प्राण्यांमधील प्रकाशसंवेदी व प्रतिमाग्राहक इंद्रियाला डोळा म्हणतात. प्रकाशाचे ग्रहण करून त्याद्वारे माहिती मिळविणे हे डोळ्यांचे मुख्य कार्य असल्यामुळे तो मानवी शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. डोक्याच्या कवटीतील खाचेत डोळा सात अस्थींनी वेढलेला असतो. या खाचेचा बाह्यभाग रुंद आणि काहीसा चौकोनी असून आतील भाग निमुळता शंकूसारखा असतो. डोळ्याचा व्यास साधारणपणे २.५ सेंमी. असून सर्व प्रौढ व्यक्तींमध्ये त्याचा आकार जवळपास सारखा असतो.

डोळ्यांच्या खाचेमध्ये नेत्रगोलक, डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, दृष्टिचेता, डोळ्यांची हालचाल करणारे स्नायू, त्यांच्या चेता आणि संयोजी ऊती असतात. संयोजी ऊतींमधील मेदामुळे डोळा स्थिर राहतो. डोळ्यांच्या पुढील भागात अश्रुपिंड, नासाश्रुवाहिनी आणि पापण्या असतात (पहा : अश्रुग्रंथी). वरची पापणी आकाराने मोठी तर खालची पापणी लहान असते. पापण्यांच्या मोकळ्या कडांवर केस असतात. जागे असताना दर मिनिटास ८-१० वेळा पापण्यांची उघडझाप होते. मात्र, झोपलेल्या अवस्थेत पापण्यांनी डोळा मिटला जातो. अश्रुग्रंथींनी स्रवलेल्या अश्रूंमुळे डोळे सतत ओले राहतात. पापण्यांची उघडझाप कमी झाल्यास डोळे कोरडे पडू शकतात.

डोळा तीन थरांनी बनलेला असतो. या थरांना बाहेरून आत अनुक्रमे श्वेतपटल, रंजितपटल आणि दृष्टिपटल अशी नावे आहेत.

श्वेतपटल : हे डोळ्याचे सर्वांत बाहेरील पटल असून ते कोलॅजेन आणि इलॅस्टिन या तंतूंनी बनलेले असते. श्वेतपटल पांढऱ्या रंगाचे असून त्याचा बाहेरून दिसणारा भाग पारदर्शक, तर मागचा न दिसणारा भाग अपारदर्शक असतो. श्वेतपटलाच्या पारदर्शक भागाला पारपटल म्हणतात. पारपटलाच्या पुढच्या भागावरील आवरणाला नेत्रश्लेष्म म्हणतात. नेत्रश्लेष्म पापणीच्या आतील भागावर पसरलेले असते.

डोळा

रंजितपटल : हा डोळ्याचा मधला थर आहे. या थरात पुष्कळ रक्तवाहिन्या असून तो श्वेतपटलाला चिकटलेला असतो. या थरामध्ये रंगीत संयोजी ऊती असतात. रंजितपटलाच्या मागील बाजूने नेत्रगोलामध्ये दृष्टिचेता प्रवेश करते. रंजितपटलाच्या पारदर्शक भागातून दिसणाऱ्या चकतीच्या आकारास बुबूळ (परितारिका) म्हणतात. बुबळाच्या मध्यभागी लहान-मोठ्या होणाऱ्या छिद्राला बाहुली म्हणतात. बुबळात असलेल्या दोन प्रकारच्या स्नायूंमुळे प्रकाशाच्या तीव्रतेनुसार बाहुलीचा आकार लहान-मोठा होतो. अंधुक प्रकाशात शक्य तेवढा प्रकाश डोळ्यांत शिरण्यासाठी विस्फारक स्नायुंद्वारे डोळ्यांची बाहुली मोठी होते. प्रखर प्रकाशात किमान प्रकाश डोळ्यात शिरण्यासाठी बाहुली लहान होते. प्रत्येक व्यक्तीच्या बुबळांचा रंग व रचना वेगळी असते.

