शरीरातील एखादी ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या विकृतीला ‘अंतर्गळ’ म्हणतात. शरीरातील फुप्फुसे, हृदय किंवा आतडी अशी इंद्रिये पोकळ जागांमध्ये असतात. काही वेळा अशा एखाद्या शरीरपोकळीची भित्तिका फाटली जाऊन किंवा कमकुवत होऊन आतील इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग बाहेर येतो तेव्हा अंतर्गळ होते. सामान्यतः अंतर्गळ म्हणजे ‘उदरपोकळीचा अंतर्गळ’ असे म्हटले जाते. अंतर्गळाच्या या प्रकारात लहान आतड्याचा काही भाग उदराच्या भित्तिकेतून उदरपोकळीत उतरतो. ज्या ठिकाणी स्नायुभित्तिका कमजोर असते अशा ठिकाणी अंतर्गळ होऊ शकतो. इतर कोणत्याही भागापेक्षा जांघेच्या भागात अंतर्गळ झालेले जास्त आढळून येतात. गर्भावस्थेत असताना मुलांमध्ये वृषणे उदरपोकळीत असतात. जन्माआधी, नवव्या महिन्यात ही वृषणे वृषणकोशात उतरतात. ती ज्या मार्गाने खाली उतरतात, त्याला वंक्षण नालमार्ग म्हणतात. जन्मजात किंवा अप्रत्यक्ष अंतर्गळामध्ये हा नालमार्ग व्यवस्थित बंद न झालेला असल्यामुळे लहान आतड्याचा भाग नालमार्गात किंवा वृषणात उतरू शकतो. प्रत्यक्ष अंतर्गळामध्ये लहान आतड्याचा भाग या नालमार्गात उतरत नाही, मात्र त्याला पाठीमागून ढकलून फुगवटा निर्माण करतो. असा अंतर्गळ वृद्धपणी होतो. पुरुषांचा वंक्षण नालमार्ग स्त्रियांच्या तुलनेने मोठा असल्याने पुरुषांना वंक्षण अंतर्गळ होण्याची शक्यता अधिक असते. एखादी जड वस्तू झटक्यात उचलली किंवा ढकलली, शौचास सतत जोर केला, खोकला सतत होत असला तसेच अष्ठीला ग्रंथी वाढून लघवीला अडथळा येत असला तर वंक्षण अंतर्गळ होऊ शकतो. स्त्रियांमध्ये वंक्षण अंतर्गळाऐवजी ऊरुनाल अंतर्गळ होण्याचे प्रमाण जास्त असते. यात ऊरुनालेत आतडी उतरतात.
अन्ननलिका श्वासपटलातून उदरात शिरून जठराला जिथे जोडली जाते किंवा तिथे सरकता वार अंतर्गळ होतो. या अंतर्गळात जठर छातीच्या पोकळीत शिरते व वरखाली होते. यामुळे छातीत दाब येतो, गिळायला त्रास होतो व पोटात वायू होतो; आडवे झाल्यावर त्रास वाढतो. उदराच्या वरील मधल्या भागात शस्त्रक्रियेत त्रुटी राहिल्यास किंवा शस्त्रक्रियेची जखम पूर्ण न भरल्यासही उदर अंतर्गळ उद्भवतो.
पाठीच्या दोन मणक्यांमध्ये एक गोलाकार चकती (बिंब) असते. तिचा मध्यभाग जेलीसारख्या पदार्थाचा असतो आणि त्याभोवती जड तंतुमय कडे असते. कशेरू -अंतर्गळामध्ये बिंबाचा मध्यभाग कड्यातून बाहेर येऊन बाजूच्या चेतातंतूंवर दाब देतो. यामुळे तीव्र वेदना होतात. जड ओझे झटक्यात उचलताना हे घडू शकते. कडक पृष्ठभागावर उताणे झोपल्यास यात फरक पडतो. बिंब पुन्हा जागेवर येऊ शकते. अगदी क्वचित मेंदूतही अंतर्गळ होऊ शकतो. यात मेंदूचा थोडासा भाग कवटीतील फटीतून बाहेर येतो.
अंतर्गळ इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग मूळ जागी परत येऊ शकेल अशा स्वरूपाचा नसेल, तर त्याला बंदिस्त अंतर्गळ म्हणतात. जर अशा अंतर्गळाला त्या इंद्रियाला होणारा रक्तपुरवठा थांबलेला असेल, तर त्याला पाशग्रस्त अंतर्गळ म्हणतात. अशा वेळी वैद्यकीय उपचार तातडीने करावे लागतात. अन्यथा कोथ (गँगरीन) होण्याची शक्यता असते. सौम्य अंतर्गळ तीव्र होऊ शकतात, म्हणून अंतर्गळासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.