सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे (रासायनिक मूलद्रव्यांचे किंवा संयुगांचे) अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. पोषक द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाहमार्ग चक्रीय स्वरूपाचा असतो. या चक्रीय प्रवाहमार्गाला जैव – भूरासायनिक चक्र म्हणतात. जीवावरण, शीलावरण, वातावरण व जलावरण या पृथ्वीच्या सर्व आवरणांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. ‘जैव – भूरासायनिक’ प्रक्रियेत जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक घटक समाविष्ट असतात.

परिसंस्थांतर्गत रासायनिक पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे आहे. ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनावर अवलंबून असते. जल चक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र ही महत्त्वाची जैव-भूरासायनिक चक्रे आहेत.

जैव – भूरासायनिक चक्रे दोन प्रकारची असतात ; (१) वायुचक्र व (२) अवसादन चक्र. वायुचक्रात मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात तर अवसादन चक्रात मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकांत आढळते. वायुचक्रात नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड इत्यादी तर अवसादन चक्रात आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस व जमिनीतील इतर घटकांचा समावेश असतो. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडते. उदा. एखादया स्थानिक भागात कार्बन डाय-ऑक्साइड जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पतींकडून त्याचे शोषण केले जाते.

वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. उदाहरणार्थ, नायट्रोजन हा वायू अजैविक स्वरूपात मुख्यत: वातावरणात आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साइडच्या स्वरूपात तो मृदेत व अवसादामध्ये आढळतो. त्याप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यत: भूकवचातील दगडी कोळसा, ग्रॅनाईट, हिरा व चुनखडकांमध्ये आढळतो, तर जैविक स्वरूपात कार्बन डाय-ऑक्साइडच्या स्वरूपात असतो. सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बनचे अस्तित्व कमी काळ असते.

हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यांवर गंभीर परिणाम होतात. म्हणून अलीकडच्या काळात या चक्रांच्या अभ्यासावर विशेष भर दिला जात आहे.