बुबळाच्या आतील बाजूस नेत्रभिंग असून ते पेशींनी बनलेले असते. नेत्रभिंग बहिर्गोल असून ते नेत्रभिंगकोश या पातळ व पारदर्शक पिशवीत असते. नेत्रभिंगकोशाभोवती असलेले रोमकाय स्नायू आणि रोमक प्रवर्ध यांमुळे नेत्रभिगांची जाडी कमी-अधिक होते. या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे नेत्रभिंगाचे नाभीय अंतर बदलते आणि प्रतिमा दृष्टिपटलावर स्पष्ट पडते. नेत्रभिंग अग्रकक्षामध्ये स्थिर ठेवण्यास रोमक प्रवर्ध मदत करतात. नेत्रभिंगाचा मध्यवर्ती भाग इतर भागांपेक्षा अधिक टणक असून त्याला केंद्रक म्हणतात. केंद्रकाबाहेरील मऊ भागास नेत्रबाह्यक म्हणतात.

नेत्रभिंग व बुबळामुळे डोळ्याच्या पोकळीचे दोन कक्ष होतात. श्वेतपटल आणि बुबूळ यांमधील लहान कक्षाला अग्रकक्ष, तर बुबळाच्या मागच्या बाजूस असलेल्या मोठ्या कक्षाला पश्चकक्ष म्हणतात. अग्रकक्षामध्ये पाण्यासारखा द्रव असतो. त्याला नेत्रोद (अ‍ॅक्विअस ह्युमर) म्हणतात. रोमककायेद्वारे सतत नेत्रोद तयार होत असतो. पारपटल आणि नेत्रभिंग या दोन्ही भागांदरम्यानचा भाग या द्रवाने भरलेला असतो. या द्रवाद्वारे पारपटल आणि नेत्रभिंग यांच्या पोषणाचे तसेच वंगणाचे कार्य घडून येते. पश्चकक्षामध्ये विष्यंदी स्वरूपाचा काचाभ द्रव (व्हिट्रिअस ह्युमर) असतो. काचाभ द्रवामध्ये जन्मल्यापासून वयानुसार बदल होत नसल्यामुळे डोळ्यांचा आकार कायम राहतो. रंजितपटलामधील रक्तवाहिन्यांमधून डोळ्याच्या सर्व भागांना पोषणद्रव्ये पुरविली जातात.

दृष्टिपटल : हा डोळ्याचा सर्वांत आतील थर असून तो प्रकाशसंवेदी पेशींच्या थरांनी बनलेला असतो. दृष्टिपटलाचा बाह्यस्तर मेलॅनीन या रंगद्रव्याने बनलेल्या पेशींचा असतो. प्रकाशसंवेदी पेशी दोन प्रकारच्या असतात: दंडपेशी आणि शंकुपेशी. ही नावे त्यांना आकारानुसार पडली आहेत. मानवी दृष्टिपटलात सु. १२ कोटी दंडपेशी आणि सु. ६० लाख शंकुपेशी असतात. दंडपेशी आणि शंकुपेशींवर प्रकाश पडल्यास त्या उत्तेजित होतात. उत्तेजित झाल्यामुळे त्या विद्युत विभव (दाब) निर्माण करतात.

दृष्टिपटल अत्यंत नाजूक असून त्याचा विस्तार रंजितपटलाएवढाच असतो. दृष्टिपटलाच्या ज्या भागातून दृष्टिचेता डोळ्यांमध्ये प्रवेश करते तेथे दंडपेशी व शंकुपेशी नसतात. या भागास अंधबिंदू म्हणतात. दृष्टिपटलाच्या मध्यभागात एक वर्तुळाकार पिवळसर भाग दिसतो. त्यास पीतबिंदू म्हणतात. या भागात शंकुपेशींची संख्या सर्वांत जास्त असल्यामुळे तेथे दृष्टिसंवेदना उच्च असते. दृष्टिपटलाच्या मध्यबिंदूमधून रंजितपटलाची नीला आणि रोहिणी प्रवेश करतात. पारपटलातून या रक्तवाहिन्यांचे परीक्षण करता येते.

नेत्रगोलाबाहेर सहा स्नायूंमुळे नेत्रगोलाची हालचाल होते. यामुळे डोळ्यांची वर-खाली व तिरकी हालचाल करता येते. या स्नायूंचे नियंत्रण तीन कर्पर चेतांमुळे होते. डोके व शरीर यांची हालचाल होत असताना नेत्रगोलाच्या हालचालीमुळे नजर स्थिर ठेवता येते.

