लाल, प्रताप चंद्र : (६ डिसेंबर १९१६–१३ ऑगस्ट १९८२). भारताचे भूतपूर्व हवाई दलप्रमुख (१९६९–७३). लुधियाना (पंजाब राज्य) येथे बसंत व प्रमोदिनी या सुशिक्षित दांपत्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आयकर खात्यात अधिकारी होते. प्रताप चंद्रांचे शिक्षण प्रथम दिल्ली येथे आणि त्यानंतर लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये झाले. विद्यार्थिदशेतच इला या बंगाली युवतीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

बॅरिस्टर होण्याची त्यांची इच्छा होती; परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांना मायदेशी परतावे लागले. त्यांनी हौशी वैमानिकाचा परवाना मिळविला होता (१९३४). विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव मिळाल्यानंतर नोव्हेंबर १९३९ मध्ये भारतीय हवाई दलात त्यांची राजदिष्ट अधिकारी म्हणून निवड झाली. उड्डाण प्रशिक्षण विद्यालयात तसेच युद्धविषयक सैन्याच्या हालचालींचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत निदेशक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. दुसऱ्या महायुद्धकाळात जून १९४४ मध्ये त्यांच्याकडे वायुसेनेच्या ७ व्या स्क्वॉड्रनचे प्रमुखपद देण्यात आले. म्यानमार (ब्रह्मदेश) येथील आघाडीवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना ‘डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस’ (डी.एफ्.सी.) हा किताब प्रदान करण्यात आला. युद्धानंतर त्यांची भारतीय वायुसेनेत स्थायी पदावर नियुक्ती करण्यात आली. लंडनच्या रॉयल एअर फोर्स स्टाफ कॉलेजमधून त्यांनी हवाई शिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी अनेक उच्चपदस्थ जागा भूषविल्या, वायुसेनेच्या मुख्यालयाचा सहायक सचिव आणि एअर फोर्स ऑफिसर कमांडिंग ट्रेनिंग कमांड म्हणूनही त्यांनी कार्य केले. १९५७–६२ या काळात ते भारतीय हवाई मार्ग निगम तसेच एअर इंडिया या दोन भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांचे अनुक्रमे महाव्यवस्थापक आणि सदस्य-संचालक होते. त्यांनतर ते पुन्हा भारतीय वायुसेनेत आले (१९६३). पुढे वायुसेनेच्या परिरक्षा कार्यालयाचे ते हवाई अधिकारी होते. तसेच त्यांनी पश्चिम विभागाचे प्रमुख, वायुसेना कर्मचाऱ्यांचे उपमुख्याधिकारी, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स (बंगलोर) या निगमाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष इ. पदे भूषविली (१९६६–६९). त्यांच्या प्रशासकीय कामगिरीचा, पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला (१९६६). त्यांच्या विविध पदांवरील कार्यक्षमतेचा विचार करून जुलै १९६९ मध्ये त्यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. या पदावर ते निवृत्त होईपर्यंत होते (१९७३). भारत-पाकिस्तान युद्धात (१९७१) त्यांनी विशेष कौशल्य दाखवून भारतीय हवाई दलाची शान व सैन्याचे नैतिक धैर्य वाढविले. या कार्याबद्दल त्यांना पद्मविभूषण (१९७२) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निवृत्तीनंतर त्यांनी दोन्ही भारतीय हवाई मार्ग निगमांचे अध्यक्षपद सांभाळले.

हृदयावरील उपचारासाठी प्रताप चंद्र लंडन येथील याकुब इस्पितळात दाखल झाले (१९८२); तथापि अल्पावधीतच तेथे त्यांचे निधन झाले. भारतीय हवाई दलाच्या एकूण आधुनिकीकरणात व कार्यक्षमतेत त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा