लीकी, मेरी : (६ फेब्रुवारी १९१३–९ डिसेंबर १९९६). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव मेरी डग्लस लीकी (मेरी डग्लस निकोल). त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे वडील एरस्काइन निकोल हे चित्रकार होते. वडील चित्रे काढण्यासाठी दरवर्षी फिरत असल्याने मेरी निकोल यांनी बालवयात खूप प्रवास केला. त्यांचे बरेचसे शिक्षण घरीच झाले. वडिलांप्रमाणेच मेरी उत्तम चित्रकार होत्या. फ्रान्समध्ये डॉर्डोन या सुप्रसिद्ध प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळाजवळ राहत असताना त्यांना पुरातत्त्वविषयात गोडी निर्माण झाली. एरस्काइन निकोल यांचे १९२६ मध्ये फ्रान्समध्ये निधन झाल्यानंतर मेरी आणि तिची आई सिसिलिया फ्रेरे निकोल या इंग्लंडला परतल्या. यानंतर काही काळ मेरी यांनी केन्सिंगटन व विंबल्डन येथे शालेय शिक्षण घेतले. परंतु बंडखोर मनोवृत्ती असल्याने त्यांना दोन वेळा शाळेतून काढून टाकण्यात आले.

वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. १९३०-३४ दरम्यान हेम्बुरी आणि डेव्हन येथील उत्खननांची रेखाटने करण्याचे काम त्यांनी केले. याच काळात त्या लंडनमध्ये भूविज्ञान आणि पुरातत्त्व या विषयांवरील व्याख्यानांना उपस्थित राहत असत. मानवशास्त्रज्ञ कॅन्टन-थॅामसन यांनी त्यांची केंब्रिज विद्यापीठातील पुरामानवशास्त्रज्ञ लुई लीकी (१९०३–१९७२) यांच्याकडे शिफारस केली. लुई लीकी यांच्या ॲडम्स ॲन्सेस्टर्स या पुस्तकासाठी चित्रे काढण्याचे काम त्या करू लागल्या. पुढे लुई लीकींनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन मेरी यांच्याशी विवाह केला (१९३७).

लीकी पतिपत्नी केनियात आले (१९३७). त्यानंतर पुढील तीन दशके दोघांनी पुरामानवशास्त्रात भरीव संशोधन केले. टांझानियात ओल्डुवायी गॅार्ज येथे ओएच-५ (झिंझ) जीवाश्माचा शोध (१९५९), ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या बरोबरीने अस्तित्वात असलेल्या होमो हॅबिलिस जीवाश्माचा शोध (१९६१), टांझानियातील लेटोली येथील उत्खननात ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्राण्यांच्या पाऊलखुणांचा शोध (१९७६) आणि इथिओपियातील हडार येथील सुप्रसिद्ध ल्युसीचा (एएल २८८-१) शोध (१९७८) हे मेरी लीकींच्या कामगिरीतील महत्त्वाचे टप्पे होते.

मेरी लीकी यांना प्रामुख्याने प्रागैतिहासिक कला आणि पुरातत्त्वविषयांत रस असला, तरी त्या जीवाश्मांचा शोध आणि त्यांच्या अभ्यासात अग्रेसर होत्या. त्यांनी हायरॅक्स हिल, नजोरो रिव्हर केव्ह आणि ओलोर्गेसायली या स्थळांवर उत्खनन केले. लुई लीकी यांच्याप्रमाणेच कुतूहलापोटी त्या प्रागितिहासाकडे वळल्या होत्या आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यश संपादिले. तसेच टांझानियातल्या शैलचित्रांवर त्यांनी महत्त्वाचे काम केले (१९५१). हे संशोधन त्यांच्या आफ्रिकाज व्हॅनिशिंग आर्ट या पुस्तकात प्रकाशित झाले (१९८३).

मेरी लीकींनी प्रत्यक्ष शोधमोहिमांमधला सहभाग थांबवला (१९८३) आणि त्या ओल्डुवायी गॅार्ज येथून नैरोबीला आल्या. असे असले, तरी पुढील वीस वर्षे त्यांचे लेखन व संशोधन चालूच होते. ओल्डुवायी गॅार्ज : माय सर्च फॅार अर्ली मॅन (१९७९) आणि डिस्क्लोजिंग द पास्ट (१९८४) ही त्यांची प्रसिद्ध आत्मचरित्रे.

मेरी लीकींना जोनाथन (जन्म १९४०), रिचर्ड (जन्म १९४४) व फिलिप (जन्म १९४८) अशी तीन मुले. यांतील रिचर्ड लीकी यांनी मातापित्यांचा वारसा पुढे चालू ठेवत पुरामानवशास्त्रात मोलाचे योगदान दिले.

नैरोबी येथे मेरी लीकी यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Gaur, Ranjan, ‘Louis Leakey and Mary Leakeyʼ, Resonance, August 2015, pp. 667-679, 2015.
  • Heiligman, Deborah, Mary Leakey : In Search of Human Beginnings, New York, 1995.
  • Leakey, Mary D. ‘3-6 Million Years Old : Footprints in the Ashes of Timeʼ, National Geographic, 155 (4), pp. 446-457, 1979.
  • Morrel, Virginia, Ancestral Passion : The Leakey Family and the Quest for Humankind’s Beginnings, New York, 2011.

समीक्षक : शौनक कुलकर्णी