प्रतिमाग्रहण : डोळ्यांची रचना एखाद्या कॅमेऱ्यासारखी असते. परंतु डोळ्यांचे कार्य कॅमेऱ्याहून अधिक संवेदनशील असते. प्रतिमाग्रहण आणि क्रमवीक्षण (स्कॅनिंग) या दोन्ही क्रिया डोळ्यांमध्ये एकाच वेळी घडत असतात. नेत्रभिंगाद्वारे दृष्टिपटलावर पडलेली प्रतिमा उलटी, लहान व खरी असते. दृष्टिपटलावर प्रतिमा पडली की दंडपेशी आणि शंकुपेशी यांमधील रासायनिक क्रियांमुळे विद्युत विभव निर्माण होतात. एखादा विद्युत विभव निर्माण झाला की या पेशींना जोडून असलेल्या चेतापेशींद्वारे तो प्रमस्तिष्क गोलार्धाच्या बाह्यांगातील दृष्टिकेंद्राकडे वाहून नेला जातो आणि तेथे प्रतिमेचे संवेदन (परसेप्शन) घडते.

दृष्टिपटलावर पडलेला अंधुक प्रकाशदेखील दंडपेशी आणि शंकुपेशी यांत असलेल्या रंगद्रव्याच्या कणांमार्फत शोषला जातो. दंडपेशीत ऱ्होडॉप्सीन हे रंगद्रव्य असते. त्यामुळे राखाडी रंगाच्या छटा ओळखता येतात. शंकुपेशीत तीन रंगद्रव्ये असतात. त्यामुळे रंगांचे ज्ञान होते आणि उजेडात प्रतिमा स्पष्ट दिसतात. शंकुपेशीतील सायनोलेब, क्लोरोलेब आणि एरिथ्रोलेब या रंगद्रव्यांद्वारे अनुक्रमे निळा, हिरवा आणि लाल रंग शोषले जातात. त्यामुळे आपले डोळे २०० पेक्षा अधिक रंगछटांतील फरक ओळखू शकतात. डोळ्यातील प्रकाशसंवेदी रंगद्रव्य कणांच्या शोधाबद्दल १९६७ सालचे नोबेल पारितोषिक जॉर्ज वॉल्ड यांना देण्यात आले.

दृष्टिपटलाच्या मध्यभागाजवळ असलेल्या पीतबिंदूमध्ये प्रामुख्याने शंकुपेशी असतात. आपण जे पाहतो, त्याची स्पष्ट प्रतिमा या भागाद्वारे निर्माण होते. दृष्टिपटलाच्या उर्वरित भागात दंडपेशी मोठ्या संख्येने असतात आणि या भागाद्वारे परिघीय प्रतिमा निर्माण होतात. याचा अर्थ, आपली नजर सरळ दिशेत असताना आपल्याला आजूबाजूचे चित्र या भागामुळे दिसते. दंडपेशी काळोखाला अधिक संवेदी असतात. त्यामुळे आपली नजर ज्या वस्तूंवर रोखलेली नसते त्या वस्तूही आपल्याला दिसतात. उदा., एखाद्या अंधुक ताऱ्याच्या आजूबाजूला पाहिले तर त्या ताऱ्याची प्रतिमा दृष्टिपटलाच्या ज्या भागात दंडपेशी असतात त्या भागात निर्माण होते आणि तो तारा दिसतो.

