ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात पात्राच्या आंतर्बाह्य गुणांचा व स्वभावाचा विचार करून अनुरूपा, विरूपा व रूपानुसारिणी या तीन पद्धतींबद्दल सांगितले आहे. त्यातील एक पद्धत म्हणजे रूपानुसारिणी होय.
भूमिकेला अनुरूप नट नसेल तर आणखी एक पद्धती नाट्यशास्त्रकार भरतमुनी सुचवितात, ती म्हणजे रूपानुसारिणी होय. स्त्रीने पुरुषाची आणि पुरुषाने स्त्रीची भूमिका करणे म्हणजे रूपानुसारिणी पद्धती होय.
पुरुष: स्त्रीकृतं भावं यत्र प्रकुरुते पुन: I
रूपानुसारिणी ज्ञेया प्रयोग भरतोत्तमै: II अध्याय ३५ श्लोक ३१
नाटकात एखाद्या सुकुमार, धीरललित राजाची भूमिका असल्यास आणि त्याप्रमाणे सुंदर व कोमल नट न सापडल्यास ती भूमिका एखाद्या सुरूप स्त्रीस द्यावी म्हणजे ते पात्र अधिक उठून दिसेल. तसेच नाटकात असलेल्या राक्षसीची भूमिका एखाद्या स्त्रीला न देता ती एखाद्या धिप्पाड पुरुषाला दिली तर त्याचा प्रेक्षकांवर जास्त प्रभाव पडेल. याचा विचार भरतमुनींनी ही पद्धती सांगताना केला आहे. चारित्र्यचित्रणाची ही संपूर्ण प्रक्रिया खूपच विचारपूर्वक केलेली असते आणि नट ती अनुभवत असतो व तिचा आनंदही घेत असतो.
संदर्भ :
- त्रिपाठी, राधावल्लभ, संक्षिप्तनाट्यशास्त्रम्, वाणी प्रकाशन, नवी दिल्ली, द्वितीयावृत्ती, २००९.
- शुक्ल, बाबूलाल शास्त्री, हिंदी नाट्यशास्त्र, चौखंबा संस्कृत संस्थान, वाराणसी, प्रथमावृत्ती १९८५.
समीक्षक – सु. र. देशपांडे