बेल हा पानझडी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ईगल मार्मेलॉस आहे. लिंबू व संत्रे या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश, कंबोडिया, थायलंड इ. देशांत निसर्गत: वाढलेला आढळतो. भारत, श्रीलंका, जावा, फिलिपीन्स व फिजी या देशांत बेलाची लागवड करतात. ईगल प्रजातीत बेलाची ईगल मार्मेलॉस ही एकमेव जाती आहे. भारतात तो रुक्ष ठिकाणी, जेथे अन्य वृक्ष वाढत नाहीत अशा जागी, कमी पावसाच्या प्रदेशात वाढलेला दिसतो.

बेल वृक्ष ८–१४ मी. उंच वाढत असून त्यावर काटे असतात. खोडाचा घेर १–१·५ मी. असून राखाडी रंगाचा असतो. साल मऊ असून तिचे खवले निघतात. पाने संयुक्त, हिरवी, त्रिपर्णी व एकाआड एक असून पानांच्या बगलेत सरळ व मोठे काटे असतात. पानांवर तेलाचे ठिपके दिसतात. मार्च–एप्रिल महिन्यांत पाने गळून पडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा पालवी येते. फुले लहान, हिरवट-पांढरी व सुगंधी असून ती गुच्छात येतात. मृदुफळ जाड सालीचे, गोलसर, पिवळे व कठीण असून पावसाळ्यात येते. फळ पिकायला साधारणपणे ११ महिने लागतात. त्यात घट्ट, गोड, सुवासिक, नारिंगी व श्लेष्मल गर असतो. गरामध्ये लोकरीसारखी लव असलेल्या चपट्या बिया असतात. फळाचे कवच एवढे कठीण असते की, ते हातोडीने फोडावे लागते. फळे येण्यासाठी कोरडे हवामान लागते.
बेलाची पाने औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत. फुलांपासून अत्तर बनवितात. कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते. कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात. बेलाच्या पिकलेल्या फळातील गर सुगंधी, शीतल व सारक असतो. त्यात मार्मेलोसीन हा घटक असून तो सारक व मूत्रल आहे. फळांपासून सरबत करतात. मलावरोध व बद्धकोष्ठता यांवर हे सरबत उपयोगी आहे. बेलाच्या झाडाचा डिंक उपयुक्त असतो. फळे कठीण आणि जाड असल्यामुळे झाडाला लागलेली फळे अंगावर पडून एखाद्याला इजा होण्याचा धोका असतो.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.