सूक्ष्मजीवशास्त्रातील आधुनिक संशोधनानुसार, भू-अंतर्गत तथाकथित जीवविरहित भागातही ६५०-७५० से. तापमानास सूक्ष्मजीव आढळले आहेत. स्वीडनमध्ये भूगर्भात ५ किमी.पेक्षा अधिक खोलीवर १२२० से. इतक्या उच्च तापमानास सूक्ष्मजीव आढळले आहेत. त्यामुळे भूगर्भातील जीवावरणाची मर्यादा खोलीनुसार सांगण्याऐवजी तापमानानुसार सांगणे इष्ट ठरते.
पृथ्वीवरची पुष्कळशी जीवसृष्टी वातावरणातच आढळते. काही पक्षी ६५० – १,८०० मी. उंचीपर्यंतच्या वातावरणात उडताना आढळतात. याक हा प्राणी समुद्रसपाटीपासून ३,२०० – ५,४०० मी. उंचीवर तर पर्वतीय शेळ्या ३,०५० मी. उंचीपर्यंत आढळतात. या उंचीवरील तृणभक्षक प्राणी दगडफूल, गवत व झुडपे यांवर जगतात. हिमनदीय लार्क स्परसारखी हरित वनस्पती हिमालयात माउंट एव्हरेस्टच्या परिसरात सस. पासून ६,२०० मी. उंचीवर दिसते. तेथील पक्षी त्यापेक्षा २,००० मी. अधिक उंचीवरून उडू शकतात. उदा., रूपेल्स गिधाड सस.पासून ११,३०० मी. उंचीपर्यंत तर चक्रवाक ८,३०० मी. उंचीपर्यंत उडताना आढळतात. वनस्पतिजन्य परागकणांसारखे अन्नाचे कण वाऱ्यामुळे, वातावरणांतील ऊर्ध्व-प्रवाहांमुळे किंवा कदाचित ज्वालामुखी उद्रेकांमुळे १० किमी. उंचीपर्यंत वाहून गेल्यामुळे त्यांवर उपजीविका करणारे सूक्ष्मजीव किंवा कीटक तेथील वातावरणात त्या उंचीपर्यंत आढळणे शक्य आहे. कृत्रिम रीत्या वाढविता येणारे सूक्ष्मजीव वातावरणात सु. ४० किमी. उंचीपर्यंत आढळले आहेत. एवढया उंचीवर तापमान व हवेचा भार अतिशय कमी असतो तर अतिनील किरणांचे प्रारण अतिउच्च असते. अशा परिस्थितीत तेथे सूक्ष्मजीव आढळणे असंभवनीय असले तरी ते आढळतात, ही वस्तुस्थिती आहे. यावरून जीवावरणाची जाडी जास्त असल्याचे दिसते.
सागरी भागातील जीवावरणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. समुद्रात सूर्यप्रकाश फार खोलवर पोहोचत नसल्यामुळे जलीय वनस्पती जलपृष्ठापासून जास्त खोलीवर आढळत नाहीत. शैवाले ३५० मी. खोलीखाली बहुधा आढळत नाहीत. सूक्ष्मजीव मात्र सागरतळापर्यंत आढळतात. अटलांटिक महासागरामधील प्वेर्त रीको खंदकात सु. ८,३७२ मी. खोलीवर मासे आढळतात. १० किमी. पेक्षा अधिक खोलीवरील मॅरिआना खंदकातही सूक्ष्मजीव आढळतात. पोषक वनस्पतींचा पट्टा सोडून खूप खोलपर्यंत सूक्ष्मजीव आढळून आले आहेत. सागरी भागात जलीय वनस्पतींपासून निर्माण होणाऱ्या कार्बनी पदार्थांचे अवसादन किंवा अवपातन होऊन गुरुत्वाकर्षणामुळे ते समुद्रतळाकडे जात असावेत. समुद्रात त्यांचे वितरण होऊन सर्व थरांत विपुल प्रमाणात अन्नकण उपलब्ध होत असावेत. त्यामुळे हे अन्न खाऊन जगणारे सूक्ष्मजीव समुद्रातील सर्व थरांत आढळणे शक्य आहे.
सागरतळाशी असलेल्या ज्वालामुखीशेजारी आढळणारी सजीवसृष्टी ही सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर अवलंबून नसून ती ज्वालामुखीच्या ऊर्जेवर अवलंबून असते. सतत क्रियाशील असलेल्या ज्वालामुखीपासून मिळणाऱ्या ऊर्जेवर सर्वस्वी वेगळ्या प्रकारच्या सजीवांचा समूह आढळून आला आहे. त्यांत गंधकयुक्त सागरजलातील जीवाणू, दंडगोलाकार वलयांकित मोठे कृमी, मृदुकाय प्राणी आणि खेकडे अशी अन्नसाखळी अस्तित्वात आहे.
सु. १६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर झालेली सजीवनिर्मिती मर्यादित क्षेत्रात उष्ण पाण्यात होती; परंतु हळूहळू सजीवांनी पृथ्वीच्या तापमानामध्ये होणाऱ्या बदलाबरोबर नव्या क्षेत्रात राहण्यासाठी अनुकूलन केले. गोडे पाणी, सागरी जलाशय, समुद्रतळ, खाजणे, भूमी, वातावरण, अत्युच्य शिखरे अशा सर्व ठिकाणी आता सजीव अस्तित्वात आहेत. परंतु औदयोगिक क्रांतीनंतर मानवाने केलेली तांत्रिक प्रगती, तसेच शीलावरण, वातावरण व जलावरणाचे वाढते प्रदूषण आणि हरितगृह वायू परिणाम इत्यादींमुळे जीवावरणावर विपरित परिणाम होत आहेत.