण्यास भारतीय सैन्य समर्थ असल्याची ती चेतावणी होती. हे ‘शास्त्री डॉक्टरीन’ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर मात्र पाकिस्तान नरम पडले. २९ जून १९६५ रोजी दोघांनी ब्रिटिश पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांच्या मध्यस्थीचा युद्धसमाप्तीचा तीन कलमी ठराव स्वीकारला. ती तीन कलमे अशी ‒ १ जुलैपासून युद्धबंदी, दोन्ही सेनांची १ जानेवारीच्या स्थितीपर्यंत माघार आणि आंतरराष्ट्रीय लवादाची नेमणूक.
दुसरा टप्पा : काश्मीर आणि पंजाब यांमधील लढाया : पूर्वयोजनेनुसार अयुबखानाने घुसखोरीकरवी काश्मीरवर कब्जा करण्याची कारवाई १ ऑगस्टपासून सुरू केली. मध्ययुगीन काळात भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम सेनापतींची नावे दिलेल्या आठ टोळ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने काश्मीर खोऱ्यात प्रवेश करून श्रीनगरचा ताबा घ्यायचा, हे यामागील प्रमुख उद्दिष्ट होते. यासाठी एकूण तीस हजार भाडोत्री मुजाहिद्दीन आणि पाकिस्तानी सैनिकांना गोळा करण्यात आले होते. या घुसखोरीचे ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ असे नामकरण करण्यात आले होते. घुसखोरीची बातमी लागल्यावर भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले. १२ ऑगस्टपर्यंत पाकिस्तानची ही कारवाई कोणतेही उद्दिष्ट साध्य न करता पूर्णतया फसली होती. पाकिस्तानच्या फसलेल्या घुसखोरीविरुद्ध प्रत्याघात करण्यासाठी भारतीय सैन्याच्या ६८ माउंटन ब्रिगेडने उरी-पूंच्छ रस्त्यावरील हाजीपीर खिंड जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली. २४ ऑगस्टला कारवाई प्रारंभ करून ३० ऑगस्टपर्यंत अटीतटीच्या लढाईनंतर हाजीपीरवर कब्जा करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले.
हाजीपीरवरील पराभवामुळे संतापून गेलेल्या अयुबखानाने युद्धबंदी रेषा आणि आंतरराष्ट्रीय रेषा या दोन्हींना संलग्न असलेल्या छांब-जौरीया क्षेत्रावर चढाई करून जम्मू आणि काश्मीर विभागांना जोडणाऱ्या अखनूर पुलापर्यंत धडक मारून तो पूल काबीज करण्याची आणि त्याकरवी दोन भागांमधील संपर्क तोडण्याची महत्त्वाकांक्षी कारवाई हाती घेण्याचे आदेश दिले. या कारवाईला ‘ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ असे नाव देण्यात आले होते. १ सप्टेंबरला सुरू झालेल्या या मोहिमेला प्रारंभी यश लाभले आणि छांब-जौरीया क्षेत्रातून भारतीय सैन्याच्या तुकड्यांना माघार घ्यावी लागली; परंतु ५-६ सप्टेंबरपर्यंत भारतीय लष्कराने हे आक्रमण थोपवून धरले. पाकिस्तानने युद्धबंदी रेषा ओलांडल्यावर लागलीच भारतीय वायुसेनेने युद्धक्षेत्रात प्रवेश केला आणि भारताच्या नॅट विमानांनी त्यांच्यापेक्षा सरस असलेल्या आधुनिक सेबर विमानांची अक्षरशः चाळण केली. अखनूर पुलापासून अजूनही शत्रू बराच दूर होता. त्यानंतर पाकिस्तान सैन्याच्या तुकड्यांना माघारी नेऊन इतरत्र तैनात करण्यात आले. सीमेवरील छांब मात्र पाकिस्तानी सैन्याच्या हातात राहिले.
भारताचा प्रत्याघात : पाकिस्तानच्या कारवाईला मुहतोड जवाब देण्यासाठी भारतीय लष्कराने पंजाबमध्ये तीन अक्षांवर पाकिस्तानवर चढाई करण्याचा निर्णय घेतला. पहिला, अमृतसर ते लाहोर मार्गावर इछोगिल कालवा ओलांडून लाहोरपर्यंत पोहचायचे. दुसरा, जम्मू-सियालकोट मार्गावर आगेकूच करून सियालकोट आणि लाहोरदरम्यान पाचर मारायची आणि तिसरा, राजस्थान सीमा पार करून पाकिस्तानात हल्ले चढवायचे.
अमृतसर अक्षावर बर्की आणि डोग्राई यांमध्ये घनघोर लढाया झाल्या. खेमकरणच्या लढाईत कर्नल (नंतर जनरल) अरुणकुमार वैद्य यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले. सियालकोट क्षेत्रातील लढाईत कर्नल ए. बी. तारापोर यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. असलउत्तरची लढाई दुसऱ्या महायुद्धानंतरची रणगाड्यामधील सर्वश्रेष्ठ लढाई म्हणून ती गणली जाते. त्यात हवालदार अब्दुल हमीदला परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
उपसंहार : भारत आणि पाकिस्तानने हे युद्ध वाढवू नये म्हणून राष्ट्रसंघाचे अध्यक्ष उ थांट यांनी स्वतः दोन्ही देशांना भेट दिली. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय दबाव आल्यामुळे २३ सप्टेंबर रोजी दोन्ही देशांच्या संमतीने युद्धबंदी जाहीर करण्यात आली. सोव्हिएट रशियाचे प्रमुख कोसिजिन यांच्या मध्यस्थीने १० जानेवारी १९६६ रोजी अयुबखान आणि शास्त्री यांच्यात ताश्कंद येथे करार झाला. त्यानुसार दोन्ही देशांनी आपापल्या सेना युद्धबंदी रेषेमागे घ्याव्यात यावर संगनमत झाले.
या युद्धात कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव झाला, हे सांगणे कठीण आहे. भारताने ७८० चौ.किमी. तर, पाकिस्तानने १२८ चौ.किमी. प्रदेश जिंकला होता. भारताने शत्रूचे ४७१ रणगाडे तर, पाकिस्तानने भारताचे १२८ रणगाडे निकामी केले होते. भारताने शत्रूची १२८ विमाने तर, पाकिस्तानने भारताची ३५ विमाने पडली होती. या बोलक्या आकडेवारीवरून भारताची सरशी झाली असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही. अयुबखानाने हे युद्ध चालू केले, परंतु त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात ते आणि पाकिस्तानी सैन्यदले पूर्णपणे अयशस्वी ठरले, हे मात्र निर्विवाद.
संदर्भ :
- Khan, M. Asaghar, The First Round : Indo-Pakistani War, 1979.
- Krishna Rao, K. V. Prepair or Perish, New Delhi, 1991.
- Husain, Haqqani, Pakistan : Between Mosque and Military, Washington D. C. 2005.
- पित्रे, शशिकांत, डोमेल ते कारगिल, पुणे, २०००.
समीक्षक – प्रमोदन मराठे
#असलउत्तरची लढाई