प्रज्ञापराध हा शब्द प्रज्ञा (बुद्धिमत्ता) + अपराध या शब्दांपासून तयार होतो. एखाद्या गोष्टीबाबत जसे वर्तन अपेक्षित आहे त्याच्या विपरीत वर्तन करणे किंवा तसे वर्तन करण्यास प्रवृत्त होणे म्हणजे प्रज्ञापराध होय. उदा., ज्या पद्धतीने वागू नये, बोलू नये, स्वीकारू नये, विचार करू नये; नेमके तेच करण्याकडे प्रवृत्त होणे अथवा त्याप्रमाणे वर्तन घडून येणे. यामध्ये आपले जसे आचरण किंवा कृती आहे ती चुकीची आहे, हे मनोमन पटत असतानाही तशा पद्धतीची कृती किंवा क्रिया केली जाते. आयुर्वेदात याचे विस्तृत वर्णन आले असून हे आजार उत्पन्न करणाऱ्या कारणांमध्ये एक महत्त्वाचे कारण आहे, असे मानले जाते.

प्रज्ञापराधाचे विस्तृत वर्णन करताना चरकाचार्य असे म्हणतात की, बुद्धी, धैर्य आणि स्मरणशक्ती या तीन प्रकारच्या भावांपासून भ्रष्ट झालेला मनुष्य जे वाईट कर्म करतो त्यास प्रज्ञापराध असे म्हणतात. शरीरात तसेच निसर्गात घडणाऱ्या विकृत घडामोडींसाठी प्रज्ञापराध हे मुख्य कारण मानले जाते.

धी-धृति-स्मृति यांनी भ्रष्ट झालेला मनुष्य प्रज्ञापराधास प्रवृत्त होतो व अपराध करतो असे वर्णन चरकसंहितेत आले आहे. सदाचार लोप पावतो, पूजनीय व्यक्ती अथवा वस्तू यांचा अपमान होतो, अहितकर अशा गोष्टी जाणिवपूर्वक केल्या जातात. ईर्षा, भय, क्रोध, लोभ नको तिथे वा नको तितका केला जातो. अशा परिस्थितीत आपण आपल्या चेतनांकडे दुर्लक्ष करून निर्णय घेण्यास सुरुवात करतो व आपले आचरण स्वैर बनते.

(१) बुद्धिभ्रंश : हितकर-अहितकर यातील मूल्यमापन करता न येणे.

(२) धृतिभ्रंश : स्वत:वर नियंत्रण ठेवण्याच्या सामर्थ्याचा अभाव असणे.

(३) स्मृतिभ्रंश : जे समजले, पटले आणि अनुभवासही आले अशा गोष्टींपासून परावृत्त न होता त्याच गोष्टी करणे.

अशाप्रकारे नियमांकडे दुर्लक्ष करणे, ज्यांचे नुकसान माहित असूनही त्याच गोष्टी शारीरिक, वाचिक व मानसिक अशा तीनही पातळीवर मनुष्य पुन:पुन्हा करतो त्यास प्रज्ञापराध असे म्हणतात.

सध्याच्या आधुनिक युगातही मनुष्याला विविध आजार व नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. बदलती जीवनशैली, त्यातून वाढत असणाऱ्या अवाजवी गरजा, दैनंदिन तसेच ऋतुनुसार पालन करावयाच्या नियमांचे उल्लंघन, संयंत्रांचा अनावश्यक वापर इत्यादींपासून निर्माण होणारे मानसिक व शारीरिक आजार हे प्रज्ञापराधाचेच परिणाम आहेत. त्याचप्रमाणे सतत बदलते ऋतुमान, वादळे, दुष्काळ व इतर भौगोलिक घडामोडी इत्यादी विविध नैसर्गिक आपत्ती देखील प्रज्ञापराधाचेच परिणाम म्हणता येईल.

आयुर्वेदाचा मूळ उद्देशच आजार होऊ न देणे व निरोगावस्था टिकवून ठेवणे असा आहे. शरीरातील दोषांना दूषित करणाऱ्या हेतुंचे व स्वास्थ्य टिकवून ठेवणाऱ्या आहार व विहारांचे विस्तृत वर्णन आयुर्वेदात केले गेले आहे. सद्यस्थितीत आधुनिक वैद्यकशास्त्र व आयुर्वेद यांची योग्य सांगड घालून कर्करोग, हृदयरोग, फुप्फुस विकार, संधिवात, आमवात अशा विविध आजारांच्या चिकीत्सा व संशोधनांमध्ये प्रज्ञापराधाचा मुख्य हेतू म्हणून केला जाणारा विचार अमुलाग्र ठरू शकतो.

संदर्भ :

  • ब्रह्मानंद त्रिपाठी, चरकसंहिता, शारीरस्थान, अध्याय १, चौखम्बा संस्कृत संस्थान प्रकाशन, वाराणसी, २००२.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे