लोककला ही संज्ञा नागरीकरण न झालेल्या आदिवासी आणि ग्रामीण जीवनातील कलेसाठी योजिली जाते. निसर्गाशी संवाद साधीत जगणाऱ्या लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार लोककला म्हणून ओळखले जातात. त्यात नृत्य, नाट्य, संगीत, गाणी आदीं प्रयोगात्म किंवा प्रयोगीय कलांचा अंतर्भाव होतो. लोकजीवनात गीत,नृत्य,नाट्य, हस्तकला इत्यादी सर्वच आविष्कार दैनंदिन गरजेचा भाग म्हणून आविष्कृत होतात. कोणत्या तरी कामाशी वा कृतीशी त्यांचा संबंध असतो. या लोककलांचे वहन परंपरेने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे होते.हे वहन मौखिक स्वरूपात होते. लोककलांच्या या मौखिक परंपरेचा कर्ता ज्ञात नसतो. लोकांनी लोकांसाठी लोकांमधून तयार केलेले आविष्कार म्हणजे लोककला. या लोककलांना बांधणारा घट्ट धागा असतो तो परंपरेचा. ही परंपरा समूहाने तयार झालेल्या विविध संकेतांमधून सिद्ध होते.लोककलांचे प्रमुख दोन प्रकार होत :-  (१) प्रयोगात्मक लोककला : नृत्य, नाट्य, संगीतादी आविष्कार आणि (२) हस्तकला : चित्र, शिल्पादी सर्व वस्तुरूप आविष्कार. लोककलांमध्ये सांप्रत अनेक आविष्कार धर्मश्रद्धेशी संबंधित आहेत.

लोककलेतील दृश्य कलाप्रकारांत चित्र, शिल्प, कारागिरी, हस्तकला, वस्त्रालंकरण, शोभालंकार, मृत्पात्री इत्यादी अनेकविध कला असून काव्य, संगीत, नृत्य, नाट्य आणि तत्संबंधित त्यांचे गोंधळ, भारूड, दशावतारी नाटके, यक्षगान, कीर्तन, पोवाडा, तमाशा, कव्वाली, लेझीम वगैरे अनेकविध लोककला प्रकार आढळतात. या व्यतिरिक्त या सर्वांचे त्या त्या समाजाच्या चालीरितीनुसार होणारे विपुल उपप्रकार या सर्वांचा अंतर्भाव लोककलांमध्ये करावा लागतो. काही लोककलाप्रकार हे दृश्य कला, संगीत, काव्य, नाट्य या सर्वांना किंवा यांतील काहींना सामावून घेणारे असतात. उदा., कर्नाटकात चामड्याच्या पातळ कडक पडद्यावर कातरठसा (स्टेनसिल)-पद्धतीने चित्रे कोरून दिव्याच्या प्रकाशात त्यांच्या छाया चित्रपटासारख्या पडद्यावर कथानुक्रमाने दाखवून आख्यान सांगितले जाते. कोकणात कुडाळ परिसरातील चित्रकथी या प्रकारात लोकशैलीतील लघुचित्रे कथानुक्रमाने प्रेक्षकांना दाखवून काहीसे कीर्तन पद्धतीचे आरण्यात सांगणारी कलांवंतांची परंपरा पिंगुळी या गावात आजही तग धरून आहे. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ हा अप्रतिम कारागिरी आणि नाट्य यांचा हृदयंगम मेळ होय.बाहुल्या बनवितानाच त्यांचे एकूण कथानकातील स्थान,त्यांचे स्वभाव,त्यानुसार पोषाख आणि त्यांच्या हालचीमध्ये आवश्यक असलेली लय यांचा विचार केलेला असे.कळसूत्रीच्या विशिष्ट हालचाली हाताच्या बोटांनी करताना सूत्रधाराच्या बोटातून कतानकाचा जीव गोचर व्हायचा,प्रतीत व्हायचा असतो.त्यासाठी सूत्रधाराच्या अन्त:करणातच हे नाट्य प्रथम आकारित व्हावे लागते. हा अत्यंत कौशल्याचा भाग असतो. एकूण लोककलेतील बहुतांशा आविष्कार सामूहिक असतात. ते लोकजीवनात संपृक्त झालेले असतात. त्या त्या लोकसंस्कृतीतील सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक श्रद्धा आणि रीती-परंपरा यांच्याशी ते एकजीव झालेले असतात.

