स्तनी वर्गाच्या कृंतक गणातील व केव्हीइडी कुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव केव्हिया पोरर्सेलस आहे. केव्हिया हा प्रजातिदर्शक पोर्तुगीज शब्द असून याचा अर्थ उंदीर, तर पोरर्सेलस हा जातिदर्शक लॅटिन शब्द असून याचा अर्थ छोटे डुक्कर. हा प्राणी मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. दक्षिण अमेरिकेतून गिनीमार्गे यूरोपमध्ये हा प्राणी आणला गेला, म्हणून त्याच्या नावात ‘गिनी’ आहे असा एक समज आहे. त्याची शारीरिक रचना, आवाज आणि सतत खाण्याची सवय यांबाबतीत त्यांचे डुकराशी साम्य असल्याने त्यांच्या नावात ‘पिग’ हा शब्द आला असावा. मात्र, हा प्राणी खूरवाला डुक्कर नाही.
सध्या गिनी पिग रानटी अवस्थेत आढळत नाहीत, तर ते पाळीव प्राणी म्हणून आढळतात. त्यांना पिंजर्यात ठेवले जाते. त्यांचे मुख्य खाद्य गवत असून समतोल आहारासाठी सफरचंद, पानकोबी, फुलकोबी, गाजर इ. दिले जाते. ते पिंजर्यातून पळून जात नाहीत व हाताळताना चावा घेत नाहीत किंवा ओरबडत नाहीत. परिचित व्यक्ती आल्यावर ते शीळ घालतात. काही लोक त्यांना आवडीने पाळतात. मात्र ओलावा, तापमानात होणारे अचानक बदल आणि कडाक्याची थंडी तसेच तीव्र उन्हाळा अशा बाबी त्यांना मानवत नाहीत.
गिनी पिगच्या दाढांची वाढ आयुष्यभर होत असते. गवताचे चर्वण करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पचनसंस्थेत बृहदांत्र आकाराने मोठे असते. काही वेळा हे प्राणी स्वत:ची विष्ठा खातात. त्यामुळे त्याज्य चोथा आणि ‘ब’ जीवनसत्त्वे पुन्हा मिळतात. तसेच जीवाणूंमुळे अन्नाचे योग्य पचन होते.
गिनी पिगची पैदास मांस मिळविण्यासाठी केली जाते. त्यांच्या मांसात प्रथिने जास्त असून कोलेस्टेरॉल कमी असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये आणि यूरोपमध्ये गिनी पिग पालन केंद्रे आहेत. वैज्ञानिकांनी संकर पध्दतीने निरनिराळ्या आकारांचे आणि रंगांचे गिनी पिग निर्माण केले आहेत.
माणसांप्रमाणे संसर्गजन्य रोग, स्कर्व्ही, अतिसार, गळू आणि कवक व उवा यांच्यामुळे होणारे रोग गिनी पिग प्राण्यालाही होतात. त्यामुळे शास्त्रीय संशोधनात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर सोळाव्या शतकापासून केला जात आहे. माणसाची प्रतिकृती या अर्थाने आनुवंशिकी, लशी तयार करणे, विषाणुप्रतिरोधके, प्रतिपिंड, औषधशास्त्र, किरणीयनाचे प्रयोग यांसाठी ते वापरले जातात. बालमधुमेह, क्षय व गर्भावस्थेतील विकार या संशोधनांत त्यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. रशिया आणि चीन या देशांनी त्यांचा अंतराळयानांत संशोधनासाठी वापर केला आहे. अमेरिकेत मानवी जनुक प्रकल्प संशोधन संस्थेत गिनी पिगच्या जिनोम क्रमाचा अभ्यास सुरू आहे. अशा तर्हेने पाळीव प्राणी म्हणून तसेच मांसासाठी आणि शास्त्रीय संशोधनासाठी गिनी पिगचा वापर होतो.