ही वनस्पती एरंडाच्या यूफोर्बिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रोटॉन टिग्लियम आहे. चीन, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका व भारत या देशांत ही वनस्पती वनांत तसेच बागांमध्ये आढळते. भारतात ही पश्चिम बंगाल, आसाम आणि द. कोकण या भागांत आढळते.
हा लहान सदापर्णी वृक्ष ४.५ ते ६ मी.पर्यंत वाढतो. पाने साधी, एकाआड एक, पातळ, सु.१८ सेंमी. लांब व पिवळसर हिरवी असून किंचित दातेरी असतात. फांदयांच्या किंवा मुख्य खोडाच्या टोकाला लवदार फुलोरा येतो. फुले एकलिंगी, लहान व हिरवी असतात. नर-फुले फुलोऱ्या च्या वरच्या टोकाला, तर मादी-फुले खालच्या टोकाला येतात. फळ त्रिखंडी, शुष्क व पांढरे असून फुटून त्याची तीन शकले होतात आणि प्रत्येकातून एक लंबगोल, तपकिरी व किंचित चपटे बी बाहेर पडते.
बियांपासून पिवळसर, काहीसे चिकट क्रोटन तेल मिळते. या तेलात ३.४% विषारी रेझीन असते. तसेच ३७% ओलेइक, १९% लिनोलिइक, १.५% ॲरॅचिडिक, ०.३% स्टिअरिक, ०९% पामिटिक, ७.५% मिरिस्टिक, ०.६% ॲसिटिक व ०.८% फॉर्मिक ही आम्ले असतात. तसेच त्यांत लॉरिक, टिग्लिक, व्हॅलेरिक, ब्युटिरिक व अन्य काही आम्लांचा अंशही आढळतो. यांखेरीज बियांमध्ये रिसिनीन हे अल्कलॉइड, क्रोटन ग्लोब्युलिन आणि रायसीन ही विषारी प्रथिने असतात. प्रामुख्याने रेचक म्हणून ही वनस्पती परिचित आहे. मुळे तीव्र रेचक असून पानांचा रसही रेचक असतो. तसेच बी व त्यातील तेल रेचक असते. पूर्वी या तेलाचा उपयोग रेचक म्हणून केला जात असे. सध्या सुरक्षित रेचके उपलब्ध झाल्याने जमालगोटयासारख्या औषधांचा वापर केला जात नाही. धनुर्वात, जुनाट बद्धकोष्ठता, दमा व संधिवात अशा व्याधींवर बियांचा उपयोग सावधानता बाळगून करतात. उलट परिणाम झाल्यास लिंबाचा रस वा कात पाण्यात उगाळून देतात. पारंपरिक चिनी वैदयकात ज्या ५० मौलिक औषधी मानल्या गेल्या आहेत त्यात या वनस्पतीचा समावेश होतो.