डिकेमाली हा लहान पानझडी वृक्ष रुबिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव गार्डेनिया गमिफेरा आहे. गार्डेनिया प्रजातीत सु. २५० सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. गार्डेनिया गमिफेरा ही मूळची भारतातील असून श्रीलंकेतही आढळते. भारतात ही महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि दक्षिण भारतामध्ये आढळते. या वृक्षाची पाने, फुले किंवा खोड तोडले असता राळेसारखा हिरवा-पिवळा डिंक पाझरतो. हा डिंक जमा करून, वाळवून त्याचे तुकडे करून तो विकतात. बाजारात त्यालाही डिकेमाली म्हणतात.

डिकेमाली वृक्ष सु. २ मी. उंच वाढतो. खोडाची साल हिरवट आणि गुळगुळीत असते. पाने साधी, बिनदेठांची, समोरासमोर आणि ३-४ च्या झुबक्याने असतात. ती गडद हिरवी असून चकचकीत असतात. फुले सुवासिक, एकेकटी किंवा लहान गुच्छात फांद्यांच्या टोकांना येतात. फुले सुरुवातीला पांढरी परंतु नंतर पिवळी होतात. त्यांचा वास आजूबाजूला दरवळत राहतो. मृदुफळ बोराएवढे व लंबगोल असून खाण्याजोगे आहे. त्यात अनेक बिया असतात.

डिकेमालीपासून मिळणारा डिंक कठीण, अपारदर्शक, हिरवट पिवळ्या रंगाचा आणि उग्र वासाचा असतो. तो उष्ण असून बेचव असतो. तो कफनाशक, भूकवर्धक असून कृमिनाशक आहे. त्वचारोगावर माश्यांपासून संरक्षण होण्यासाठी डिंकाचा लेप लावतात. याखेरीज गुरांच्या जखमांमधील कीटक मारण्यासाठी डिंकाचा वापर केला जातो.

डिकेमाली नावाने मिळणारा डिंक गार्डेनिया प्रजातीच्या गा. रेझिनीफेरा किंवा गा. ल्युसिडा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षुपीय (झुडूप) वनस्पतीपासूनही मिळतो. ती पानझडी वनांत आढळते. तिला सुवासिक पांढरी फुले येतात. या झुडपांच्या फुलाच्या कळ्या आणि कोंब यांपासून डिकेमाली स्रवतो.