एक पंखधारी कीटक. हेमिप्टेरा गणाच्या क्लायविओऱ्हिंका उपगणातील सिकॅडेलिडी कुलात तुडतुड्याचा समावेश होतो. या कुलातील कोणत्याही जातीच्या कीटकाला सामान्यपणे तुडतुडा म्हणतात. त्यांच्या कुलात २०,००० हून अधिक जातींचा समावेश आहे. जगभरात हे कीटक आढळून येतात. मुख्यत: गवतावर, पिकांवर व वृक्षांवर ते आढळतात. यापैकी बटाट्यावर आढळणाऱ्या तुडतुड्याचे शास्त्रीय नाव इम्पोएस्का फॅबी आहे.
तुडतुडा या कीटकांचा आकार पाचरीसारखा निमुळता होत गेलेला असून शरीराची लांबी ६–८ मिमी. असते. मात्र, काही तुडतुडे १२.७ मिमी. एवढ्या लांबीचे आढळले आहेत. शरीरावर पंखांच्या दोन जोड्या आणि केसांसारखी एक आखूड स्पृशा डोळ्यांसमोर मात्र किंचित खाली असते. डोळे साधे असतात. पुढील पंख तितकेसे जाड नसतात. ते वेगवेगळ्या भडक रंगाचे किंवा फिकट पिवळा, मळकट पांढरा किंवा हिरव्या रंगाचे असतात. ते तिरके चालतात आणि नेहमीच उडी मारण्याच्या तयारीत असतात. गवतातून किंवा पिकातून जाताना ते उड्या मारताना दिसतात. त्यांच्या या उड्या मारण्याच्या सवयीमुळे त्यांना ‘तुडतुडे’ म्हणतात.
तुडतुड्यांच्या मुखांगाची रचना पानात तोंड खुपसून रस शोषून घेण्यासाठी अनुकूलित झालेली आहे. तोंडाच्या साहाय्याने हे कीटक वनस्पतींच्या पानांतील रस शोषून घेतात. मादीचे अंडनिक्षेपक (अंडी घालण्याचे इंद्रिय) विदारण कार्यासाठी रूपांतरित झालेले असते. त्याच्या साहाय्याने मादी पानांच्या शिरांतील अन्य पेशींत ओळीने अंडी घालते. अंडी पांढरी व लांबट आकाराची असतात. तुडतुड्यात अर्धरूपांतरण असते. साधारणपणे एका आठवड्यात अंड्यातून पिले बाहेर येतात. त्यांना पंख नसतात. अंगावरील कात टाकून त्यांची वाढ होते. दोन वेळा कात टाकल्यानंतर पंखाची वाढ सुरू होते. २–३ आठवड्यांत पाच वेळा कात टाकल्यानंतर ते प्रौढ होतात. प्रौढ तुडतुडे बरेच दिवस जगू शकतात. त्यांच्या काही जातींत वर्षात एक पिढी होते, तर काहींच्या एका वर्षात अनेक पिढ्या पूर्ण होतात.
तुडतुडे जवळपास सर्व वनस्पतींवर दिसून येतात. मात्र, त्यांच्या काही जाती विशिष्ट वनस्पतींवर आढळतात. एकटा-दुकटा तुडतुडा असल्यास वनस्पतींना धोका नसतो, परंतु ते समूहाने वनस्पतींना हानी पोहोचवितात. पानांच्या खालच्या बाजूला राहून ते पानांतील रस शोषून घेतात व हरितद्रव्याचा नाश करतात, जीवाणुजन्य आणि विषाणुजन्य रोगांचा प्रसार करतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात किंवा मुडपल्यासारखी दिसतात. या कीटकांच्या काही जाती कपाशी, भात, आंबा, द्राक्ष, बटाटा इत्यादी पिकांचे नुकसान करतात. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी डीडीटी, एंड्रिन वा कार्बारिल अशी रासायनिक कीटकनाशके फवारली जातात. अशा रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हल्ली कडुनिंबाचे तेल व पायरेथ्रिन (शेवंतीपासून मिळविलेला पदार्थ) अशी जैविक कीटकनाशके वापरतात.