बारा मुख्य ग्रीक देवतांच्या वर्तुळापैकी एक प्राचीन मातृदेवता. ती झ्यूस आणि लेटो यांची मुलगी आणि अपोलो देवाची जुळी बहीण होती. तिचा जन्म अपोलोच्या एक दिवस आधी झाला. साहजिकच ती मोठी असल्याने अपोलोचा सांभाळ करीत असे. त्यामुळे तिच्यात रक्षण व पालन करण्याचे गुण निर्माण असल्याचे मानले जाते.

सोबत काळवीट किंवा शिकारी कुत्रा असलेली ‘शिकाऱ्याच्या वेशातील तरुणी’, असे तिचे मूर्त स्वरूप असून काही ठिकाणी तिच्या मस्तकावर चंद्रकोरीच्या आकाराची शिंगेदेखील आढळतात. आर्टेमिस ही कुमारी देवता, चंद्रदेवता, रानटीपशू, हिंस्र श्वापद तसेच शिकारीची देवता म्हणून मानली जात असे. स्त्रियांच्या लग्नापूर्वी आणि लग्नानंतरच्या आयुष्याशी ती संबंधित होती. तरुण मुलींच्या कौमार्याचे आणि लहान मुलांचे पालन करणारी ही देवता होती. अथेन्स शहरात मुली वयात आल्यावर एक खास समारंभ होत असे. तत्पुर्वी, वयात येण्याआधी, पाच-दहा वर्षांचा काळ त्या मुली ब्रौरॉनिया प्रांतात आर्टेमिसची सेवा करण्यात घालवीत असत. ह्याला ‘Being Bears for Artemis’ असे म्हटले जायचे.

आर्टेमिसचा जन्म डीलोस नावाच्या पवित्र द्वीपावर झाला आणि तिथेच तिने अनेक कौशल्ये आत्मसात केली. तिला शिकार आणि पाठलाग करणे आवडत असे. अपोलोकडून तिला धनुर्विद्येची कला प्राप्त झाली. तिच्या पित्याने म्हणजेच झ्यूसने जेव्हा आर्टेमिसला वर देऊ केला, तेव्हा तिने आपल्यासाठी धनुष्य आणि अखंड कौमार्य मागून घेतले. आर्केडिया प्रांतात शिकारी कुत्र्यांसोबत ती आपला संपूर्ण वेळ शिकारीत घालवीत असे. तिच्यासोबत ६० समुद्र अप्सरा आणि २० नदी अप्सरासुद्धा असत.

आर्टेमिसचा स्वभाव अत्यंत क्रूर आणि खुनशी होता. आपल्या मनाविरुद्ध झालेल्या कोणत्याही गोष्टीचा ती प्रतिशोध घेतल्याशिवाय राहात नसे. एका आख्यायिकेनुसार एकदा ती आपल्या सख्यांबरोबर नदीत स्नान करीत असता तिथे ॲक्टन नावाचा एक प्रसिद्ध शिकारी आला. तिला त्या अवस्थेत पाहण्याचे टाळण्याऐवजी तो काही काळ तिच्याकडे टक लावून पाहात राहिला. तेव्हा चिडून आर्टेमिसने त्याचे एका काळवीटात रूपांतर केले आणि नंतर अत्यंत क्रूरपणे आपल्या शिकारी कुत्र्यांकरवी त्याला मारून टाकले. आपल्यासारखेच आपल्या सख्यांनीदेखील शुद्ध, पवित्र राहावे, असा तिचा दंडक होता.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार कॅलिस्टोनामक अप्सरेला झ्यूसपासून गर्भधारणा झाली. हे जेव्हा आर्टेमिसला कळले, तेव्हा तिने कॅलिस्टोला अस्वल बनवले आणि तिची शिकार केली. पण असे असूनही तिला पुरुषांचे वावडे नव्हते. शिकारी देवता ओरायन आर्टेमिसचा मित्र होता. दोघांनी एकत्रितपणे अनेक शिकारी केल्या. दोघांचे सख्य सहन न होऊन अपोलोने ओरायनवर महाकाय विंचवाचा हल्ला केला. तेव्हा ओरायन घाबरून समुद्रात लपून बसला. नंतर अपोलोने आर्टेमिसकडे जाऊन तिला आव्हान दिले की, ती समुद्रातील त्या अस्पष्ट दिसणाऱ्या दगडावर बाण चालवूच शकत नाही. ह्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून आर्टेमिसने जो बाण सोडला, तो ओरायनची कवटी भेदून गेला. हे पाहून आर्टेमिसने त्याला परत जिवंत करायचा खूप प्रयत्न केला; पण ओरायन मृत्यू पावला. ताऱ्याच्या रूपात ओरायन आजही आकाशात स्कॉर्पियोच्या शेजारी दिसतो.

आणखी एका आख्यायिकेनुसार निओब ही भूजलचर राजा थीब्स याची पत्नी होती. तिला सात मुलगे आणि सात मुली होत्या. एकदा अपोलो आणि आर्टेमिस यांची माता लेटो हिच्यासमोर आपल्याला लेटोपेक्षा जास्त संतती आहे, अशी फुशारकी निओब मारू लागली. तेव्हा क्रुद्ध होऊन लेटोने अपोलो आणि आर्टेमिसला निओबला शिक्षा करण्याचा आदेश दिला. आपल्या मातेच्या आज्ञेवरून अपोलोने निओबच्या सर्व मुलांना आणि आर्टेमिसने सर्व मुलींना मारून टाकले.

काही ठिकाणी आर्टेमिसचा संबंध संतानप्राप्तीशी संबंधित देवता ऐलिथिया हिच्याशी जोडला आहे. स्पार्टामध्ये ऑर्थिया ह्या नावाने आर्टेमिस हिंसक विधींच्या वेळी पुजली जात असे. टोरीसमधील आर्टेमिसचा पंथ नरबळीशी संबंधित होता. तसेच ती वनस्पतीच्या वाढीशीदेखील संबंधित मानली जात असे.

आर्टेमिसचे देऊळ हे प्राचीन काळातील जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानले गेले.

संदर्भ :

  • Couch, Malcom, Greek and Roman Mythology, New York, 1998.
  • Stoneman, Richard, Greek Mythology : An Encyclopedia of Myth and Legend, London, 1995.
  • Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.
  • https://greekgodsandgoddesses.net/goddesses/artemis/
  • https://www.greekmythology.com/Olympians/Artemis/artemis.html

                                                                                                                                                                   समीक्षक : शकुंतला गावडे