
स्तनी वर्गाच्या समखुरी ( ज्यांच्या पायांवरील खुरांची संख्या सम असते) गणातील हरणांच्या मृगकुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव मॉस्कस मॉस्किफेरस आहे. मध्ये व ईशान्य आशिया, काश्मीर, नेपाळ व भूतान येथे हा आढळतो. समुद्रसपाटीपासून ३,०००-४,००० मी. उंचीवरील भूर्ज वृक्षांच्या दाट जंगलात यांची वस्ती असून त्यांचा वावर मर्यादित क्षेत्रात असतो.
कस्तुरी मृगातील ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : याला शिंगे नसतात. नरात वरच्या जबड्यात ८-१० सेंमी. लांब वाढलेले सुळे असतात. माद्यांचे सुळे आखूड असल्यामुळे दिसून येत नाहीत. या मृगांचे मागील पाय पुढील पायांपेक्षा अधिक लांब आणि मजबूत असतात. त्यांच्यात पित्ताशय असतो. मादीला फक्त दोन स्तनाग्रे असतात. डोक्यासह शरीराची लांबी सु. १ मी. असते. शेपूट ४-५ सेंमी. लांब असून ढुंगणावरील केसांमुळे सहजासहजी दिसून येत नाही. खांद्यापाशी उंची सु. ५० सेंमी. असते; पण ढुंगणापाशी ती थोडी जास्त असते. प्रौढ प्राण्याचे वजन ११-१८ किग्रॅ. असते. रंग गडद तपकिरी असून त्यावर करड्या रंगाचे ठिपके असतात. मानेपासून पोटाकडील भाग पांढुरका होत गेलेला असतो. शरीरावर दाट, राठ व लांब केस असल्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून त्याचे रक्षण होते.
कस्तुरीमृग एक एकटे किंवा जोडीने राहतात. गवत, शेवाळ किंवा कोवळे कोंब हे त्यांचे अन्न आहे. ते मिळविण्यासाठी सकाळी ते संध्याकाळी बाहेर पडतात. एकाच ठिकाणी दीर्घकाळ ते राहतात. ज्या परिसरात त्यांचा वावर असतो त्याची हद्द ठरविण्यासाठी त्या परिसराच्या सीमारेषेवर ते मुद्दाम विष्ठा टाकतात. पाठलाग केल्यास हा प्राणी जेथे शिकारी प्राणी पोहोचू शकणार नाही अशा खडकाळ सुळक्यांच्या भागात आश्रय घेतो. वाघ, अस्वल व लांडगे अशा प्राण्यांपासून त्याला धोका असतो.
नर आणि मादी यांचा नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांत समागम होतो. १६० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादीला एक (क्वचित् दोन) पिलू होते. त्याच्या अंगावर ठिपके असतात. एक वर्षानंतर त्याचे प्रौढात रूपांतर होते.
कस्तुरी मृगाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नरांमध्ये असलेली कस्तुरी-ग्रंथी. या ग्रंथीपासून कस्तुरी मिळते. तीन वर्षांहून जास्त वयाच्या नराच्या बेंबीजवळ उदराच्या त्वचेखाली कस्तुरी-ग्रंथी असते. या ग्रंथीतून तपकिरी व मेणासारखा स्राव पाझरतो आणि एका पिशवीत जमा होतो. ताजेपणी त्याला मूत्राप्रमाणे उग्र दुर्गंधी असते; पण तो वाळल्यावर त्याला सुगंध येतो. हीच ती कस्तुरी. त्यात मुख्यतः मस्कोन हे कार्बनी संयुग असते. कस्तुरी हे सुगंधी आणि बंधक द्रव्य आहे. त्याचा उपयोग अत्तर बनविण्यासाठी होतो. एका नरापासून सु. २५ ग्रॅम कस्तुरी मिळते. कस्तुरी मिळविण्याकरिता या प्राण्यांची हत्या केली जाते. त्यांची हत्या न करताही मिळविता येते. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) ही संघटना या प्राण्याच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.