गावकावळा

पक्षी वर्गाच्या काक-कुलातील एक परिचित पक्षी. कावळ्याच्या अनेक जाती असून दक्षिण अमेरिकेचा अपवाद सोडून जगात सर्वत्र कावळे दिसून येतात. गावकावळा व डोमकावळा या भारतातील कावळ्याच्या दोन जाती आहेत. गावकावळ्याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस स्प्लेंडेन्स आणि डोमकावळ्याचे कोर्व्हस मॅक्रोर्‍हिंकस आहे. गावकावळा आकाराने पारव्यापेक्षा मोठा असून त्याची लांबी सु. ४६ सेंमी. असते. त्याच्या काळ्या रंगात किंचित हिरवट, निळसर किंवा जांभळ्या रंगाची झाक असते. मानेभोवती, पाठीकडे आणि छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो. चोच आणि पाय मजबूत व काळे असतात. डोळे गडद तपकिरी रंगाचे असून दृष्टी तीक्ष्ण असते. त्याचा आवाज कर्कश असतो. डोमकावळा गावकावळ्यापेक्षा किंचित अधिक मोठा असतो. या दणकट पक्षाची चोचही अधिक धारदार आणि बळकट असते. याच्या सर्वांगावर चकचकीत काळाभोर रंग असतो.

कावळे मनवी वस्तीत न बुजता कमालीच्या धिटाईने वावरतात. माणसाचे सर्वच खाद्यपदार्थ तो खातो. यांशिवाय थुंकी, शेंबूड, कफाचे बडके यांसारखे त्याज्य पदार्थही खातो. उभ्या पिकातील धान्य आणि वाळविण्यासाठी ठेवलेल्या पदार्थांची कावळे नासाडी करतात. सातत्याने टेहेळणी करून संधी मिळताच धिटाईने खाद्यपदार्थ पळवण्यात कावळे तरबेज असतात. त्यांच्या नजरेतून सहसा काही सुटत नाही. कावळे सर्वाहारी असल्याने उष्टी, खरकटी आणि खराब झाल्याने फेकून दिलेले खाद्यपदार्थ, प्राण्यांची मृत शरीरे इत्यादी खातात. या सवयीमुळे आपला परिसर स्वच्छ राखण्यास त्यांची चांगलीच मदत होते. कावळे इतर पक्ष्यांची अंडी व पिले खातात. प्रसंगी घारीघुबडांसारख्या बलवान शत्रूंवरही धीटपणे हल्ला करतात. कुरापती काढण्यात कावळे पटाईत असतात. कुत्र्यामांजरांनाही ते सतावून हैराण करतात. बेडकां सरड्यांसारख्या प्राण्यांना टोचून टोचून ठार मारतात.

उंच झाडांवरील फांद्यांच्या बेचक्यात कावळे काटक्यांची ओबडधोबड घरटी बांधतात. घरट्यातील खोलगट भागात लोकर, चिंध्या अथवा काथ्याचे अस्तर असते. महाराष्ट्रात एप्रिल ते जूनच्या दरम्यान त्यांच्या विणीचा हंगाम असतो. इतरत्र हा काळ थोडा मागे-पुढे असू शकतो. कावळी (मादी) फिकट हिरव्या व निळ्या रंगाची ४-५ अंडी घालते. त्यांच्यावर लहान-मोठे तपकिरी रंगाचे ठिपके आणि रेषा असतात. अंडी उबविण्याचे आणि पिल्लांना भरविण्याचे काम नर-मादी दोघेही आळीपाळीने करतात. याच घरट्यात कोकिळा आपलीही अंडी घालते. तत्पूर्वी कोकिळा कावळ्यांची तेवढीच अंडी घरट्याबाहेर टाकून देत असते. कावळा व कावळी दोघेही कोकिळेची अंडी उबवून तिच्या पिलांना आपलीच समजून वाढवीत असतात. कोकिळेच्या पिलांची वाढ वेगाने होते. त्यामुळे कावळ्याची पिले पूर्ण वाढण्याअगोदर कोकिळेची पिले सक्षम होऊन निघून जातात.

पक्षांमध्ये कावळा हा सर्वांत बुद्धिवान आणि सावध समजला जातो. ते गटागटाने राहतात. रात्री एखाद्या मोठ्या झाडावर त्यांचा मुक्काम असतो. संध्याकाळी ते एकत्र आले की खूप गोंधळ करतात. मोठ्यामोठ्याने ‘काव-काव’ करून ते एकमेकांना कोणता संदेश देतात हे मात्र अजून समजलेले नाही. एक मात्र नक्की, कीटक, उंदीर व घुशीं सारख्या लहान कुरतडणार्‍या प्राण्यांच्या संख्येवर ते नियंत्रण ठेवतात.

शेतीत वापरली जाणारी विषारी कीटकनाशक द्रव्ये खाऊन कीटक, उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात हे प्राणी कावळ्यांच्या खाण्यात आले की तेदेखील मृत्युमुखी पडतात किंवा जगले तरी प्रजनन करू शकत नाहीत. विषारी कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शहरांतून तसेच खेडेगावांतून कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत आहे.

This Post Has 2 Comments

  1. amar

    tyanchi life kiti year aste? tyacha ullekh kara plz

प्रतिक्रिया व्यक्त करा