पारंपारिकता हे लोककलांचे प्रमुख गुणवैशिष्ट्य असते; कारण परंपरेशिवाय लोककला संभवत नाही. प्रयोगात्मक लोककलाचा आविष्कार प्राय: समूहाद्वार होतो. तिथे समूह मनाचा आविष्कार म्हणजेच ते लोककला हे आपण गृहीत धरलेले असल्याने समूहमनाचे दळण-वळण पिढ्यांपिढ्यांच्या संस्काराने होत असते.लोककला जेव्हा श्राव्य झाल्या म्हणजेच जेव्हा त्यांच्या आविष्कारांना शब्दांचे माधयम मिळाले. तेव्हा त्या मुखर झाल्या आणि पुढे संहितेत शब्दबद्ध झाल्या. या संहिता म्हणजेच लोकगीते, लोककथा, पुराणकथा, विधिगीते इ. होत. या मौखिक संहितांवर संस्कार होत त्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित झाल्या. त्यामुळे मौखिकता हे लोककलांचे गुणवैशिष्ट्य होय.कला आणि संस्कृतीच्या संप्रेषणाचे प्रभावी माध्यम म्हणून मौखिक परंपरांकडे पाहिले जाते.लोककथा,लोकगीते,पोवाडे,कीर्तन आदींच्या निर्वहनातून मौखिक परंपरा आविष्कृत होते.मौखिक परंपरा ही समूहाची असते.लोकसाहित्य हे मौखिक परंपरांचे एक रूप आहे. हिंदू,बौद्ध,जैन या धर्मांच्या पुरातन संहिता या मौखिक परंपरांनीच जपलेल्या दिसतात.

प्रयोगात्मक लोककलेतील लोकगीते ही मौखिक परंपरेने आलेल्या अनेकविध गीतप्रकारांचा निर्देश करतात. लोकगीते ही समूहमनाची व समूहप्रतिभेची निर्मिती आहे. निसर्गाच्या लयबद्धतेशी व तालद्धतेशी संवाद साधीतच ही गीतनिर्मिती झाली.लोकगीत,लोकसंगीत व लोकनृत्य ही परस्परोपजीवी परस्परावलंबी व निसर्गसंवादी अशी मानवाची निर्मिती आहे. लोकगीतांची निर्मिती व्यक्तीची असली, तरी तिच्या निर्मितीमागची प्रेरणा समूहमनाची असते. आविष्कारदृष्ट्या लयबद्धता हो लोकगीताचे आकर्षण केंद्र असते. महाराष्ट्रातील भोंडल्याची किंवा हादग्याची गाणी ही त्याची उत्तम उदाहरणे होत.

लोकनाट्य सामूहिक जानपद नाट्याविष्कारांचा निर्देश करते. या नाट्याचा उगम हा कोणत्या ना कोणत्या आदिम यातुविधीत असल्याचे दिसून येते. पुढे यातुशक्तीची जागा लोकदैवतानी घेतली आणि लोकदेवतांसाठी केले जाणारे विधी व लोकोत्सव यांतून लोकनाट्य जन्माला आले आणि विकसित झाले. म्हणूनच भारतीय लोकनाट्य प्राय: धार्मिक बैठकीवर उभे आहे. कोणत्या तरी एका देवता उपासनेचा भाग म्हणून अनेक लोकनाट्यांचे प्रचलन होते. लोकनाट्याची निर्मिती, संगोपन आणि संवर्धन समूहाधिष्ठित प्रेरणेनेच होते. खंडोबाचे किंवा देवीचे जागरण किंवा गोंधळ ही विधिनाट्ये आहेत; तर तमाशा आणि दशावतारी खेळ (नाटक) हे नाट्यप्रकार लोकनाट्य व विधिनाट्य यांचे सीमारेषेवर रेंगाळणारे होत.

