ॲलन, सर रॉय जॉर्ज डग्लस (Allen, Sir Roy George Douglas) : (३ जून १९०६ – २९ सप्टेंबर १९८३ ) प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, संख्याशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ. त्यांचा जन्म वॉरसेस्टर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रॉयल ग्रामर स्कूल, वॉरसेस्टर येथे झाले. सिडनी सस्सेक्स कॉलेज, केंब्रिज येथून त्याने गणितात प्रथम श्रेणीत पदवी मिळविल्यामुळे त्यांना रँग्लर स्कॉलरशिप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांची १९२८ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे संख्याशास्त्र या विषयाचा अधिव्याख्याता म्हणून नेमणूक झाली. अर्थशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गणिताचा वापर करणारे ते पहिले अर्थशास्त्रज्ञ होत. संख्याशास्त्राचा अभ्यासक म्हणूनही त्यांची ख्याती होती.
ॲलन, सर रॉय जॉर्ज डग्लसॲलन यांनी १९३८ मधील मॅथेमॅटिकल ॲनॅलिसिस फॉर इकॉनॉमिस्ट या आपल्या ग्रंथात प्रथमच अंशत: पर्यायी लवचिकतेसंबधीची मांडणी केली. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९ ते १९४५) वॉशिंग्टन येथील ‘रेकॉर्ड ॲण्ड स्टॅटिस्टिक ऑफ ब्रिटिश कौन्सिल’ या संस्थेच्या आणि ‘कॅम ब्लड प्रॉडक्शन ॲण्ड रिसोर्सेस’ या मंडळाच्या संचालकपदी त्यांची नेमणूक झाली. १९४४ मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठात संख्याशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले. १९५२ साली ब्रिटिश ॲकॅडेमीतर्फे त्यांना ‘अधिछात्र’ (Fellow) म्हणून गौरविण्यात आले. त्यांनी रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचे अध्यक्षपदही भूषविले. १९६० च्या दशकात ते प्रसिद्ध अशा शासकीय चौकशी समितीचा अध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी गृहकुलसंदर्भातील किंमतीच्या प्रभावाची चौकशी केली. त्या संबंधात १९६५ मध्ये प्रकाशित झालेल्या ॲलन अहवालात गृहकुल किंमतीचा प्रभाव हा प्रतिगामी होता, असे अनुमान काढण्यात आले. १९६६ मध्ये त्यांना अर्थशास्त्रविषयक कार्यासाठी ‘नाइटहुड’ हा किताब प्रदान करण्यात आले. १९७८ मध्ये ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी’तर्फे दिले जाणारे ‘गाय गोल्ड मेडल’; ‘मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा संख्याशास्त्रातील पुरस्कार असे अनेक मानसन्मान व पुरस्कार त्यांना मिळालेत.
ॲलन यांचे संख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांतील अनेक लेख व ग्रंथ प्रकाशित झाले. १९३४ मध्ये त्यांनी विख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ सर जॉन रिचर्ड हिक्स (Sir John Richard Hicks) यांच्याबरोबर अ रिकन्सिडरेशन ऑफ द थिअरी ऑफ व्हॅल्यू हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. याच कालावधीत त्यांनी ‘द नेचर ऑफ इनडिफरन्स कर्व्ह’ ही अर्थशास्त्रीय संकल्पना प्रथमच मांडली. स्टॅटॅस्टिक्स फॉर इकॉनॉमिस्ट (१९४९); मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स (१९५६); मॅक्रोइकॉनॉमिक थिअरी मॅथेमॅटिकल ट्रीटमंट (१९६७) हे त्यांचे काही उल्लेखनीय ग्रंथ होत. १९८० मध्ये अर्थशास्त्रातील कार्याबद्दल सिडनी सस्सेक्स केंब्रिजतर्फे त्यांना गौरविण्यात आले.
ॲलन यांचे साउथवॉल्ड, सॅफॉल्क येथे निधन झाले.
समीक्षक – श्रीराम जोशी