अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आर्कॅन्सॉ नदी (Arkansas River) ची सर्वांत लांब उपनदी. कॅनडिअन नदीचा उगम कोलोरॅडो राज्यातील लास ॲनमस परगण्यात स. स.पासून सु. २,९०० मी.  उंचीवर होतो. हे स्थान रॉकी पर्वतरांगांमधील सँग्री द क्रिस्टो पर्वतात आहे. उगमानंतर प्रथम ती लास व्हेगास मैदानांतून दक्षिणेकडे वाहते. पुढे पूर्वेकडे वळण्याआधी ही नदी कॅनडिअन कड्यांमध्ये (Canadian Escarpment) ४५० मी.  खोलीची निदरी तयार करते. नंतर टेक्सस राज्यातील लाल वालुकाश्मात खोल आणि अरुंद दरी तयार करीत ही नदी पूर्वेकडे वाहत जाते. तेथून ओक्लाहोमा राज्यातील अँटिलोप टेकड्यांमधून वाहत, ओक्लाहोमा शहराला मागे टाकत, आर्कॅन्सॉ नदीकाठावरील मस्कोगी शहराच्या आग्नेयीस सु. ४७ कि.मी.वर, बॉस्टन पर्वतश्रेणीच्या पश्चिम टोकाजवळ आर्कॅन्सॉ नदीस मिळते. कॅनडिअन नदीची एकूण लांबी १,४५८ कि.मी. आहे. या नदीने संयुक्त संस्थानांच्या ओक्लाहोमा, कोलोरॅडो, न्यू मेक्सिको आणि टेक्सस या राज्यांतील सु. १,२१,५०० चौ. कि. मी. क्षेत्रांचे जलवाहन केले आहे.

नॉर्थ कॅनडिअन नदी ही कॅनडिअन नदीची प्रमुख उपनदी आहे. ही उपनदी ओक्लोहोमा राज्यातील युफॉला येथे कॅनडिअन नदीला पश्चिमेकडून मिळते. ओक्लाहोमा हे मोठे शहर नॉर्थ कॅनडिअन नदीच्या काठावर वसले आहे. न्यू मेक्सिकोमधील मोरा नदी आणि यूट क्रीक तसेच टेक्ससमधील मस्तांग क्रीक या कॅनडिअन नदीच्या इतर उपनद्या आहेत. रटोन, टूकमकॅरी (न्यू मेक्सिको), बॉर्गर (टेक्सस), एदा (ओक्लाहोमा) यांसारखी लहान शहरे या नदीकाठी वसली आहेत. पूरनियंत्रणाच्या आणि जलसिंचनाच्या दृष्टीने कॅनडिअन नदीवर काही धरणे बांधली आहेत. त्यांपैकी न्यू मेक्सिकोमधील टूकमकॅरी येथील कान्चस धरण (१९३९), यूट जलाशय, टेक्ससमधील बॉर्गर येथील सॅनफर्ड धरण हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत.

१६०१ मध्ये न्यू मेक्सिकोचे स्पॅनिश गव्हर्नर ज्युआन दे ओन्याते (Juan de Onate) या समन्वेषकांनी कॅनडिअन नदीचा शोध लावला. त्यानंतर अनेक समन्वेषकांनी तसेच वसाहतकऱ्यांनी विविध मोहिमांद्वारे कॅनडिअन नदी आणि नदीलगतचा प्रदेश शोधून काढला आणि तेथे वसाहती स्थापण्यास सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकात या नदीच्या आजुबाजूचा प्रदेश तेथील मागासलेपणामुळे ‘ग्रेट अमेरिकन डेझर्ट’ (Great American Desert) या नावाने ओळखला जात असे. १८४९ मध्ये रँडॉल्फ मर्सी या अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने कॅनडिअन नदीचा मार्ग काढण्याकरिता लष्करी मोहीम हाती घेतली. त्यामुळे कॅलिफोर्निया मार्गाचा (California Road) शोध लागला आणि कॅलिफोर्निया येथील सोन्याच्या खाणींच्या शोधामुळे या प्रदेशाच्या विकासाला चालना मिळाली. कॅनडिअन नदी आणि आर्कॅन्सॉ नदी यांच्या संगमावर वस्ती केलेल्या ‘फ्रेंच कॅनडिअन’ या व्यापारी समूहाच्या नावावरून या नदीस ‘कॅनडिअन’ असे नाव प्राप्त झाले. या प्रदेशात पूर्वापार राहणारे स्थानिक अमेरिकन लोक जवळच्या रेड नदीला त्यांच्या कॅडो (Caddo) भाषेत ‘कयान्तिनु’ (kayantinu) असे संबोधत असत. या ‘कयान्तिनु’ शब्दाच्या स्पॅनिश स्पेलिंगवरून या नदीस ‘कॅनडिअन’ असे नाव पडले, असे आधुनिक संशोधनावरून समजते. पूर्वीच्या काळी आग्नेय न्यू मेक्सिको आणि पश्चिम टेक्ससमधील लानो इस्ताकाडो (स्टेक्ड प्लेन्स) हा कॅनडिअन नदीलगतचा खडबडीत, उजाड भूभागाचा वापर चोरी आणि दरोडेखोरी करणारे लोक लपण्यासाठी करीत असत.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा