विश्वातील सर्व वस्तूंचे योग्याला होणारे ज्ञान म्हणजे प्रातिभ ज्ञान होय. हे प्रातिभ ज्ञान योग्याला विवेकख्यातीच्या अनुषंगाने विनासायास होते, त्यासाठी कोणतेही प्रयत्न लागत नाहीत. पुरुष आणि प्रकृती (त्रिगुण) यांमधील भेदाचे ज्ञान म्हणजे विवेकख्याती होय.जीवाला अविद्येमुळे पुरुष हा बुद्धी, इंद्रिय, शरीर इत्यादी पदार्थांशी एकरूप आहे असे वाटते, परंतु चित्ताची शुद्धी झाल्यावर समाधी स्थितीमध्ये पुरुष हा इतर सर्व त्रिगुणात्मक तत्त्वांपेक्षा वेगळा आहे, असे भेदाचे ज्ञान होते. पुरुष आणि त्रिगुणांचे यथार्थ ज्ञान झाल्यावर विश्वातील सर्व पदार्थांचे ज्ञान आपोआप होते; कारण सर्वच पदार्थ हे त्रिगुणांनी बनलेले आहेत. त्यामुळे विवेकख्यातीनंतर योग्याला सर्व पदार्थांचे ज्ञान प्राप्त होते.

प्रातिभ शब्दाचा अर्थ आहे – ‘प्रतिभेद्वारे उत्पन्न होणारे’. हे ज्ञान कोणत्याही अन्य व्यक्तीच्या उपदेशामुळे प्राप्त होणारे नसून योग्याच्या चित्तामध्ये प्रतिभेने उत्पन्न होते. प्रातिभ ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करताना व्यासभाष्यामध्ये पाच प्रकारच्या पदार्थांचे ज्ञान सांगितलेले आहे (प्रातिभात् सूक्ष्मव्यवहितविप्रकृष्टातीतानागतज्ञानम् । ३.३६).

(१) सूक्ष्म : सामान्यत: जे पदार्थ इंद्रियांद्वारे जाणता येऊ शकत नाहीत, अशा परमाणूसारख्या सूक्ष्म पदार्थांचेही ज्ञान योग्याला प्रतिभेद्वारे होते.

(२) व्यवहित : इंद्रियामध्ये आणि वस्तूमध्ये जर काही व्यवधान (अडथळा) असेल तर त्या वस्तूचे ज्ञान होत नाही. परंतु, योग्याला प्रतिभेने व्यवधानापलिकडे असणाऱ्या वस्तूचेही ज्ञान होते.

(३) विप्रकृष्ट : खूप लांब अंतरावरच्या वस्तूचे ज्ञान योग्याला प्रतिभेद्वारे होते.

(४) अतीत : भूतकाळात होऊन गेलेल्या विषयांचे ज्ञान प्रतिभेद्वारे होते.

(५) अनागत : भविष्यात होणाऱ्या विषयांचे ज्ञानही योग्याला होते.

योगसूत्रानुसार विवेकख्याती झाल्यानंतर प्रातिभ ज्ञान प्राप्त होते. मात्र, व्यासभाष्यानुसार ज्याप्रमाणे सूर्याचा उदय होण्याआधी त्याची प्रभा सर्वत्र पसरते, त्याचप्रमाणे विवेकख्यातीचे ज्ञान होण्याआधी योग्याला प्रातिभ ज्ञान प्राप्त होते.

प्रातिभ ज्ञानालाच तारक ज्ञान असेही म्हटले जाते. विवेकख्यातीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे योग्याच्या चित्तातील सर्व क्लेश नष्ट होऊन योग्याला कैवल्य प्राप्त होते व तो संसारातून मुक्त होतो. हे ज्ञान संसारातून तारून नेणारे असल्यामुळे याला तारक ज्ञान म्हणतात, असे वाचस्पती मिश्रांनी स्पष्ट केले आहे (प्रसंख्यानसंनिधापनेन संसारात्तारयतीति तारकम् ।  तत्त्ववैशारदी  ३.३३). प्रातिभ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे योगी सर्वज्ञ होतो.

पहा : विवेकख्याति.

                                                                                                                                                                                                     समीक्षक : कला आचार्य