देवदार हा वृक्ष वनस्पतिसृष्टीच्या पिनोफायटा प्रभागाच्या पायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सीड्रस डेओडारा आहे. वनस्पतिसृष्टीचे १३ ते १४ प्रभाग पाडले जातात. यांपैकी ४ प्रभाग अनावृत बीजी (ज्या वनस्पतींच्या बियांवर आवरण नसते अशा) वृक्षांचे आहेत. यातील पिनोफायटा हा एक प्रभाग आहे. देवदार वृक्ष मूळचा पश्चिम हिमालयातील असून उत्तर पाकिस्तान, पूर्व अफगाणिस्तान, नेपाळ तसेच तिबेटमध्ये समुद्रसपाटीपासून १५००–३००० मी. उंची पर्यंत आढळतो. पाकिस्तानचा हा राष्ट्रीय वृक्ष आहे.
देवदार या सदाहरित वृक्षाची उंची ४०–५० मी. असून तो सरळ वाढतो. साल फिकट तपकिरी असून तिचे उभे तुकडे सुटून पडतात. खोडावर असलेल्या आडव्या फांद्या आणि त्याला असलेल्या लोंबत्या उपफांद्यांमुळे त्याचा आकार शंकूसारखा (पिरॅमिड) दिसतो. पाने लहान, सुईसारखी, ३–५ सेंमी. लांब व टोकदार असून लांब फांद्यांवर एकेकटी तर छोट्या फांद्यांवर २०–३० च्या गुच्छात असतात. पानांचा रंग गडद हिरवा किंवा चमकदार निळसर दिसतो.
अनावृत बीजी वनस्पतींच्या बिया शल्कांवर किंवा पानांच्या पृष्ठभागावर तयार होतात. देवदारसारख्या अनेक वृक्षांमध्ये या पानांचे रूपांतर होऊन त्यांपासून शंकू तयार होतात. मात्र, या वनस्पतींमध्ये सपुष्प वनस्पतींप्रमाणे फुले आणि फळे येत नाहीत. या वनस्पतींचे जीवनचक्र आवृत बीजी वनस्पतींहून वेगळे असते. पुनरुत्पादन फुलांऐवजी शंकूद्वारा होते. देवदारसारख्या वृक्षामध्ये नर आणि मादी शंकू वेगवेगळे असतात. नरशंकू त पुंबीजाणू आणि मादीशंकूत महाबीजाणू असे दोन प्रकारचे बीजाणू तयार होतात. त्यांपासून बीजाणुभित्तिकेत युग्मकोद्भिद (गॅमीटोफाइट) तयार होते. युग्मकोद्भभिद ही वनस्पती आणि शैवाल यांच्यातील बहुपेशीय अवस्था असून या अवस्थेत प्रत्येक पेशीतील गुणसूत्रे अगुणित असतात. पुंबीजाणूंपासून परागकण तयार होऊन त्यापासून पुमाणू पेशी (स्पर्म सेल) तयार होतात, तर महाबीजाणूंपासून अंडपेशी (महायुग्मकोद्भभिद) तयार होतात आणि ती बीजांडात साठून राहतात. परागण होताना, वाऱ्यामार्फत किंवा कीटकांमार्फत परागकण बीजांडात एका सूक्ष्म पोकळीवाटे शिरतात. तेथे परागकण अधिक पक्व होतात आणि पुमाणू पेशींची निर्मिती करतात. फलनानंतर म्हणजेच पुमाणू आणि अंडपेशींच्या मिलनानंतर तयार झालेल्या युग्मनजापासून भ्रूण तयार होतो. बीजात भ्रूण आणि मादी युग्मकोद्भभिदाचे अन्नाचा पुरवठा करणारे अवशेष असतात.
देवदार वृक्षामध्ये नरशंकू आणि मादीशंकू वेगवेगळ्या फांद्यांवर येतात. नरशंकू ४–६ सेंमी. लांब असून फांद्यांच्या टोकाला समूहाने येतात. ते फांद्यांवर उभे वाढतात आणि ऑक्टोबरच्या सुमारास गळण्यापूर्वी जांभळे होतात. मादीशंकू पिंपाच्या आकाराचे, ७–१२ सेंमी. लांब आणि ५–८ सेंमी. रुंद असतात. मादीशंकू फिकट हिरव्या रंगाचे असतात आणि त्यांचे लाकडी (काष्ठीय) शंकूत रूपांतर होते. ते पक्व होण्यास साधारण एक वर्ष लागते. पक्व झाल्यावर ती गळू लागतात, त्यांच्यातील बिया गळून पडतात. त्या बिया रुजतात आणि त्यांपासून देवदाराची रोपे वाढतात. देवदार वृक्षाची वाढ पूर्ण झाली की हे जीवनचक्र पुन्हा सुरू होते.
देवदार वृक्षाच्या शंकूसारख्या आकारामुळे तो शोभेसाठी म्हणून बागांमध्ये व रस्त्याच्या कडेला लावतात. लाकूड टिकाऊ व कठीण असल्यामुळे ते बांधकामासाठी वापरतात. लाकडाला पॉलिश चांगले होत असल्यामुळे फर्निचरसाठी तसेच अंतर्गत सजावटीसाठी ते वापरतात. काश्मीरमध्ये ते हाऊसबोट तयार करण्यासाठी वापरतात. सुगंधी असल्यामुळे त्याच्या राळेचा धूप म्हणून उपयोग होतो. त्याच्यापासून काढलेले तेल घोड्याच्या पायाला लावतात. त्यामुळे घोड्याचे पाय किडण्यापासून वाचतात. खोडाचा आतील भाग सुगंधी असतो आणि त्यापासून अत्तर तयार करतात.