दृष्टिदोष : डोळ्यांचे समायोजन (अकोमोडेशन) कमी झाल्यामुळे निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता हे दोष उद्भवतात. निकटदृष्टिता दोषामुळे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होत असल्यामुळे निकटदृष्टिता दोष उद्भवतो. अंतर्वक्र भिंगांचा चष्मा लावल्यास प्रतिमादृष्टिपटलावर पडते. दूरदृष्टिता दोष असल्यास दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, परंतु जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. या दोषामुळे वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पलीकडे तयार होते. बहिर्वक्र भिंगांचा चष्मा लावल्यास हा दोष सुधारता येतो. मनुष्याचे सामान्यपणे ४०-५० वर्षे वयाच्या दरम्यान नेत्रभिंग कठीण होऊ लागते आणि लवचिकपणा कमी होतो. त्यामुळे काही जणांमध्ये निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता हे दोन्ही दोष एकाच वेळी होतात. या अवस्थेला जरादृष्टिक्षीणता म्हणतात. बहुधा सर्व वयस्कांमध्ये ही समस्या दिसून येते. मनुष्याचे वय ६० वर्षे होईपर्यंत नेत्रभिंगाचा लवचिकपणा कमी झाल्यामुळे प्रतिमेचे समायोजन होत नाही. त्यामुळे डोळ्यांवर ताण पडणे, अंधुक प्रकाशात कमी दिसणे. लहान आणि जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसणे अशा समस्या उद्भवतात. अशा व्यक्तींना वाचण्यासाठी व जवळचे पाहण्यासाठी चष्मा वापरावा लागतो. काही व्यक्ती जर आधीपासून चष्मा वापरत असतील तर त्यांना व्दिनाभी भिंगांचा (बायफोकल लेन्स) चष्मा वापरावा लागतो. निकटदृष्टिता व दूरदृष्टीता हे दोष शस्त्रक्रियेने दूर करता येतात. या शस्त्रक्रियेला लॅसिक शस्त्रक्रिया म्हणतात. यात लेसर किरणांचा वापर करून पारपटल पूर्ववत केले जाते.

नेत्ररोग व नेत्रविकार : डोळ्याच्या भागात उत्पन्न होणाऱ्या रोगांचा तसेच डोळ्याच्या खाचेतील अस्थींना होणाऱ्या रोगांचा नेत्ररोगांत समावेश होतो. उदा., रांजणवाडी, खुपरी, पापणीशोथ, पापणीघात, नेत्रश्लेष्मशोथ (डोळे येणे). नेत्रविकारांमध्ये नेत्राघात, अधिहर्षता, फुल पडणे, तिरळेपणा, मोतीबिंदू, काचबिंदू, नेत्रदोल, हिमांधत्व, रातांधळेपणा, अंधत्व इत्यादींचा समावेश होतो.

रंगांधळेपणा : हा आनुवंशिक दोष आहे. ज्या व्यक्तित हा दोष असतो ती व्यक्ती रंग किंवा  रंगाच्या छटा नीट ओळखू शकत नाही. रंगांधळेपणाचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असते. वाहनचालक, रेल्वे चालक, संरक्षण दले, कापड उद्योग, रंगकारखाने, मुद्रणव्यवसाय इत्यादी ठिकाणच्या कर्मचाऱ्यामध्ये हा दोष शोधण्यासाठी इशिहारा चाचणी घेतली जाते.

अंधत्व : डोळ्यास प्रत्यक्ष इजा होणे, आहारात अ-जीवनसत्त्वाची कमतरता होणे, पारपटल अपारदर्शक होणे, मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे दृष्टिपटल सुटे होणे इत्यादींमुळे अंधत्व येऊ शकते. अ-जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आलेल्या अंधत्त्वावर उपचार करता येतात. दृष्टिपटल सरकण्यामुळे आलेल्या अंधत्वावर तत्काळ उपचार करावे लागतात. अचानक दृष्टीत बदल जाणवल्यास किंवा डोळ्यांसमोर चमकल्यासारखे होऊ लागल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. मुदत संपलेली औषधे डोळयांमध्ये वापरू नयेत. अप्रशिक्षित व्यक्तीकडून डोळ्यांवरील उपचार टाळावेत.

नेत्रपेढी : नेत्रपेढीमध्ये मृत व्यक्तींचे डोळे साठवून ठेवलेले असतात. काही व्यक्ती पारपटलास इजा झाल्यामुळे किंवा पारपटल अपारदर्शक झाल्यामुळे अंध होतात. अशा व्यक्तींना दुसरे नेत्रपटल शस्त्रक्रियेने बसविल्यास दिसू शकते. मृत व्यक्तीच्या डोळ्यांपासून ते मिळविता येतात. म्हणून मृत व्यक्तीचे नेत्रगोल तीन तासांच्या आत नेत्रपेढीमधील तज्ज्ञ काढून घेतात आणि विशिष्ट द्रावणात जतन करून ठेवतात. जेव्हा गरजू अंध व्यक्तीसाठी नेत्रपटल बसवावयाचे असते तेव्हा नेत्रपेढीतील नेत्रपटल वापरता येते.