जनसामान्यामध्ये परंपरागत प्रचलित असलेला नृत्यप्रकार म्हणजे लोकनृत्य. ही नृत्ये लोकजीवनातून उत्क्रांत झालेली असून त्यातील कलाकार अप्रशिक्षित असतात, जानपदाच्या स्वाभाविक वृत्ती, आवडीनिवडी, सामाजिक-भौगोलिक परिस्थिती, धार्मिक रीतिरिवाज, लोकाचे दैनंदिन जीवन यांचे प्रतिबिंब लोकनृत्यातून दृग्गोचर होते. साधेपणा हा लोकनृत्याचा आत्मा असून त्यातील हालचाली उत्स्फूर्त व सहज स्वाभाविक असतात. ती उघड्यावर मंदिराच्या मंडपात सादर केली जातात. यात आदिवासींची लोकनृत्ये अधिक लोकप्रिय आहेत. त्यांत कोळीनृत्याचे अनेक प्रकार रुढ आहेत. कोकणातील कुणबी समाजामध्ये गौरी-गणपतीच्या वेळी चेऊली नाच केला जातो. ‘जाखडी’ (उखाणा) या नावानेही तो प्रसिद्ध आहे. नागर समाजात ‘टिपरी’ व ‘गोफनृत्ये’ प्रचलित असून ती दक्षिण महाराष्ट्रात व विदर्भात कोजागरी पौर्णिमेला, तर कोकणात गोकुळाष्टमीला सादर केली जातात. या नृत्यगीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा संदर्भ असतो. दाक्षिणात्य पिनल कोलट्टम् व गुजरातमधील गोफगुंफन या लोकनृत्याशी त्यांचे साधर्म्य आहे. लेझीम हा सुद्धा एक प्रमुख क्रीडाप्रधान लोकनृत्यप्रकार आहे; तर दिंडी व कला हे धार्मिक आशय असलेले नृत्यप्रकार आहेत. कोकणात दशावतारी नाटक हे पारंपारिक लोकनृत्यनाट्य अनेक वर्षे तग धरून आहे. लावणी व फुगडी यात अनुक्रमे पारंपारिक असा गीतप्रकार असून त्यात नृत्याची लावणी महत्त्वाची असते तर फुगडी हा सर्वमान्य प्रकार होय. झिम्मा, गोफ, टिपऱ्या हे प्रधान लोकनृत्यप्रकार आहेत.प्रयोगात्म लोककलेचा विचार करता तिचे स्वरूप परंपरेने निश्चित केलेले असले, तरी सादरीकरणात लवचिकता असते. म्हणजेच सादरीकरणाचा संक्षेप अथवा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य लोककलावंत घेतात. हा संक्षेप किंवा विस्तार लोककलावंत स्थल, काल, व्यक्ती सापेक्षतेनुसार करतात. पदगायन, पदाचे निरूपण,पद निरूपानंतर संवादाद्वारे प्रसंग निर्मिती आणि पुन्हा गायन.पदांच्या चौकाचौकांच्या सादरीकरणातून कथा उलगडत जाते.