रक्ताचा कर्करोग, कावीळ, अलर्करोग व एड्स असे आजार नसलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. सर्व शासकीय रुग्णालयांत व खाजगी नेत्ररुग्णालयांत नेत्रदान करण्याची सोय आहे. मृत व्यक्तीचे डोळे काढल्यामुळे चेहरा विद्रूप दिसत नाही. नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळते.

मानवेतर प्राण्यांचे डोळे : अनेक प्राण्यांमध्ये प्रकाशसंवेदना होण्यासाठी इंद्रिये असतात. अशा इंद्रियांच्या प्राथमिक स्वरूपाला नेत्रबिंदू म्हणतात. चपटकृमी, समुद्रतारा (स्टारफिश) आणि इतर अपृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरावर प्रकाशसंवेदनासाठी नेत्रबिंदू असतात. या इंद्रियांना उजेडाची किंवा काळोखाची संवेदना होते. मात्र ही इंद्रिये प्रतिमा तयार करू शकत नाहीत.

इतर अपृष्ठवंशी प्राण्यांना खरे डोळे असतात. बहुतेक कीटकांना मोठे व दोन संयुक्त डोळे असतात. या डोळ्यांमध्ये अनेक भिंगे असतात. प्रत्येक भिंग एका स्वतंत्र डोळ्यासारखे काम करते. त्यामुळे कीटकाला जे संपूर्ण दृश्य दिसते ते डोळ्याच्या वेगवेगळ्या भिंगांमध्ये चोहोबाजूकडून जे प्रकाशकिरण आत शिरतात त्यांपासून मिळून झालेले असते. अनेक प्रौढ कीटकांच्या संयुक्त डोळ्यांमध्ये त्रिकोणाच्या शिरोबिंदूप्रमाणे तीन साधे डोळे असतात. या प्रत्येक डोळ्यांत एक भिंग असते, परंतु त्यांपासून प्रतिमा तयार होत नाही. हे डोळे प्रकाशसंवेदी असतात. अनेक कवचधारी प्राण्यांना (उदा., झिंगा, खेकडा) दोन संयुक्त डोळे असतात आणि त्यांच्या अनेक जातींमध्ये साधे डोळे असतात. कीटकांसारखे दिसणाऱ्या अष्टपाद प्राण्यांना (उदा. विंचू, कोळी) साधे डोळे असतात.

पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये बहुतेक प्राण्यांच्या डोळ्यांची संरचना मनुष्याच्या डोळ्यांप्रमाणे असते. मात्र, काही प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये भिन्नता असू शकते. अनेक प्राणी जे अंधारात व खोल गुहांमध्ये राहतात, त्यांचे डोळे खूप लहान असतात व त्यांना खूप कमी दिसते. याउलट, घुबड आणि इतर प्राणी रात्री शिकार करून खातात. त्यांचे डोळे आणि डोळ्यांची बाहुली मोठी असते. मांजरासारख्या काही प्राण्यांच्या दृष्टिपटलावर प्रकाशाचे परावर्तन करणारी आरशासारखी संरचना म्हणजे चकास स्तर असतो. म्हणूनच काळोखात मांजरीच्या डोळ्यांवर प्रकाश पडल्यावर ते चमकताना दिसतात.

बहुतेक पक्ष्यांच्या डोळ्यांवर तीन पापण्या असतात: वरची पापणी, खालची पापणी आणि कडेला सरकणारे निमेषक पटल. डोळे मिचकावण्यासाठी पक्षी निमेषक पटलाचा वापर करतात आणि झोपताना ते वरची आणि खालची पापणी मिटून घेतात. मनुष्यासह सर्व प्राण्यांपेक्षा पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते. उदा., गिधाडे जमिनीवर मरून पडलेले जनावर सु. ४ किमी. उंचीवरून पाहू शकतात.

नवीन संशोधनानुसार डोळा हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग आहे, असे मानण्यात येते. कारण मेंदू आणि मज्जारज्जू यांच्याबाहेर डोळा या एकाच इंद्रियामध्ये चेतापेशी आढळतात.