आख्याने, प्राक्कथा, दंतकथा निवेदन करताना तरी लोककलावंत या कथांच्या सादरीकरणात कालसापेक्ष दाखले देतात. मग तो कलावंत कीर्तनकार असो अथवा तमासगीर असो. कालसंवादी दाखल्यांनी किंवा उदाहरणांनी या लोककला प्रकारांची नित्यनूतनता सिद्ध होते.रामायण,महाभारत, पुराणे यांतील देवदेवतांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या प्रवृत्ती या परंपरेने निश्चित झालेल्या असतात. त्यांच्या सादरीकरणात लोककलावंत चपखलपणे कालसंवादी संदर्भ देतात. उदा., पुत्र प्रेमाने आंधळा झालेला धृतराष्ट्र व पुत्र प्रेमाने आंधळा झालेला विद्यमान राजकीय नेता.लौकिक दैवतांचे संकीर्तन लोककलांतून घडते. त्यामागे कोणते ना कोणते स्थल माहात्म्य असते. जसे पंढरपूरचा विठ्ठल किंवा तुळजापूरची भवानी इत्यादी. त्या प्रामुख्याने लोकदैवतांच्या स्थल माहात्म्याशी निगडित असतात. लोककलावंत संकीर्तनात त्या स्थळांत उल्लेख मोठ्या गौरवाने करतात. सहजस्फूर्तता हा लोककलांचा प्राण आहे. किंबहुना सहज स्फूर्ततेशिवाय लोककला संभवत नाही. प्रयोगात्मक लोककलांतील – लोकनृत्य, लोकनाट्य आदीतील उत्स्फूर्तता, आवेग, आवाहकता, नृत्य, वाद्य आणि संगीत या स्थायी कलागुणांच्या परंपरेच्या प्रभावामुळे सांप्रत त्याचा चेहरामोहरा बदलूनही लोकनाट्याची-लोकनृत्याची परंपरा चालू आहे.

लोककलांचे सादरीकरण हे एकजीनसी आणि समग्रही असते.यात कलावंत आपापल्या परीने स्वातंत्र्य घेतो. हे स्वातंत्र्य परकाया प्रवेशासदृश असे. गायक, सूत्रधार, नर्तक, वादक अशा विविध भूमिकांमधील एखादी कथा कलावंत सादर करताना त्या कथेतील पात्रे साकार करीत असतो आणि कथेला गती देत ती पुढे नेणे हा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे एक कथेचा एक चौक सादर करताना वेगवेगळी पात्रे तो वठवितो. येथे पात्रे सादर करतो असे न म्हणता पात्रे वठवितो,असे म्हटले गेलेले आहे. अनुभूती देत कथा पुढे नेणे होय, यालाच सहजपरकाया प्रवेश म्हणतात. उदा., हरदासी गोंधळ्याच्या गोंधळातील नाईक हा गायक, निरूपक कथेतील विविध पात्रे व पुन्हा गायक अशा भूमिका बजावीत असतो.प्रयोगात्म लोककलांचे आविष्कार हे नित्यनूतन असतात. एक आविष्कार दुसऱ्या आविष्कारासारखा नसतो. पदगायन, पदाचे निरूपण, दोन चौकांच्या पदांमधील पात्रांचा संवाद व पुन्हा पदगायन हा आकृतिबंध कायम असला, कथेचा मूळ ढाच्या कायम असला तरी त्याचे सादरीकरण प्रत्येक प्रयोगात नावीन्यपूर्ण असते. म्हणजेच हे आविष्कार नित्यनूतन असतात. प्रयोगात्म लोककलांची ही गुणवैशिष्ट्ये होत.

संदर्भ :

  • भवाळकर, तारा,लोकसाहित्याच्या अभ्यासपद्धती,स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २००९.
  • मोरजे, गंगाधर,लोकसाहित्य सिद्धांत आणि रचनाप्रकारबंध, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००२.

This Post Has 4 Comments

  1. Jyoti wasudev bante

    Sir tumcha lekh mala avdla

  2. Jyoti bante

    Please mi yacha pH.d sathi upyog Kari ka

  3. अरविंद दीक्षित

    आवडला हा लेख मला गोंधळी आख्यानाचा आकृतिबंध हवा होता त्याचे सूत्र मला यात सापडले.

Jyoti bante साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.